-असा:—
जिल्हा प्रतिनिधी पुणे प्रवीण पप्पू शिंदे
‘ चंबळ ‘नदी ही भारतातील स्वच्छ नद्यांपैकी एक नदी म्हणून ओळखली जाते. प्रचीन हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये ‘ चर्मण्वती ‘ असे नामोल्लेखित आहे.राजस्थान,मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेश या तीन राज्याच्या सीमेवर वाहणारी ही ‘चंबळ’ नदी ” राष्ट्रीय चंबळ अभयारण्याची जीवनदायिनी आहे.जे
जगातील सर्वांत मोठ्या नदीतील संरक्षित क्षेत्रापैकी एक मानले जाते.हे अभयारण्य गंभीररीत्या विलुप्तप्राय
‘ घरियाल ‘ अर्थात ‘सुसर ‘ (Gavialis gangeticus) चे शेवटचे आणि महत्वाचे आश्रयस्थान आहे.
गंगा नदीच्या खोर्यात असलेला सुमारे ६१० किलोमीटर लांबीचा पट्टा चंबळ नदीचा आहे.जागतिक संख्येच्या तुलनेत सुमारे ८० टक्के सुसरी चंबळ मध्ये राहतात. ‘सुसर’ प्रजातीचे पुनरूज्जीवन करण्याचा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून १९७५मध्ये गंगा नदीच्या खोर्यात असलेला चंबळ नदीचा पट्टा “राष्ट्रीय चंबळ अभयारण्य ‘ म्हणून घोषित करण्यात आला. राष्ट्रीय चंबळ अभयारण्य हे केवळ सुसरींचे नाही तर गंगा नदीचे डाॅल्फिन,रेड क्राऊन रूफ टर्टल, पाणचिरा आणि पाणमांजर यासहित अनेक दुर्मिळ प्रजातींचे घर आहे.
नदीतील वाळूचे किनारे हे केवळ सुसर आणि मगरींना ऊन शेकण्यासाठी नव्हे,तर अंडी घालण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात.सुसर पुनर्वसन मानवी दबावांमुळे धोक्यात आले आहे. सर्वात मोठा थेट हल्ला बेकायदेशीर वाळू खाणकाम यांचा आहे. जवळपास आठशेहून अधिक वाळू उपसा करणारे ट्रेलर आणि ट्रॅक्टर या चंबळ खोर्यात केवळ राजस्थानमधून पकडण्यात आले आहेत.सुसरींसाठी अत्यावश्यक असलेले वालुकामय किनारे आणि अंडी घालण्याच्या जागा हे खाणकाम नष्ट करते.नदीचा प्रवाह बदलते आणि संपूर्ण परिस्थितिकीय व्यवस्था धोक्यात आणते.
नदीवर बांधलेली धरणे वरच्या भागातून येणारी नवीन वाळू अडवून धरतात, ज्यामुळे खालच्या प्रवाहात वाळूचे थर कमी होत चालले आहेत.
नदीकाठची शेती आणि मासेमारी यामुळे सुसर आणि मगर यांचे अधिवास नष्ट होत आहेत.सुसरी मासेमारीच्या जाळ्यात अडकून मरतात.सोबतच अवेळी धरणातून प्रवाहित होणारे पाणी विणीच्या काळातील या प्रजातीची अंडीदेखील वाहून नेतात. चंबळचे भविष्य हे केवळ दोन प्रजातींचेच नाही तर संपूर्ण नदी परिस्थितिकीय व्यवस्थेचे आहे.यशस्वी संवधर्नासाठी बेकायदेशीर वाळूउपसा आणि मासेमारीविरूद्ध कायदेशीर अंमलबजावणी होण्याची आवश्यक आहे.स्थानिक समुदायांना संवर्धनप्रक्रियेत सामील करून घेणे,सुसर आणि मगर या दोन्ही प्रजातींच्या संख्येचे वैज्ञानिकदृष्ट्या निरीक्षण करणे,सोबत राजस्थान,मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या तिन्ही राज्यांमध्ये प्रभावी समन्वय साधणे आवश्यक आहे.चंबळ नदी आणि या नदीतील ‘सुसर ‘ हे केवळ आपल्या नैसर्गिक वारसाचाच भाग नाहीत तर ते नदीच्या आरोग्याचे सूचक आहेत.सुसरींची वाढती लोकसंख्या हे सिद्ध करते की समर्पित प्रयत्नांनी विलुप्तप्राय धारेवरचे प्राणीसुद्धा परत येऊ शकतात.
दशकापूर्वी सुरू झालेल्या ‘ प्रकल्प मगर ‘ सारख्या संवंर्धन प्रयत्नांमुळे घरियालची अर्थात सुसरची लोकसंख्या १९७९ मध्ये काहीशेवरून २०२५ पर्यंत २ हजारांपेक्षा जास्त झाली आहे.ही उल्लेखनीय बाब असली तरी वैज्ञानिक अभ्यासाने असे सूचित केले आहे,की अभयारण्यात मगरीची संख्या दरवर्षी सुमारे १०.६ टक्के या वेगाने वाढत आहे,ज्यामुळे भविष्यात येथे अन्न आणि अधिवास यांसाठी स्पर्धा निर्माण होईल.लेखक तथा ‘वाइल्डलाइफ कझर्वेशन ट्रस्ट’संस्थेतील फील्ड बायोलाॅजिस्ट प्रदीप नामदेव चोगले यांनी राष्ट्रीय चंबळ अभयारण्याच्या अनुषंगाने लेखात तपशीलात विशद केलेली ही अभ्यासपूर्ण माहिती खरोखरच उल्लेखनीय,वाचनीय,
विचारप्रवर्तक,अनभिज्ञ वाचकांच्या ज्ञानात भर घालणारी व संबंधित जबाबदार घटकांना अंतर्मुख करणारी ठरते हे मात्र तितकेच खरे!———————पत्रकार श्री प्रवीण पप्पू शिंदे
राज्य उपाध्यक्ष. राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश
















