आंबेगाव. प्रवीण पप्पू शिंदे
आंबेगाव तालुक्याचे भूषण ठरणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक आणि संविधान भवन उभारणीच्या प्रक्रियेला आता मोठी गती मिळाली आहे. स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे सहकार मंत्री ना. श्री. दिलीपरावजी वळसे पाटील यांची भेट घेतली असून, त्यांनी या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली जागा हस्तांतरित करण्याबाबत अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.जागेचा प्रश्न मार्गी लागणार
स्मारकासाठी कृषी विभागाची ५ एकर जागा सामाजिक न्याय विभागाकडे वर्ग करण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. ही जागा तातडीने हस्तांतरित व्हावी, यासाठी कृषिमंत्री ना. श्री. दत्तात्रय भरणे (मामा) यांच्या दालनात संबंधित अधिकारी आणि समिती पदाधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे आश्वासन नामदार वळसे पाटील यांनी दिले आहे.केवळ स्मारक नव्हे, तर शैक्षणिक केंद्र!या ५ एकर जागेवर प्रस्तावित असलेले हे स्मारक केवळ एक पुतळा न राहता, ते ज्ञानाचे केंद्र बनणार आहे. या ठिकाणी खालील सुविधा उभारण्याचा समितीचा मानस आहे.एम पी एस सि/यु पी एस सि च्या अभ्यासिका व क्लासेस: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन मिळावे यासाठी.
निवासी वसतिगृह: विद्यार्थ्यांच्या राहण्याची उत्तम सोय.
मेडिटेशन सेंटर: मानसिक शांतता आणि धम्माच्या अभ्यासासाठी.भव्य संविधान भवन: संविधानाच्या मूल्यांचा प्रचार आणि प्रसारासाठी.यांच्या उपस्थितीत पार पडली बैठक या महत्त्वपूर्ण बैठकीला समितीचे अध्यक्ष गौतम खरात, गौतम रोकडे, विठ्ठल दादा टिंगरे, खंडू शेठ थोरात, मनोज थोरात, गेनभाऊ वाघमारे आणि गेनभाऊ मोरे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.ना. वळसे पाटील यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे संपूर्ण आंबेगाव तालुक्यातील आंबेडकर अनुयायांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे. “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो तो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही,” या महामानवाच्या विचाराला स्मरून या शैक्षणिक व सामाजिक संकुलाची उभारणी केली जाणार आहे.


















