*
*खेळाडू, शिवसैनिक, जिल्हाप्रमुख, नेते, नगराध्यक्ष, महापौर, खासदार एक धावता आलेख*
*(तुषार राजे)*
अलिकडे आपण सॅटीस, मेट्रो ही नावे आणि त्याचे श्रेय घेण्याची चढाओढ पाहतो. परंतु सॅटीस व मेट्रोचा खरा पाया सतिश प्रधान यांच्या नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत रचला गेला. ठाण्याचे खर्या अर्थाने भाग्यविधाते म्हणून सतिश प्रधान यांचेच नाव घ्यावे लागेल. आपल्या आयुष्याची सुुरुवात कबड्डी व खो-खो खेळाडू नंतर महाराष्ट्र संघातील कबड्डी खेळाडू. ते शिवसेनेचे नेते सतिश प्रधान यांच्या सहवासातील हा धावता आलेख.
शिवसेना-भाजपची युती अगदी अलीकडे तुटल्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटले. परंतु संघ भाजपाबाबतीत हा अनुभव शिवसेनेला नेहमीचाच ठरला होता.ठाण्यातून सुरुवात झाली.नंतर नंतर नवी मुंबई, संभाजीनगरातही असेच घडले होते.
१९६८ साली शिवसेनेने पहिल्यांदाच ठाणे नगरपालिकेची निवडणूक लढवली होती. तेव्हाच्या जनसंघाशी युती व्हावी अशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. जनसंघाबरोबर कोणी किती जागा लढवाव्यात याची बोलणी सुरू होती. ठाणे नगरपालिकेत एकूण ४२ नगरसेवक होते. पैकी सेनेने २५ जागा मागितल्या व १७ जागा जनसंघाला देण्यास देण्यात तयार होते. परंतु जनसंघाने वाटाघाटी आणि चर्चेचा घोळ उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत घालत ठेवला. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेला निरोप पाठवला की, तुमचं आमचं जमणार नाही. शिवसेनेचे कार्यकर्ते राजकारणात नवखे होते.आयत्या वेळेस धावपळ करून शिवसेनेला उमेदवार शोधावे लागले.त्या सर्व उमेदवारांमध्ये तरुण चेहरा होता तो म्हणजे सतीश प्रधान यांचा.
उमेदवारी अर्ज भरायला फक्त चार तास बाकी होते आणि मिळेल त्याला उमेदवारी देणे सुरू झाले. एखाद्या प्रभागात जो जो इच्छुक आहे त्याला उमेदवारी दिली. ४२ पैकी १८ नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले. त्यानंतर काही अपक्षांनी शिवसेनेला मदत केली. त्यात प्रमुख म्हणजे नंतर आमदार झालेले कांती कोळी, मारोतराव शिंदे, पांडुरंग कोळी, अॅड.सदानंद भीसे वगैरेंनी शिवसेनेला मदत केली. आणि ठाण्याचे शिवसेनेचे पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान घंटाळी भागातून निवडून आलेल्या वसंतराव मराठे यांना लाभला. वसंतराव मराठे यांच्यानंतर मारोतराव शिंदे यांना शिवसेनेने नगराध्यक्ष केले. नगराध्यक्षपद संपल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पाठोपाठ अँड. अरविंद दीक्षित यांना नगराध्यक्ष केले. त्यानंतर त्यांची बहीण शालिनी भोईर यांनाही नगराध्यक्ष केले. या सर्वांनी आपली पदे गेल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माणसे पारखून घेतली नसल्याने शिवसेना नगरसेवकांची संख्या कमी होत होती. परंतु सतीश प्रधान व अन्य तरुण नगरसेवकांनी त्या काळातही शेवटपर्यंत संघटना टिकवून ठेवली.
ठाण्याचे शिवसेनेचे पहिले शहरप्रमुख डॉक्टर विजय ढवळे यांना अचानक कायमस्वरूपी परदेशात जावे लागले. त्यामुळे त्यांनी शहरप्रमुखपद सोडले आणि नाना प्रधान यांना ठाणे शिवसेनेचे शहरप्रमुखपद देण्यात आले. नाना प्रधान एका कारखान्यात नोकरी करत असल्याने दिवसभर ठाणे शहराबाहेर असत, त्यामुळे नगरसेवक आणि शहरप्रमुख या दोन्हीची जबाबदारी सतीश प्रधान यांच्यावर पडली. पूर्वीच्या अनुभवानंतर सतीश प्रधान यांनी संपूर्ण शहरात शिवसेना संघटना बांधली. त्या काळात शिवसेनेतर्फे निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये प्रामुख्याने म. ए. तथा नाना गुप्ते, वसंतराव मराठे, मोरेश्वर जोशी, रत्नाकर गुप्ते, उत्तम आंग्रे, सुधाकर बक्षी, विजय चिटणीस, विजय दोंदे, नाना प्रधान, एकनाथ नाफडे, प्रभाकर गुजराथी, सतीश प्रधान, अरविंद दीक्षित, सहदेव ढमाले, शालिनी भोईर, कुसूम गोखले इत्यादी इत्यादी नगरसेवक होते. खर्या अर्थाने त्यावेळी शिवसेना टिकवून ठेवण्याचे काम सतीश प्रधान, नाना प्रधान, मनोहर गुप्ते इत्यादींनी केले.
