ज्ञानेश्वर पाटेकर
कन्याकुमारी ते काश्मीर (७ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२६) या कालावधीत वरिष्ठ शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली किसान जागृती यात्रा पुणे जिल्ह्यातील राजणगाव गणपती येथे दाखल झाली. या यात्रेचे विविध शेतकरी संघटना, माहिती अधिकार संघटना, भ्रष्टाचार विरोधी संघटना, ग्राहक संघटना, स्वराज्य जनजागृती परिषद, ग्राम स्वराज प्रतिष्ठान, रांजणगाव गणपती ग्रामपंचायत, वारकरी संप्रदाय रांजणगाव गणपती तसेच विविध सामाजिक संस्थांच्या वतीने भव्य व उत्साहपूर्ण स्वागत व सत्कार करण्यात आला.
यावेळी आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी सभेला संबोधित करताना वरिष्ठ शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांनी सांगितले की, देशातील सरकार विविध विषयांवर असत्य माहिती देऊन स्वतःला योग्य आणि देशहितैषी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. भारत-अमेरिका कराराबाबतही चुकीची माहिती पसरवली जात आहे. या करारामुळे भारतीय शेतकरी अधिक कमजोर होऊन कर्जबाजारी होण्याची शक्यता असून, त्यांना शेती विकण्यास किंवा आत्महत्येस प्रवृत्त होण्याची वेळ येऊ शकते. मात्र, शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याऐवजी एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी संघर्ष करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
तसेच, किमान आधारभूत किंमत (MSP) हमी कायदा लागू करणे, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणे, ऊसाचा FRP दर वाढवून ६०० रुपये प्रति क्विंटल करणे, २०१३ चा जमीन अधिग्रहण कायदा पुन्हा लागू करणे, पीक विमा योजनेत सुधारणा करणे आदी मागण्या सरकारकडून मान्य करून घेण्यासाठी १९ मार्च रोजी दिल्ली येथील रामलीला मैदानावर होणाऱ्या आंदोलनात महाराष्ट्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
या शेतकरी सभेला विविध राज्यांतील शेतकरी नेत्यांनी संबोधित केले. पंजाबमधून इंद्रजीत सिंह पन्नीवाल, संदीप सिंह खेरा, हर्षदीप सिंह गिल, सोनी सिंह ओलख; कर्नाटक मधून अभिमन्यू कोहोड, दयानंद पाटील; राजस्थान मधून युवा शेतकरी नेते जगदीश कुमार; मध्य प्रदेश मधून महेश अजनबी; तसेच महाराष्ट्रातून लक्ष्मण वडले (जालना), अनिल घनवट (श्रीगोंदा), शिवाजीनाना नांदखिले (दौंड), सीमा नरोटे (नाशिक), मधुसूदन पाटील महाराज (भामचंद्र डोंगर संघर्ष समिती, देहू), सुवर्णा वायदंडे (सरपंच, राजणगाव गणपती), गंगाधर देशमुख (ग्रामविकास अधिकारी), शरद पवळे (शिवपानंद शेत रस्ते चळवळ प्रणेते), संदीप कुटे (प्रदेशाध्यक्ष, विकास परिषद कामगार युनियन), चंद्रकांत वारघडे (अध्यक्ष माहिती सेवा समिती महाराष्ट्र राज्य)विजय शिंदे (अध्यक्ष, पुणे जिल्हा भीममुद्रा), सीमा पवार (अध्यक्ष, सीमाई प्रतिष्ठान), मंगल सासवडे (जिल्हाध्यक्ष, भूमाता ब्रिगेड), आकाश साळुंखे, राजू लांडे (उद्योजक), रामदास बत्ते (प्रगतशील शेतकरी), तुषार कुटे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या आयोजन समितीचे संयोजक तथा सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खेडकर यांनी उपस्थित सर्व शेतकरी नेते, पदाधिकारी व शेतकरी बांधवांचे आभार मानले व त्यांचे स्वागत केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.


















