शिवाय एवढ्या लांबच्या प्रवासासाठी संजयची जुनी जग्वार गाडीच अधिक योग्य होती. ते मॉडेल संजयला अगदीच कमी किंमतीला मिळालं होतं कारण ती गाडी मुळी चालतच नव्हती. ती दुरुस्त होईपर्यंत संजयनं त्यावर चिकाटीनं काम केलं. संजयसारखी नसता भपका दाखवायची आवड राजीवला नव्हती त्यामुळे अशा शानदार गाडीने इटलीत ओर्बासानोला जायच्या विचारानं त्याला अवघडल्यासारखं होत होतं. पण दुसरीकडे त्याला असंही वाटत होतं की तिथं आपण एखाद्या चांगल्या घरातील माणसाप्रमाणे जायला पाहिजे- अगदीच पाठीवर बाडबिस्तरा घेऊन फिरणा-या माणसासारखं नको. तसं केलं तर सोनियाच्या आईवडिलांवर आपली चांगली छाप पडेल.
तो येतोय म्हणून सोनिया हुरळून गेली. कित्येक महिने तिनं त्याला बघितलंही नव्हतं. तिची प्रतिक्षा जणू चिरकालापासून चालली होती. तिच्या बहिणी आणि मैत्रिणीसुद्धा अस्वस्थ झाल्या. टुरीनबाहेरच्या त्या छोट्याशा गावातल्या सिंड्रेलाला नेण्यासाठी ‘भारतीय’ राजकुमार थोडाच उठसूट येणार होता….तिच्या आईवडिलांसकट सर्व लोकांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती. आगमन झाल्याच्या पहिल्या रात्री तिच्या आईवडिलांनी त्याला जेवायला बोलावलं. ही भेट ‘काही खास वगैरे नाही,’ असं ढोंग करण्याचा अटीतटीचा प्रयत्न मायनो कुटुंबानं चालवला होता.
राजीवच्या ‘जग्वार’ मधील आगमनाने परिसरात खळबळ उडवून दिली. मायनोंच्या मुलीला भेटायला आलेला हा इंग्रज तरुण आहे तरी कोण? लोकांनी एकमेकांना खालच्या स्वरात विचारलं. त्याचं दिसणं त्याच्या गाडीशी सुसंगत नसल्यानं त्यांचा गोंधळ आणखीनच वाढत होता. सोनियाच्या एका मैत्रिणीनं विनोद केला,’’ अग, हा तर सिसिलियन दिसतो.‘’
राजीव कपडे चुरगळलेल्या अवस्थेत, दाढीबिढी न करता उगवला होता कारण हॉटेलची बिलं वाचवण्यासाठी स्वारी गाडीतच झोपत होती. ओर्बासानो येथील एका सुनसान रस्त्यावर दोघांनी सकाळी भेटायचं ठरवलं. तेव्हा त्याला प्रेमभरानं मिठी मारताना तिच्या लक्षात आलं की राजीवला कसलीतरी काळजी लागून राहिली आहे. पण ती काळजी कशाची हे काही तिला कळत नव्हतं. त्याला खूप थकवा आलाय की रात्रीच्या जेवणाच्या कार्यक्रमाचा ताण आलाय की त्याची आई हल्लीच पंतप्रधान झाली त्यामुळेे तो तणावाखाली आहे- ह्यापैकी काहीही कारण असू शकत होतं.
भेटीचा आवेग थोडा ओसरल्यावर त्यानं तिला सांगितलं, ’’मला परत भारतात जाणं भाग आहे.’’
‘’अरे, पण मग तुझ्या वैमानिकाच्या परवान्याचं काय ?’’
‘’ तो मला तिथंही मिळेल. पण तुझ्यापासून खूप दूर जाण्याचीच काळजी लागून राहिली आहे मला.’’
ते तर होतंच पण त्याच्या आईला आत्ता त्याची खूप गरज होती.
‘’ती खूप एकटी आहे. भयंकर मोठ्या समस्या उभ्या आहेत तिच्यापुढे.’’ त्यानं सोनियाला सांगितलं.