*गाढवावरून धिंड आणि शिवसेनाप्रमुखांना दंड*
ठाणेकरांनी शिवसेनेला सर्वप्रथम सत्ता दिली. शिवसेनेचे पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान वसंतराव मराठे यांना मिळाला. त्यानंतर मारोतराव शिंदे यांना शिवसेनाप्रमुखांनी नगराध्यक्ष केले. १९६८ झाली झालेल्या नगरपालिका निवडणुकीत नवख्या शिवसेनेला अगदी आयत्या वेळी उमेदवार शोधावे लागल्याने त्यांचा पूर्व इतिहास पाहिला नाही. त्यापैकीच एक मारोतराव शिंदे. हे मूळ काँग्रेसचे होते. परंतु त्यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली. निवडून आले, नगराध्यक्ष झाले. त्यांना पुन्हा नगराध्यक्षपद हवे होते. परंतु शिवसेनाप्रमुखानी अॅडव्होकेट अरविंद दीक्षित यांना नगराध्यक्ष केले. त्यामुळे मारोतराव शिंदे नाराज झाले व त्यांनी शिवसेना सोडली.
त्याकाळी पक्षांतर बंदी वगैरे प्रकरण नव्हतं. कोणीही केव्हाही कसेही पक्षांतर करीत असत. त्याला कोणतेही बंधन नव्हते. तसेच शिवसेनेची राजकीय पक्ष म्हणून नोंदणी झाली नव्हती. शिवसेनेची व्याप्ती मुंबई, ठाणे, कल्याण, अंबरनाथ एवढीच मर्यादित होती. मारोतराव शिंदे यांच्या रूपाने पहिल्यांदाच शिवसेनेतून कोणीतरी बाहेर पडले होते . शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जबर धक्का बसला. त्यांनी घोषणा केली, मारोतराव शिंदे यांची गाढवावरून धिंड काढणार. परंतु महाराष्ट्र शासनाने शिंदे यांना सर्व प्रकारचे संरक्षण पुरवले होते. त्यामुळे धिंड कशी काढायची हा प्रश्न ठाणेकर शिवसैनिकांना आणि विशेषत: त्याकाळी अग्रेसर असलेल्या सतीश प्रधान यांना पडला होता. धिंडीची संपूर्ण जबाबदारी सतीश प्रधान यांच्यावर सोपवण्यात आली होती. पोलिसांना काही न कळता अचानक धिंड काढायची असे ठरले.
त्याप्रमाणे जुन्या नगरपालिकेजवळ एक गाढव आणण्यात आले. त्या गाढवाला सजवण्यात आले. आयत्या वेळेस गडबड नको म्हणून गाढवावर बसविण्यासाठी एक प्रतिकृती आणली होती. परंतु उत्साही शिवसैनिकांनी प्रतिकृती न बसविता थेट शिंदेंना आणले आणि गाढवावर बसविले. चपलांची माळ घालण्यात आली. सर्वात विशेष म्हणजे या धिंडीसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी, दत्ताजी साळवी रेल्वेने ठाण्यात आले होते. काही काळ त्यांची धिंड काढण्यात आली. नंतर गाढवावर त्यांची प्रतिकृती बसविण्यात आली. धिंडीची तिरडी शिवसेनाप्रमुखांनी पकडली होती. वाजत गाजत आणि निषेधाच्या घोषणा देत ती धिंड जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचली. तेथे शिवसेनाप्रमुखांचे तडाखेबंद भाषण झाले. धिंड संपली आणि पोलिसांनी त्या विरोधात गुन्हा दाखल केला. सर्वात विशेष म्हणजे त्या गुन्ह्याची सुनावणी अवघ्या सहा महिन्यात झाली आणि शिवसेनाप्रमुख व सतिश प्रधान यांना ठाणे न्यायालयाने दंड ठोठावला होता.
