“
पुणे जिल्हा ( प्रवीण पप्पू शिंदे :
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी तरुणांना उद्देशून आत्महत्या करू नये तसेच व्यसनाच्या आहारी जाऊ नये, असे कडक शब्दांत आवाहन केले आहे. “काम-धंदा केला नाही तर लग्न कसे होणार? मुलगी कशी मिळणार?” असा थेट सवाल करत त्यांनी तरुणांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने स्वतःचे भविष्य घडवावे, असा संदेश दिला.
जरांगे पाटील म्हणाले की, आजच्या परिस्थितीत केवळ अपेक्षा आणि मागण्या करून काही साध्य होणार नाही. तरुणांनी शिक्षण, कामधंदा, व्यवसाय, शेती आणि मेहनत यावर लक्ष केंद्रित करून स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. समाजात जबाबदारीने वागून आयुष्याला दिशा द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी पुढे सांगितले की, शेतीत पैसा आहे, मात्र शेतीत टिकायचे असेल तर शेतीला जोडधंदा करणे आवश्यक आहे. दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, भाजीपाला उत्पादन यांसारख्या पर्यायांमुळे शेतकऱ्यांना नियमित उत्पन्न मिळू शकते.
शेतकरी कुटुंबातील परिस्थितीवर भाष्य करत त्यांनी सांगितले की, जर आत्महत्या थांबवायच्या असतील आणि कुटुंबाचा आधार मजबूत करायचा असेल, तर शेतीतून नियमित उत्पन्न मिळणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी बागायती शेतीकडे वळणे आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले असून राज्यभर चर्चा सुरू आहे. मात्र त्यांनी दिलेला संदेश हा तरुणांना सकारात्मक दिशेने वळवण्यासाठी आणि आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
या वक्तव्यातून त्यांनी तरुणांना एकच स्पष्ट संदेश दिला की, “आत्महत्या नको, व्यसन नको, मेहनत करा, कामधंदा उभा करा आणि आयुष्य घडवा.”