त्यानं तिला सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या की इंदिराजी अमेरिकेहून परतल्या आणि इकडे विरोधकांनी त्यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. अमेरिकनांच्या प्रभावाखाली येऊन त्यांनी आपल्या वडिलांच्या तटस्थतेच्या धोरणाला हरताळ फासला आहे असा विरोधकांचा आरोप होता. चिंतेची बाब म्हणजे त्यांच्यावर हल्ला करणा-यांत केवळ विरोधी पक्षच नव्हते तर त्यांच्याच पक्षातले लोकही त्यांच्यावर उलटू पाहात होते. पक्षातील ज्येष्ठ सदस्यांना डावलून इंदिराजी समस्यांना थेट हात घालीत होत्या हे त्यांना अजिबात पसंत नव्हतं. व्ही. के. मेनन ह्या नेहरूंच्या जुन्या सहका-याने तर इंदिराजींवर संसदेत कठोर टीकास्त्र सोडलं. अमेरिकन मदत मिळाली त्याबद्दल ते काहीच बोलत नव्हते तर ती मदत देण्यापूर्वी त्यांनी घातलेल्या अटींबद्दल ते प्रश्न उपस्थित करीत होते. ‘रूपयाचे अवमूल्यन करा’ ही त्या अटीपैकी एक नावडती अट होती. परंतु असेही कठोर निर्णय घेण्याची क्षमता इंदिराजींच्या अंगी होती हे त्यांच्या कृतीतून दिसून येत होतं. ते निर्णय लोकानुनय करणारे नसले तरी देशाच्या दृष्टीनं हितकारकच होते. त्यांची लोकप्रियता ओसरू लागली तसतसे भारताच्या भविष्याविषयीचे अंदाज निराशाजनक होऊ लागले. लोकांच्या मनात विचार येऊ लागला की नेहरूंनी भारताची एकता आणि लोकशाही कशीबशी टिकवली खरी, पण एकामागोमाग पडणारे दुष्काळ, असंख्य वांशिक झगडे, पाकिस्तानसोबतचा ताणतणाव आणि इंदिरा गांधींचे नेतृत्व ह्यामुळे हा देश विघटनाच्या उंबरठ्यावर उभा आहे.
‘’ त्याबद्दल ते माझ्या आईला दोष देतात,’’ राजीव म्हणाला.’’ जणू काही तीन वर्षे दुष्काळ पडला आणि लोक भुकेनं मरू लागले ह्याला तीच जबाबदार आहे… अशा संकटाच्या काळात मी तिच्यापासून दूर आहे म्हणजे मी तिला वा-यावर सोडून देतो आहे की काय, असं वाटतं मला आणि त्याचा मला त्रास होतो.’’
राजीवचं त्याच्या आईविषयी बोलणं ऐकतऐकत सोनिया भारतीय राजकारणाची धुळाक्षरं गिरवू लागली. तेव्हा जरी तिला त्या गोष्टीची जाणीव होत नसली तरी ती वेगवेगळ्या कल्पनांच्या आणि विचारांच्या संपर्कात येत होती. जे विचार पूर्वी तिला खूप दूरचे, दुर्बोध वाटत होते तेच विचार आता तिला खूप ओळखीचे वाटू लागले. तिच्या लक्षात येऊ लागलं की राजीवच्या आईसारख्या एखाद्या व्यक्तीच्या सान्निध्यात राहाणं आणि तरीही तिचा आपल्यावर परिणाम होऊ न देणं अशक्य आहे. अर्थात् त्यांच्यासोबत राहावं लागण्याची गोष्ट एवढी दूरची होती की त्यामुळे आत्ताच्या क्षणी बेचैन होण्यासारखं काही नव्हतं. प्रत्येक लढाईचीही आपापली वेळ असते. तिच्या आईवडिलांचा तिच्या प्रेमाला असलेला विरोध हाच आत्ताच्या क्षणाला तिच्यासमोरचा मुख्य अडथळा होता.
सोनिया राजीवला घेऊन एका मित्राच्या घरी गेली. राजीवला आपल्या घरी ठेवून घेण्याचं त्या मित्रानं कबूल केलं होतं. मग तिनं त्याला शहरात फिरायला नेलं. निनोच्या बारमध्ये दोघांनी कापुचिनो घेतली, काही काळ रस्त्यांवर भटकून मग ते पिअरी लुगीच्या बारवर थांबले. हॉटेल चालवण्याव्यतिरिक्त पिअरी लुगी फावल्या वेळात रेडियो हॅमही होता. राजीवचाही तोच छंद होता. विमानोड्डाणाचा अभ्यास करताना त्याला रेडियो हॅम ह्या छंदाचा शोध लागला होता. एक तर त्याला इलेक्ट्रॉनिक्सची आवड होती आणि दुसरं म्हणजे सोनियापासून खूप दूर असताना तिच्याशी संपर्क ठेवण्याचं माध्यम म्हणूनही तो त्याकडे पाहात होता.
