– श्री. प्रवीण पप्पू महादेव शिंदे पाटील
– महाराष्ट्र प्रदेश राज्य सचिव अखिल भारतीय माथाडी आणि ट्रान्सपोर्ट युनियन
—
स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात दोन मोठ्या विचारधारा प्रभावी राहिल्या — एक पुरोगामी बहुजनवाद, तर दुसरी हिंदुत्ववाद. या दोन्ही विचारधारांमध्ये मराठा समाजाने आपले स्थान शोधण्याचा प्रयत्न केला. पण, खरे सांगायचे तर, दोन्ही विचारधारांनी मराठा समाजाचा केवळ उपयोग केला. एक मोठा मतदारसंघ, एक संघटित वर्ग म्हणून वापर करून सत्ता भोगली. पण आजवर या सत्ताधाऱ्यांनी, कोणत्याही पक्षाने, मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी ठोस उपाय केले नाहीत.
—
पुरोगामी धोरणे आणि मराठ्यांची गफलत
१९९० नंतर मंडल आयोग लागू झाल्यावर ओबीसी समाजाने एकत्र येऊन त्यांचे हक्क मागितले, लढे दिले, सत्तेवर प्रभाव टाकला. छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे, हरिभाऊ राठोड यासारख्या नेत्यांनी पुरोगामी बहुजनवादाची मशाल घेऊन सत्ताधाऱ्यांवर दबाव टाकला आणि ओबीसी आरक्षण, पदोन्नतीतील आरक्षण, बिंदूनामावली घोटाळे अशा मार्गांनी आपल्या समाजाचा वाटा निश्चित केला.
मराठा मात्र या सगळ्यात पुरोगामी म्हणवून गप्प राहिला. मोठ्या भावाच्या भूमिकेतून ‘इतरांचे भले होऊ दे’ म्हणत स्वतःच्या वाट्याचे आरक्षण गमावले. जेव्हा आरक्षण मागण्यासाठी आवाज उठवला, तेव्हा मात्र त्याच्यावरच अत्याचारी, जातीयवादी, गुन्हेगार अशी हूल दिली गेली.
—
हिंदुत्वाच्या डोसात हरवलेले स्वाभिमान
२०१४ नंतर हिंदुत्ववादाच्या नावाखाली मराठा समाजाने भाजपासोबत उभा राहून सत्ता मिळवून दिली. मात्र, सत्तेवर येऊनही भाजपने मराठा समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. कोपर्डी घटनेनंतर समाज एकवटला तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या मूकमोर्चांचे फलित काय? — केवळ आश्वासने आणि सत्तेची बटीक खेळी!
—
लोकसभा 2024 – मराठ्यांचा मतदानातून विद्रोह
या लोकसभेत मराठा समाजाने आपला राग मतदानातून व्यक्त केला. भाजपा विरोधात मतदान झाले. पण याचा फायदा झाला तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी उबाठा गटाला, ज्यांनी पुन्हा नेहमीप्रमाणे मराठा आरक्षणाचा विषय केंद्राकडे ढकलून टाकला.
—
विधानसभा निवडणुकीत गोंधळलेला समाज आणि नव्या भ्रमात फसलेली दिशा
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाने एक आशा निर्माण केली होती, पण त्यांच्या निवडणुकीपासून माघारीने समाज पुन्हा गोंधळात पडला. मग काय? ‘हिंदुत्व’ आठवून पुन्हा महायुतीकडे पाठ फिरवली नाही. गपगुमान मतदान झाले. यावेळी मात्र ओबीसी समाजाने भाजपाशी खुला करार केला, म्हणून त्यांच्या मागण्या ऐकल्या जात आहेत.
—
*🛑मराठा समाज — केवळ “कढीपत्ता”?*
पुरोगामी असो वा हिंदुत्ववादी – मराठा समाजाचा वापर “मत मिळवण्यासाठी” आणि “सभा भरवण्यासाठी” झाला. मराठा समाजाने मात्र आपला स्वाभिमान, आरक्षणाचा अधिकार, सामाजिक प्रतिनिधित्व, सगळं गमावलं.
—
*समाधानाचा मार्ग — मतदानातून एकत्रित विद्रोह*
*मराठा समाजाने आता कोणत्याही विचारधारेच्या नावे नव्हे, तर “मराठा” या स्वाभिमानाने एकत्र यावे. पुरोगामी नव्हे, हिंदुत्ववादी नव्हे — स्वाभिमानी मराठा!*
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत. ग्रामीण भागात मराठा समाज बहुसंख्येने आहे. याच निवडणुकांमधून एक ताकद उभी करूया.
सर्वच पक्षांना जाणवेल, की मराठा समाज एकवटल्यास कोणत्याही सत्ताधाऱ्याला दुर्लक्षित करता येणार नाही.
—
*शेवटची हाक*
> “जात म्हणून नव्हे, स्वाभिमान म्हणून एकत्र या!”i
“मतदानातून क्रांती घडवा!”
“मराठा समाजासाठी, मराठा नेतृत्वाची गरज!”
—
#मराठा_ओट_बैंक
