*
प्रवीण पप्पू शिंदे
श्रीक्षेत्र देहू जवळील जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची साधना तपोभूमी भामचंद्र- भंडारा – घोराडा पर्वत हे सन 2011 ला महाराष्ट्र शासनाने *राज्य संरक्षित स्मारक* म्हणून अधिसूचना काढून घोषीत केलेले असतानाही … तेथील संतभूमी विरोधक लँडमाफीया , बिल्डर व एमआयडीसी यांनी त्या न्याय्य अधिसूचनेवर हरकती घेऊन संत तुकोबांच्या तपोभूमी डोंगरांना अतिक्रमणात विळखा घालून, बेकायदेशीर उत्खनन चालू ठेवते आहे, व भ्रष्ट शासनाच्या वरदहस्ताने डोंगर नष्ट करण्याचे महापाप चालवले आहे. म्हणून महाराष्ट्र संत संस्कृतिचा हा वारसा अतिक्रमणातून मुक्त करण्यासाठी दिनांक 10 मार्च 2026 पासून मुंबई आझाद मैदानात वारकऱ्यांचे धरणे आंदोलनास सुरुवात होणार असून, सरकारला या प्रश्नाचा जाब विचारण्यासाठी लाखोंच्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हा ! असे आवाहन संतभूमी संरक्षक संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष:- तुकयाभक्त- मधुसूदन पाटील महाराज यांनी केले आहे . केवळ शासनाच्या नाकर्तेपणामुळे भामचंद्र- भंडारा- तपोभूमीची अवस्था वाईट झालेली आहे ,असेच विध्वंसक काम चालू राहिले तर भविष्यात हा तपोभूमी डोंगर नामशेष होऊ शकतो .यासाठी वारकरी संप्रदायातील सर्व कीर्तनकार प्रवचनकार प्रबोधनकार यांनी किर्तन प्रवचनाच्या माध्यमातून तळागाळातील सर्वसामान्य भाविकांच्या पर्यंत जगद्गुरू संत तुकोबारायांच्या तपोभूमी डोंगरावर होणाऱ्या या अन्यायाला वाचा फोडून, जनजागृतीद्वारे हा लढा सर्वांपर्यंत पोहचवावा व हा लढा यशस्वी करण्यासाठी दिनांक 10 मार्च 2026 रोजी आझाद मैदानावर वारकऱ्यांची वज्रमूठ संघटित करून जगद्गुरु संत तुकोबांच्या तपोभूमी डोंगरांचा वारसा पुढच्या पिढीला अखंडपणे द्यावा आणि देह जावो अथवा राहो । हा निर्धार करून भंडारा भामचंद्र घोराडा डोंगर मुक्ती संघर्षाचे सर्वांनी शिल्पकार व्हावे असे आवाहान तुकयाभक्त मधुसूदन महाराजांनी केले आहे व त्यासाठी जनजागृती अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे. संत तुकोबारायांच्या तपोभूमीवर होत असलेला अन्याय वारकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारी संतभूमी संरक्षक संघर्ष समिती कधीच सहन करणार नाही .तुकोबांच्या या साधना भूमी डोंगरावर प्राचीन कालखंडापासून, अनेक आध्यात्मिक साधकांनी साधक अवस्थेत असताना तपश्चर्या केलेली आहे, साधना केलेली आहे म्हणून हा तपोभूमी डोंगरांचा वारसा वाचलाच पाहिजे यासाठी पण 2007 पासून संतभूमी संरक्षक संघर्ष समिती सक्रियपणे शासनाच्या विरोधात संविधानिक लढा देत असून अखिल भारतीय मराठा महासंघाने संघर्ष समितीच्या ध्येय धोरणास पूर्णपणे पाठिंबा दिला असून महासंघाचे अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख बब्रुवान शेंडगे पाटील संपूर्ण महाराष्ट्रभर प्रबोधन यात्रेत सहभागी होत आहेत .
नुकत्याच पुणे येथील श्रमिक पत्रकार संघ येथे भरगच्च पत्रकार परिषदेमध्ये तुकया भक्त मधुसूदन पाटील बोलत होते यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय मराठा महासंघाचे उपाध्यक्ष संतोष नानवटे आध्यात्मिक आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बब्रुवान शेंडगे पाटील पुणे विभागीय अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष ह भ प पंडित महाराज क्षीरसागर मराठा महासंघाचे शहराध्यक्ष मयूर गुजर महिला मराठा महासंघाच्या आघाडीच्या शहर प्रमुख आरती माने कर दुष्यंत राजे जगताप जालना येथून श्रीराम मोहिते पाटील ह भ प फले महाराज संतभूमी संरक्षण भूमीच्या कार्याध्यक्ष माधवीताई माने इत्यादी उपस्थित होते यावेळी मुंबई येथे धरणे आंदोलन करून सदर आंदोलनामध्ये दररोज 5000 लोकांची उपस्थिती राहील प्रत्येक जिल्ह्यावर स्वतंत्र जबाबदारी देण्यात येईल असे शेवटी मधुसूदन पाटील महाराज यांनी सांगितले



