सोनियानं त्याला विश्रांती घ्यायला खोलीवर सोडलं, तिच्या घरी रात्री जेवणासाठी त्याला आणण्याची सोयही केली. मग जिआवेनो येथे तिच्या शाळेतल्या माजी विद्यार्थिनींचं वार्षिक स्नेहसंमेलन भरणार होतं तिथं ती गेली. सिस्टर जोआन्ना नेगीनं त्याविषयी सांगितलं की ‘’ अगदी कालच घडावा तसा तो दिवस मला आठवतो. तेव्हा सोनिया वीस वर्षांची होती. आपल्या वर्गमैत्रिणींना भेटून झाल्यावर तिनं सांगितलं की मी आता निघते.’’
तेव्हा सिस्टर जोआन्नाने तिला विचारलं,’’ तू जेवायला का थांबत नाहीस ग? बराच काळ दूर इंग्लंडला होतीस. नजरेलाही पडत नव्हतीस त्यामुळे.’’
‘’ मी थांबू शकत नाही आत्ता,’’ सोनियानं तिला उत्तर दिलं होतं. ‘’ आज रात्री जेवायला घरी एक पाहुणा यायचाय ना घरी.’’
‘’कोण ग, सांग तरी आम्हाला.’’ सिस्टर जोआन्ना थट्टेनं म्हणाली.
त्यावर सोनिया लाजली तेव्हा तिच्या गालांवर खळ्या पडल्या. सरतेशेवटी तिच्या तोंडून निघालंच,’’ माझा ना, बॉयफ्रेंड येणार आहे.’’
‘’तुझा बॉयफ्रेंड, अरे वा, मला सांग ना त्याच्याबद्दल सगळं…. तो आहे तरी कोण?’’
सोनिया उत्तर द्यायला फारशी उत्सुक नव्हती. त्यामुळं ननच्या उत्सुकतेला आणखीनच भर चढला.
‘’ तो इंडियन आहे.. ’’ तिनं लाजत संकोचत सांगितलं.
‘’इंडियन ?’’ नन आश्चर्यानं किंचाळली.
तिनं आवाज हळू करावा म्हणून सोनियानं तिच्या ओठांवर बोट ठेवलं. मग एक उसासा टाकून ती म्हणाली,’’ तो इंदिरा गांधींचा मुलगा आहे.’’
रात्रीच्या जेवणाचा प्रसंग म्हणजे ‘गेस हू इज कमिंग फॉर डिनर’ ह्या कॅथरिन हॅपबर्न आणि सिडनी पोटीयर ह्यांच्या चित्रपटाची इटालियन आवृत्तीच होती. फक्त तो चित्रपट होता आणि ही सत्यघटना होती एवढाच काय तो फरक होता. स्पेन्सर ट्रेसीची सिडनी पोटीयरबद्दल सिनेमात जी प्रतिक्रिया होते तशीच साधारण प्रतिक्रिया स्टेफानोची राजीवबद्दल झाली. राजीव आपल्या अभ्यासाविषयी बोलला. त्यानं नुकतंच खाजगी वैमानिकाचं प्रमाणपत्र मिळवलं होतं. दीड वर्षात आपण कमर्शियल पायलटचा परवाना मिळवू असं त्याला वाटत होतं. त्याला लौकरात लौकर नोकरी शोधायची होती. अर्थात् त्याच्यापाशी तसंच सज्जड कारणही होतं. तो स्टेफानोंना म्हणाला ‘’ मी खूप गंभीरपणे बोलायला आलो आहे, मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे.’’
