*
जिल्हा प्रतिनिधी पुणे
प्रवीण पप्पू शिंदे
दिनांक : 1-Jan-26
➖➖➖
जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस (८६ टक्क्यांपेक्षा कमी) पडण्याची शक्यता आहे. तसेच जानेवारी महिन्यात देशात कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याने थंडी कायम राहण्याचा अंदाज आहे. मराठवाडा, विदर्भासह, मध्य प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये थंडीच्या लाटांचा कालावधी अधिक राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.जानेवारी ते मार्च महिन्यातील पावसाचा, तसेच जानेवारी महिन्यातील पाऊस आणि कमाल व किमान तापमानाचा अंदाज हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहापात्रा यांनी गुरूवारी (ता. १) जाहीर केला. जानेवारी महिन्यात जम्मू काश्मिर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशसह वायव्य भारत, पूर्वोत्तर राज्ये आणि दक्षिण द्वीपकल्प वगळता वगळता देशाच्या बहुतांशी भागात किमान तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.यंदा नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासूनच किमान तापमानात घट झाल्याने राज्यात गारठा अधिक आहे. डिसेंबर महिन्यातदेखील तीव्र थंडी अनुभवायला मिळाली. सध्या राज्यात अंशतः ढगाळ हवामान होत असून, गारठा काहीसा कमी झाला आहे. जानेवारी महिन्यात देशाच्या बहुतांशी भागात सरासरीच्या तुलनेत कमी किमान तापमान राहणार असल्याने थंडी कायम राहण्याचे संकेत आहे. महाराष्ट्रात कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र वगळता उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे.हवामान विभागाच्या अंदाजानुसार जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये देशात सरासरीपेक्षा कमी (८६ टक्क्यांपेक्षा कमी) पावसाची शक्यता आहे. या काळात देशाच्या उत्तर भागात सरासरी १८३.३ मिलीमीटर, तर देशात ६९.७ मिलिमीटर पाऊस पडतो. तर जानेवारी महिन्यात उत्तर भारतात सरासरी ४९ मिलीमीटर आणि देशात १७.१ मिलिमीटर पाऊस पडतो. जानेवारीत महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी असले तरी यंदा राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.विषुववृत्तीय प्रशांत महासागरात सध्या सौम्य ‘ला-निना’ स्थिती असून, जानेवारी ते मार्च या कालावधीत एल-निनो सदर्न ऑसिलेशन (एन्सो) तटस्थ स्थितीत येण्याची शक्यता अधिक आहे. तर इंडियन ओशन डायपोल (आयओडी) देखील तटस्थ स्थितीत असून, पुढील काही महिने ही स्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
➖➖➖



















