*🍁
जिल्हा प्रतिनिधी पुणे
प्रवीण पप्पू शिंदे
संकलन. दत्ता मोकाशी सर पिंपरी चिंचवड
नामदेव महाराज, यात्रेत एका राजधानीमध्ये मुक्कामाला होते. तेथे त्यांना एक चोर भेटला. पण त्याने नामदेवांचा उपदेश घेतला नाही. नामदेव म्हणाले, ‘मी तुला चोरी करू नये वगैरे काही सांगणार नाही. तु फक्त एक कर. एक पूर्ण दिवस खोटं बोलायचं नाही.’ चोराने तेवढे कबूल केले.
त्या रात्री तो चोरीला निघाला. त्यावेळी वेष पालटून राजाही देखरेखीला निघाला होता. राजा गारुड्याच्या वेषात, राजाने चोराला विचारले, ‘कुठे निघाला? चोराने नामदेवांना खरे बोलावयाचे वचन दिले होते. चोर म्हणाला, ‘चोरी करायला जातोय.’ ते ऐकून राजा चकित झाला! मनात म्हणाला, यांची जरा परिक्षा तर पाहू.
मग दोघांचे असे ठरले की, राजाने चोराला एक गुप्तधन दाखवावे. चोराने चोरावे, आणि दोघांनी निम्मे निम्मे घ्यावे. त्याप्रमाणे राजाने चोराला राजवाड्याच्या मागून, गुप्त वाटेने राजमहालापर्यंत नेले. चोर आत गेला त्याने संदूक फोडली. त्यातली छोटी पेटी उघडली. निघाले तीन हिरे, ते दोघांत कसे वाटणार? म्हणून चोराने त्यातले. दोन हिरे उचलले. बाहेर आल्यावर राजाच्या हातावर एक ठेवून, चोर निघून गेला.राजा त्यांच्या प्रामाणिकपणाचा अचंबा करीत परतला.
दुसऱ्या दिवशी, राजाने प्रधानाला चोरी झाल्याचे सांगितले. प्रधानाने सर्व अट्टल चोर दरबारात हजर केले. राजाने प्रश्न विचारला, ‘चोरी कोणी केली?’ तर हात वर करून ‘मी केली’ असे म्हणत कालचा चोर पुढे आला. राजा पुन्हा चकित झाला. राजाने प्रधानाला हिऱ्याची पेटी आणायला सांगितली. प्रधान आत गेला. पेटीत पाहिले तर एक हिरा होता. प्रधानाने मनात विचार केला की, एवीतेवी चोर कबूल झालाच आहे, तर आपण हा हिरा खिशात घालावा. त्याने हिरा खिशात ठेवला, आणि बाहेर जाऊन, पेटी रिकामी होती , असे राजाला सांगितले. त्यावर चोराने दरबाराला सगळी हकिगत सांगितली. तीनपैकी दोन हिरे मी चोरले आणि त्यातला एक हिरा वाट दाखवणार्या मित्राला दिला. आणि असे सांगुन आपल्या वाटणीचा हिरा बाहेर काढून ठेवला.
राजाला तिसऱ्यांदा आश्चर्याचा धक्का बसला. राजानेही आपल्या वाटणीचा हिरा बाहेर काढला. आणि चोराला सांगितले की मीच तुझा रात्रीचा वाटेकरी मित्र. आणि प्रधानाकडे वळून तो निर्वाणीने म्हणाला, “मुकाट्याने तिसरा हिरा काढ.” प्रधानाने खिशातून तिसरा हिरा गुपचुप काढुन ठेवला.
राजा चोराला म्हणाला, ‘आज पासून माझा प्रधान तू?”
ते ऐकून चोर पळत सुटला, पण राजाने त्याला पकडले. प्रधानकी देऊनही का पळतोय असे राजाने चोराला विचारले. “महाराज!” तो चोर गयावया करीत म्हणाला, “मला प्रधानकी नको. मी नामदेव महाराजांच्याकडे जातो. त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी एकच गोष्ट केली, तर एका दिवसात मला प्रधानकी मिळाली. त्यांच्या सांगण्याप्रमाणे आयुष्यभर वागलो तर काय मिळेल?
🙏🏻 रामकृष्ण हरी.



















