सुधीर जाधव
तालुका प्रतिनिधी, सातारा.
सातारा : येथे 32 वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या 99 व्या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची एकमताने निवड करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. कुलकर्णी म्हणाले, शिवेंद्रसिंहराजे यांनी मसाप, शाहूपुरी शाखेच्या स्थापनेपासून शहर, जिल्ह्यातील साहित्य चळवळीला पाठिंबा दिला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक लाख पत्रे लिहिण्याच्या मोहिमेचा प्रारंभ शिवेंद्रसिंगराजेंच्या हस्ते झाला होता. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी दिल्लीत जाऊन आंदोलन करणारे ते एकमेव लोकप्रतिनिधी आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अनेकवेळा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडेही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी पाठपुरावा केला आहे. मसाप शाहूपुरी शाखेच्या विभागीय साहित्य संमेलन, युवा साहित्य नाट्य संमेलन यशस्वी करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. मसाप, शाहूपुरी शाखा, मावळा फाउंडेशन या संस्थांनी मागणी केल्यानुसार साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या दोन्ही संस्थांची संयुक्त बैठक नुकतीच झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी होते. या वेळी जेष्ठ साहित्यिक किशोर बेडकीहाळ यांनी मंत्रि शिवेंद्रसिंहराजे याचे नाव सुचविले. त्याला साहित्यिक डॉ. राजेंद्र माने, डॉ. उमेश करंबेळकर यांनी अनुमोदन दिले. या वेळी उपस्थित असलेल्या दोन्ही संस्थांच्या कार्यकारणी सदस्यांनी मंत्री भोसले यांची एकमताने संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड केली. या बैठकीस मासाप शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, अॅड. चंद्रकांत बेबले, विक्रम पाटील, अजित साळुंखे, संजय माने, सचिन सावंत, वजीर नदाफ, आर.डी. पाटील, अमर बेंद्रे, ज्योती कुलकर्णी, अश्विनी जठार, अनिल जठार, तुषार मामुलकर, इ. उपस्थित होते.