सोनिया पुतळ्यासारखी स्तब्ध झाली. इतका वेळ वडील आणि राजीव ह्यांच्यातील दुभाष्या म्हणूनही ती काम करीत होती. तिची आई सोफ्यासमोरील टेबलावर कपबश्या ठेवत होती. ते बोलणं ऐकल्यावर अस्वस्थ झालेल्या आईचे हात कपबश्या ठेवताना थरथरू लागले. कुटुंबप्रमुख ह्या नात्यानं स्टेफानोनं सौजन्यानं पण तरीही ठामपणे राजीवला सांगितलं की ‘’ तुझ्या सच्चेपणाबद्दल आणि प्रामाणिकपणाबद्दल माझ्या मनात तीळभरही शंका नाही.’’ बोलता बोलता त्यांनी सोनियाकडे पाहून भाषांतर चालूच ठेव अशी खूण केली. ‘’ तू कसा आहेस हे तुझ्या डोळ्यांत पाहूनच मला कळलंय. पण तुझ्याबद्दल शंका वाटत नसली तरी माझ्या मुलीला असं परदेशी जाऊन राहणं जमेल का याबद्दल मात्र माझ्या मनात शंकाच शंका आहेत. आपल्याला नक्की काय हवंय ते कळण्याच्या दृष्टीनं ती खूपच लहान आहे अजून…’’ बोलणं ऐकणा-या सोनियानं वैतागून आकाशाच्या दिशेनं पाहिलं. ते बोलतच होते, ‘’ मी तुम्हाला प्रांजळपणे सांगतो की भारतात राहाण्याची तिला सवय होईल असं मला अजिबात वाटत नाही. दोन्हीकडच्या चालीरीती अगदी वेगळ्या आहेत.’’
त्यावर राजीवनं सुचवलं की सोनियानं भारताला एक छोटीशी भेट देऊन यावं. त्याबद्दल बोलताना तो म्हणाला की ‘’मी तिथं पोचण्यापूर्वी तिनं अगोदर एकटीनंच पुढे जावं. म्हणजे तिचा तिलाच सगळा अंदाज येईल.’’ परंतु स्टेफानोनं त्या कल्पनेला निक्षून विरोध केला.
‘’ ती एकवीस वर्षांची होईपर्यंत मी तिला कुठेही पाठवू शकत नाही.’’
त्यांचं मन वळवणं मुळीच सोपं नव्हतं. सोनियाला ते माहिती होतं परंतु त्या भेटीला वाईट वळण लागणं तिला परवडणार नव्हतं. तिच्या वडिलांचं ‘मौन’ सुरीनं कापता येईल इतकं कठीण होतं. तो माणूस एखाद्या पहाडासारखा आपल्या निर्णयाबद्दल अचल होता परंतु त्यानं एक छोटीशी सवलत त्यांना दिली. ‘’ती एकवीस वर्षांची झाल्यावरही तुम्हा दोघांच्या परस्परांविषयीच्या भावना तशाच राहिल्या असतील तर मी तिला भारतात जाऊ देईन. परंतु ती एकवीस वर्षाची होण्यासाठी अजून एक वर्षाचा अवधी आहे.’’ ते म्हणाले. मग बायकोकडे वळून त्यांनी पुस्ती जोडली की ,’’ पुढेमागे गोष्टींना नीट वळण लागलं नाही, तर तिचं जीवन उद्ध्वस्त करण्यात मी हातभार लावला म्हणून ती मला बोल लावू शकणार नाही.’’
परंतु सगळं काही पहिल्यासारखं सुरळीत होईल, सत्य परिस्थितीचं भान येऊन सोनिया स्वतःच ह्या सगळ्या प्रकरणावर पडदा टाकेल असा स्टेफानोला मनापासून विश्वास वाटत होता आणि तसं व्हावं अशीच त्याला आशा होती. आपली लेक गमवावी लागेल की काय ह्या कल्पनेनं त्याचा जीव कासावीस झाला होता.
मायनोंशी झालेल्या भेटीची माहिती राजीवनं आईच्या कानावर घातली तेव्हा स्टेफानोनं घातलेल्या अटीशी इंदिराजी सहमत झाल्या. त्या दोघांच्या प्रेमाला काही भविष्य आहे का, हे अजमावून पाहाण्याचा तेवढाच एक मार्ग होता. त्यासाठी त्या दोघांनी थोडा वेळ घ्यायला हवाच होता. शिवाय राजीवने परदेशी पत्नी निवडली नसती तर इंदिराजींच्या दृष्टीनंही बरंच झालं असतं. परंतु त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे, हे जर काही काळानं सिद्ध झालं तर मात्र त्या आपल्या मुलाच्या निर्णयाला विरोध करणार नव्हत्या.
—————————————-
सोनियाला सुट्टीसाठी नवी दिल्लीला येण्याचं आमंत्रण देणारं इंदिरा गांधींचं पत्र ही स्टेफानोंच्या दृष्टीनं चिंतेचीच गोष्ट होती. परंतु ते आपल्या शब्दाला जागणारे होते. दिलेलं वचन पाळण्याखेरीज दुसरा पर्याय त्यांच्यापुढे नव्हता. मग त्यांनी त्यावर घरात चर्चा केली. दुसरा कुठलाही मार्ग दिसत नसल्यामुळे सोनियानं भारतात जावं, पण एकच महिन्यासाठी जावं, ह्या गोष्टीस त्यांनी मान्यता दिली.