*प्रबोधनकारांनीही काढली होती धिंड.*
यानिमित्ताने आणखी एक आठवण म्हणजे प्रबोधनकार ठाकरे कल्याणमध्ये राहत असताना त्यांनीही गाढवावरुन वेगळ्या प्रकारची धिंड काढली होती. त्याकाळी त्यांनी हुंडा विरोधी चळवळ सुरु केली होती. कल्याणमधील एका प्रसिध्द सावकाराने हुंडा घेऊन मुलाचे लग्न ठेवले होते. अनेक प्रतिष्ठित व ब्रिटीश व्हाईसरायसह प्रबोधनकारांनाही लग्नाचे आमंत्रण होते. प्रबोधनकार त्या लग्नाला गाढवावर बसून गेले होते. हुंडा परत करा तरच माझा मित्र परत जाईल अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर ठाकरे परिवारावर सामाजिक कल्याणमध्ये बहिष्कार टाकण्यात आला होता.
*सतीश प्रधान यांनी सुरू केले जिल्हा कार्यालय*
सतीश प्रधान यांची ठाणे जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्यानंतर शिवसैनिकांचा त्यांच्या उतळसर दिक्षित चाळीतील घराकडे ओघ सुरू झाला. चाळीतले घर, बाहेरचा ओटा, तिथेच येणार्या कार्यकर्त्याची बैठक होत असल्याने जागेची कमतरता भासू लागली. संपूर्ण जिल्ह्यातील शिवसैनिक ठाणे शहरात येऊ लागले. आणि मग सतीश प्रधान यांनी पुढाकार घेऊन तलाव पाळी येथील लालबाग, डॉ. मूस रोड भागात शिवसेनेचे ठाणे जिल्हा कार्यालय सुरू केले.
त्या कार्यालयाला जागा मिळवण्यापासून नगरपालिकेची रीतसर परवानगी घेऊन ते कार्यालय सतीश प्रधान यांच्या नेतृत्वाखाली बांधण्यात आले. ठाणे जिल्हा शिवसेनेचे कार्यालय म्हणून त्याची एक ओळख निर्माण झाली. अनेक दिवस त्या कार्यालयात, कार्यालय प्रमुख म्हणून नगरसेवक गुजराथी काम पाहत असत. सतीश प्रधान संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत कार्यालयात बसून शिवसैनिकांच्या नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करीत असत. याच कार्यालयात १५ ऑगस्टचे झेंडावंदन रात्री बारा वाजून एक मिनिटांनी सुरू करण्याची पद्धत सतीश प्रधान यांनी सुरू केली. सुरुवातीची काही वर्षे संपूर्ण जिल्ह्यातून शिवसैनिक या झेंडावंदनासाठी येत असत. परंतु पुढे पुढे प्रत्येक शहरात शिवसेनेच्या शाखा सुरू झाल्या आणि तेथे झेंडावंदन सुरू झाले. ठाणे शहरात जिल्ह्यातून येणार्या शिवसैनिकांचा ओघ कमी झाला आणि फक्त ठाणे परिसरातून शिवसैनिक या झेंडावंदनासाठी जमत. ती परंपरा पुढे आनंद दिघे यांनी सुरू ठेवली. ती आजही सुरू आहे.
ठाण्यात शिवसेनेचे मुख्य कार्यालय तेही तलावपाळीसारख्या मुख्य रस्त्यावर सुरू करण्याचे श्रेय सतीश प्रधान यांना जाते. सर्वात विशेष म्हणजे हे कार्यालय कोणाच्याही नावावर न घेता शिवसेनेच्या नावावर घेऊन ते सुरू केले होते. आज ते कार्यालय शिंदे गटाने ताब्यात घेतले आहे.
सतीश प्रधान कायम शिवसैनिकांना मदत करण्यासाठी धावत असत मग तो शिवसैनिक ठाणे शहरातील असो वा जिल्ह्यातील. संपूर्ण जिल्हाभर सतीश प्रधान यांचा संचार असे. त्याकाळी जिल्हाप्रमुखांना जीप तथा चार चाकी वाहन देण्याची पद्धत नव्हती. त्यामुळे अनेक वेळा एसटी किंवा रेल्वेने प्रवास करावा लागत असे.
ठाणे जिल्ह्यातील डहाणू तलासरी भागात डाव्या कम्युनिस्टांचे प्राबल्य होते. कम्युनिस्ट सहसा कोणालाही या भागात शिरकाव करू देत नसत. संघाच्या मंडळींनी वनवासी आश्रमाच्या माध्यमातून तेथे काम सुरू केले होते. परंतु डाव्या कम्युनिस्टांची दहशतच एवढी होती की, उघडपणे काम करण्यास कोणीही धजावत नव्हते. अशा वेळेस सतीश प्रधान यांनी पुढाकार घेऊन त्या भागात शाखांचे जाळे निर्माण केले. दिव, दमण, उधवा येथे शिवसेनेची सभा होती आणि त्या सभेवर डाव्या कम्युनिस्टांनी जोरदार हल्ला केला. अनेक शिवसैनिक त्या हल्ल्यात जखमी झाले. सतीश प्रधान यांच्यावरही हल्ला करण्याची योजना होती. परंतु शिवसैनिकांनी कडे करून सतीश प्रधान यांच्यावर हल्ला होऊ दिला नव्हता. त्याही परिस्थितीत कम्युनिस्टांचा बालेकिल्ला असलेल्या उधवा गावात सभा यशस्वी करून दाखविली. डहाणू, तलासरी, मोखाडा परिसरातील अनेक भागात शिवसेना शाखा सुरू करण्याचा झपाटा लावला होता.
