प्रवीण पप्पू शिंदे
अनभिज्ञ वाचकांच्या ज्ञानात भर घालणार्या या ज्ञानवर्धक व विचारप्रवर्तक लेखाचा सुसूत्र,सविस्तर गोषवारा असा:—
बुलढाणा जिल्ह्यात असलेले लोणार तळं हे ५० हजार वर्षापूर्वी उल्कापातामुळे तयार झालेलं तळं म्हणून ओळखल जातं.२०२० मधील जूनच्या एका दिवशी या तळ्याचे पाणी गुलाबी लालसर रंगाचे आढळून आले. जणू काही लोकांना होळी खेळण्यासाठी तयार झालं होतं.पण हा रंग काही फार दिवस टिकला नाही.दोन-तीन दिवसांतच तो पुन्हा पहिल्यासारखा झाला. हिरवा-नीळा! मग ते तसं वेळोवेळी घडत राहिलं. यासाठी कारण होतं मिठाळ पाण्यातील समुद्री जीवाणू- हॅलोबॅक्टेरियम.हे लवणजलरागी जीवाणू लवण द्रावणात वाढू लागतात तेव्हा त्या लवणाला गुलाबी रंग येतो.जगभरात अनेक तलावांना निसर्गाने अतिसुंदर रंग बहाल केले आहेत.
‘क्रोएशिया’मध्ये प्लिटवाइस तलाव ही १६ तलावांची मालिका आहे.अनेक धबधब्यांनी जोडलेली ही सर्व तळी निळ्या,राखाडी,हिरव्या अशा वेगवेळ्या रंगात आहेत.माॅस (शेवाळ), शैवाल आणि बॅक्टेरियाच्या साठ्यामुळे तलावांना त्यांचा वेगळा तेजस्वी रंग मिळतो.ही सगळी सरोवरं आश्चर्यकारक आणि मनोरंजक आहेत. ‘जपान’ मध्ये माउंट जाओ इथल्या ‘ओकामा’
तलावाला पाच रंगाचे तलाव म्हणून म्हणूनही ओळखले जाते.हे क्रेटर तलाव १७२० मध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तयार झाले. तलावाचा मुख्य रंग हिरवट आहे,परंतु हा रंग चमकदार हिरव्या ते गडद निळ्या ते अगदी राखाडी रंगातदेखील बदलतो.हे तलाव अत्यंत आम्लयुक्त आहेत आणि तलावांभोवती धुराचे थर अनेकदा वायू सोडतात
परंतु विमानातूनच हे तलाव पाहणे सुरक्षित आहे.
पश्चिम ऑस्ट्रेलियातील मिडल आयलंडवर चेरीच्या रंगाचे ‘ हिलियर सरोवर ‘ आहे.हे सरोवर वर्षभर गुलाबी राहते. शास्रज्ञांच्यामते या सरोवराला मिठाच्या कवचात राहणार्या बॅक्टेरियामुळे हा गुलाबी रंग मिळाला आहे.या सरोवरात लवणरागी जीवाणू आढळतात, ज्यामुळे या सरोवराचा रंग गुलाबी दिसतो; म्हणूनच जिथे जिथे पाण्यातील लवण वाढतं,लवणजलरागी जीवाणू वाढतात. ऑक्सिजन कमी होतो. तिथे पाण्याचा रंग बदलतो.याची झलक मात्र फक्त विमानातूनच पाहू शकतो,कारण पर्यटकांना या बेटावर जाण्याची परवानगी नाही.
अफगणिस्तानात
‘बंद-ए-अमीर’ हा नेत्रदिपक तलाव आहे.