१३ जानेवारी, १९६८ रोजी म्हणजे एकविसावं लागल्यावर बरोब्बर चौतीस दिवसांनी सोनिया नवी दिल्लीतील पालम विमानतळावर उतरली. तिच्या पोटात भीतीनं गोळा उठला होता. आईबाबा, बहिणी तिला निरोप द्यायला मिलानमधील मालपेन्सा विमानतळावर आल्या होत्या. त्यावेळेस कठोर मनाच्या स्टेफानोलाही अश्रू आवरणं कठीण गेलं होतं.
आई तिच्या हॅंडबॅगेत औषधं भरत होती, तेवढ्यात स्टेफानो म्हणाले होते,’’ तिथं करमलं नाही तर ताबडतोब परत यायचं, कळलं ना?’’
विमानप्रवासात सोनिया अजिबात झोपली नव्हती. विमानप्रवासात एकटी असल्यामुळं तिच्या मनात एक प्रकारची चिंता भरून राहिली होती. राजीवला पुन्हा बघण्याच्या उत्कंठेनं आता एका अस्पष्ट भयाचं रूप धारण केलं होतं. त्या दोघांना प्रत्यक्ष भेटून एक वर्ष उलटलं होतं. त्यानं माझी किंवा मी त्याची निराशा केली तर? ओळखीच्या वातावरणात आल्यावर आता माझ्याशी तो वेगळाच वागू लागला तर ? मी समजत होते तसा तो नसलाच तर? पण हे सगळे प्रश्न अगदी अटळ होते. आपलं सगळं सर्वस्व डावातल्या एकाच पत्त्यावर लावणा-या जुगा-याला जे प्रश्न पडतील ते सगळे प्रश्न सोनियाला पडत होते.
आकाशातून खाली पाहाताना तिला दोन्ही बाजूंना वृक्षराजी असलेले रस्ते आणि वळणं दिसली. त्यातच मध्येमध्ये संगमरवरी भूमितीय आकृत्याही दिसत होत्या. ते मोगलकालीन राजवाडे असल्यासारखं वाटत होतं. विमान सकाळी उतरलं. ती हिवाळ्यातलं थंड हवामान मागे सोडून आली होती त्यापेक्षा इकडलं हवामान फार वेगळं नव्हतं. वातावरण आल्हाददायक होतं, आकाश निळं होतं, विमानातून खाली उतरताक्षणी तिला एक वेगळाच गंध जाणवला. खास भारताचा म्हणून नंतर तो गंध तिच्या ओळखीचा होणार होता. पेटत्या लाकडाचा, मधाचा, राखेचा, जास्त पिकलेल्या फळांचा गंध- असं ते वेगवेगळ्या गंधांचं मिश्रण होतं. त्या शिवाय तिथं एक आवाजही होता… सगळीकडे हजर असणा-या कावळ्यांचा कलकलाट.. आगमनकक्षाच्या वाशांवर बसून कशालाही न जुमानता त्यांची कावकाव चालली होती. तिची वाट पाहात राजीव तिथं उभा होता. सोनियानं नंतर म्हटलं, ‘’ मी त्याला पाहिलं मात्र, आणि माझ्या मनात सुटकेची भावना खोलवर दाटून आली.’’
0000000
सोनिया गांधी- ललित चरित्र- मूळ लेखक -हाविएर मोरो- मराठी अनुवाद-सविता दामले, प्रकाशक- राजहंस प्रकाशन, पुणे
……..
सोनिया गांधी यांच्या राजकारणाच्या शैलीबाबत माझे अनेक आक्षेप होते आणि आहेत. पण इटलीहून आलेल्या सोनियाजी इथल्या धर्मनिरपेक्ष मूल्यांच्या रक्षणासाठी ज्या कणखरपणे लढत आल्या, ते अभूतपूर्व आहे.
वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
आमदार भाई जगताप मुंबई विधान परिषद
राष्ट्रीय अध्यक्ष. दिलीप दादा जगताप
अखिल भारतीय मराठा महासंघ
भारतीय कामगार कर्मचारी महासंघ



















