**
*नागरिकांसह व्यावसायिक त्रस्त, महावितरणचे नक्की करायचे काय..?*
मंचर आणि अवसरी खुर्द परिसरामध्ये वारंवार विजेचा खेळ खंडोबा सुरू असून सकाळी आणि संध्याकाळी विजेची खरी गरज असताना पावर गुल होत असल्यामुळे छोट्या मोठ्या व्यवसायिकांबरोबर सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत, सध्या वारंवार होत असलेल्या वीज गायबमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. महावितरणकडून २४ तास अखंडित वीजपुरवठा देण्याची जबाबदारी असताना स्थानिक नागरिकांना दररोज तीन ते चार तास वीज येण्याची वाट पहावी लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सध्या दररोज अनियमितपणे वीजपुरवठा खंडित होत असून कोणतीही पूर्वसूचना दिली जात नाही. त्यामुळे घरगुती वापर, शेतीपंप, लहान उद्योग, दुकाने तसेच व्यावसायिक आस्थापनांना मोठा फटका बसत आहे. विशेषतः लहान दुकानदार, दूध व्यवसायिक, वेल्डिंग वर्कशॉप, थंड पेय व आईस्क्रीम विक्रेते यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे सांगितले जात आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, वीजपुरवठा खंडित होत असतानाही महावितरणकडून वीज बिलामध्ये कोणत्याही प्रकारची सवलत किंवा कपात दिली जात नाही. त्यामुळे “वीज नाही तरी बिल पूर्ण” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
महावितरणची जबाबदारी काय?
महाराष्ट्र राज्यातील वीज वितरणाची जबाबदारी Maharashtra State Electricity Distribution Company Limited (महावितरण) या सरकारी कंपनीकडे आहे. वीज वितरण कंपन्यांसाठी सेवा मानके (Standards of Performance) निश्चित केलेले आहेत.
ही नियमावली Maharashtra Electricity Regulatory Commission (MERC) या नियामक प्राधिकरणाने निश्चित केली आहे. त्यानुसार नागरिकांना दर्जेदार आणि अखंडित वीजपुरवठा देणे ही वीज वितरण कंपनीची जबाबदारी आहे.
वीज ग्राहकांचे हक्क
वीज ग्राहकांना खालील महत्त्वाचे हक्क दिलेले आहेत:
पूर्वसूचना देण्याचा नियम – नियोजित देखभाल किंवा दुरुस्तीमुळे वीज बंद ठेवायची असल्यास नागरिकांना आधी सूचना देणे बंधनकारक आहे.
तक्रार निवारण व्यवस्था – ग्राहकांना वीजपुरवठा खंडित झाल्यास तक्रार करण्याचा अधिकार आहे.
सेवा मानकांचे पालन – MERC च्या नियमांनुसार वीजपुरवठा दीर्घकाळ बंद राहिल्यास काही परिस्थितीत नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे.
ग्राहक तक्रार निवारण मंच – स्थानिक स्तरावर तक्रार न सुटल्यास ग्राहकांना ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे जाण्याचा अधिकार आहे.
*कोट*
मंचर परिसरातील ग्रामीण भागामध्ये काही भागात खांबावर आकडे टाकून सर्रास वीज चोरी होत असल्यामुळे फ्यूज जाण्याचे प्रकार वारंवार होत आहे, वीज चोरी पूर्णपणे थांबविल्यास नक्कीच सुधारणा होऊन नागरिकांना 24 तास चांगला वीजपुरवठा मिळेल परंतु महावितरण कर्मचाऱ्यांचा आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्यांकडे कानाडोळा आहे
आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर सध्या गॅसची टंचाई असून सध्या नोकरदार आणि शेतकरी वर्गाला विजेची अत्यंत गरज आहे, महावितरण प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, वारंवार होणाऱ्या वीज कपातीचे कारण स्पष्ट करावे आणि नियमित व अखंडित वीजपुरवठा करावा,तसेच जर वीजपुरवठा नियमित देणे शक्य नसेल तर वीज बिलामध्ये सवलत किंवा नुकसानभरपाई देण्याबाबत स्पष्ट धोरण जाहीर करावे.
प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज
सध्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर वारंवार होणारी वीज कपात नागरिकांसाठी गंभीर समस्या बनली आहे. त्यामुळे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिसरातील वीजपुरवठ्याचा आढावा घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात.
प्रवीण शिंदे.. सचिव अखिल भारतीय माथाडी आणि ट्रान्सपोर्ट युनियन


















