तालुका प्रतिनिधि मोर्शी,
तालुक्यातील वरखेड फाट्यानजीक भरधाव कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. ही घटना काल रात्रीच्या 8 वाजता सुमारास घडली. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. कारमधील जखमींपैकी एक नागपूर येथे एसआरपीएफ जवान असून, तो कुटुंबासह कर्तव्यावर जात होता.अरुण रामदास सावळे ३०, रेखा अरुण सावळे २८ , स्नेहल अरुण सावळे दीड वर्षे, सर्व रा. औरंगाबादअशी चारचाकी वाहनांमधील, तर गोकूल गुलाब डाहे २५, अंतोरा व बाळू बापूराव बारबुद्धे ४०, रा. वाढोना अशी जखमी दुचाकीस्वारांची नाव आहेत. नागपूर येथे कार्यरत एसआरपीएफ जवान अरुण साळवे हे कर्तव्यावर रुजू होण्यासाठी एम एच०३ बीई०४२५ या चारचाकी वाहनाने मुलगी व पत्नीसह औरंगाबादहून नागपूरकडे येत होते. वरखेड फाट्यावर तिवसाकडे जात असलेल्या आक्षय मारबदे यांच्या दुचाकीला जबर धडक दिल्यानंतर तब्बल चार ते पाच वेळा कार उलटली. यामुळे कारमधील तिघे व दुचाकीवरील दोघे असे एकूण पाच जण गंभीर जखमी झाले. अपघातात कारचा अक्षरश: चुराडा झाला. दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तिवस्याच्या पोलीस निरीक्षक रिता उईके या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यांनी जखमींना तातडीने तिवसा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