हा तलाव सहा खोल निळ्या तलावांची मालिका आहे आणि हे तलाव प्रत्यक्षात हिंदुकुशच्या पायथ्याशी वसलेले आहेत आणि गुलाबी उंच कड्यांनी वेढलेले आहेत.” लागुना
कोलोरोडा,बोलिव्हिया” हे सरोवर लाल रंगाचे आहे.या सरोवरात राहणार्या शैवाल आणि सूक्ष्मजीवांमुळे हे सरोवर लाल आहे.त्याच्या किनार्यावर पांढरी बोरॅक्स बेटे आणि फ्लेमिंगोचे थवे आहेत आणि ते सरोवराच्या सौदर्यात भर घालत आहेत.हे सरोवर क्षारांनी समृद्ध आहे आणि त्याचा रंग रक्ताच्या लाल ते गंजाच्या रंगापासून ते नारंगी रंगापर्यंत बदलतो,जो हंगाम व उपस्थित सूक्ष्मजीवांच्या क्रियाकलापांवर अवलंबून असतो.
केलीमुतू हा
इंडोनेशियाच्या एन्डेच्या पूर्वेस सुमारे ५० किमी अंतरावरील एक ज्वालामुखी आहे.यात तीन ज्वालामुखी विवर तलाव आहेत.जे रंगात भिन्न आहेत.पृथ्वीवरील हे असं एक ठिकाण आहे,जिथे रंगांमध्ये हा असा फरक दिसून येतो. या तलावांची तीन वेगवेगळी नावं आहेत आणि या भागातील स्थानिकांचा असा विश्वास आहे की,हे तलाव त्यांच्या पूर्वजांचे विश्रांतीस्थान आहेत आणि त्यांच्या आत्म्यांच्या मूडनुसार तलावाचा रंग बदलतो. तलावांच्या या अति खास रंगफरकामुळे शास्रज्ञही गोंधळात पडले आहेत.इथले रंग लाल ते हिरवा,निळा ते काळा;तर कधीकधी अगदी स्वच्छ पांढरा असेसुद्धा बदलत असतात.ज्वालामुखीच्या भूगर्भशास्र आणि रसायनशास्रात होणार्या बदलांमुळे हे तलाव रंग बदलतात.
इक्वेडोरमधील अँडीज येथील क्विलोटोआ हे पाण्याने भरलेलं महाकुंड ( कॅल्डेरा ) आहे.हे क्रेटर सरोवर तीन किलोमीटर रूंद आहे आणि ते काही ज्वालामुखीच्या क्रियाकलपांमुळे तयार झालं आहे. विरघडळलेल्या खनिजांमुळे तलावात हिरव्या रंगाच्या अनेक छटा दिसतात,त्यामुळे हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.हिरव्यागार छटांमुळे हे सर्वांत सुंदर तलावांपैकी एक आहे. चीनमधील जिउझाईगोन राष्ट्रीय उद्यानात ‘पाच- फुलांचं सरोवर ‘आहे. स्फटिकासारख्या स्वच्छ पाण्यासाठी ते प्रसिद्ध आहे.त्याचा तळही दिसतो,जो रंगीबेरंगी खडकांनी व्यापलेला आहे.या खडकांमुळे पाणी निळं,हिरवं आणि पिवळ्या रंगांच्या इंद्रधनुष्यासारखे दिसतं. हे सरोवर २,४७२ मीटर उंचीवर आहे.आणि इथलं पाणी नीलमणी रंगाचं आहे.या पाच फुलांच्या सरोवराला ‘वहुआ है ‘असेही म्हणतात.हे सुंदर सरोवर चीनमधील जिउझाइगोन राष्ट्रीय उद्यानाचे प्रसिद्ध आकर्षण आहे.
या उत्कृष्ट कलाकृती तयार करण्यासाठी निसर्गाने आपले सर्वात सुंदर रंग वापरले आहेत.एवढं सगळं असलं तरी आपलं लोणार तळं जगभर प्रसिद्ध आहे,ते यासाठी की उल्कापातामुळे तयार झालेलं ते एकमेव आहे.ज्येष्ठ पत्रकार मंगला गोगटे यांनी रंगीबेरंगी पाण्याची दुनिया उलगडून दाखवताना जी तपशीलात माहिती विशद केली आहे ती खरोखरच उल्लेखनीय, वाचनीय,विचारप्रवर्तक व अनभिज्ञ वाचकांच्या ज्ञानात भर घालणारी ठरते हे मात्र तितकेच खरे!———————पत्रकार प्रवीण पप्पू शिंदे


