सतीश प्रधान अनेक वेळा रात्री उशिरा कल्याणला येत असत व तेथून एसटीने कोन येथे साबीर शेख यांच्या घरी अनेवâ शिवसैनिक एकत्र येऊन जात असत. कितीही माणसं व कितीही उशीर झाला तरीही साबीर शेख यांच्या भाभी सर्वांसाठी स्वयंपाक करीत असत.आणि त्यानंतर रात्री शेवटची गाडी पकडून सतीश प्रधान ठाण्याला जात असत.
ठाणे शहराचा कायापालट झाला.
सतिश प्रधान नगराध्यक्ष असतांना गावदेवी मैदानात एकदा शिवसेनाप्रमुखांची सभा होती. एका ठाणेकर नागरिकाने शिवसेनाप्रमुखांना भरसभेत चिठ्ठी पाठवली आणि सांगितले ठाण्यामध्ये नाट्यगृह नाही, खेळाचे मैदान नाही. कोणत्याही सुविधा नाहीत. त्या क्षणी बाळासाहेबांनी जाहीर केले, की नगराध्यक्ष म्हणून सतीश प्रधान बसले आहेत. तुमची अपेक्षा नक्की पूर्ण करतील असे शिवसेनाप्रमुखांनी सांगितले आणि ठाणे शहरात गडकरी रंगायतन, दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह, तरण तलाव, मोठे रस्ते इत्यादी इत्यादी अनेक सुधारणा होत गेल्या.
*नाट्यगृह व स्टेडियमला विरोध*
ठाण्यात नाट्यगृह व स्टेडियम उभे करण्याची प्रक्रीया सुरु झाली. निविदाही मंजूर झाल्या. परंतु ठाणे जनसंघाने या दोन्ही प्रकल्पांना प्रखर विरोध केला. ठाणेकरांच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्याऐवजी नाट्यगृह, स्टेडियमसारखे पांढरे हत्ती का पोसता असा सवाल करीत जनसंघाने लाक्षणिक उपोषण केले. ठाणे जनसंघाचे अध्यक्ष पां. वा. घारपुरे न्यायालयात गेले. न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली. या प्रकारामुळे दोन्ही प्रकल्पाचे काम काही महिने पुढे गेले.
*सीकेपी बँक वाचविली.*
आत्ता जशी सीकेपी बँक अडचणीत आली आहे तशीच पूर्वीही आली होती. त्यावेळेस सुधीरभाऊ जोशी यांनी शिवसेनाप्रमुखांकडे सीकेपी बँक वाचवण्याची विनंती केली. त्या समयी शिवसेनाप्रमुखांनी नगराध्यक्ष असलेल्या सतीश प्रधान यांना लक्ष घालण्यास सांगितले आणि सतीश प्रधान यांच्या पुढाकाराने त्याकाळी डबघाईस आलेली सीकेपी बँक वाचवण्यात यश आले. ठाणे नगरपालिकेच्या नगराध्यक्षाला मोठे अधिकार होते. ठाणे नगरपालिकेची अनेक खाती सीकेपी बँकेत वर्ग करण्यात आली होती. तसेच ठाण्यामध्ये असलेल्या अडवाणी ऑर्लीकॉन या कंपनीतील कामगारांना सीकेपी बँकेचे भाग भांडवल घेण्यास भाग पाडले. बँक वाचवण्यात सतीश प्रधान यांनी पुढाकार घेतला होता
*इंग्रजी परिपत्रकांना नकार*
सतीश प्रधान नगराध्यक्ष असताना शासनाकडून येणार्या इंग्रजी भाषेतील परित्रकांचा स्वीकार करण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यामुळे शासनाने त्यांच्यावर नोटीस बजावली. हवं तर मला बडतर्फ करा परंतु मी फक्त मराठी परिपत्रके स्विकारणार असे सतिश प्रधान यांनी जाहीर केले होते. त्यावेळी ठाण्यात अनेक सर्वपक्षिय मंडळींनी सतीश प्रधान यांच्या भूमिकेला पाठींबा देणारी मोहीम राबविली होती, रोज चौक सभा असत.
*इमारती भुईसपाट*
रस्ता रुंदीकरण व अनेक विकासकामांसाठी तसेच नागरीकांच्या तक्रारी असलेल्या अनधिकृत ईमारतींवर कठोर कारवाई सतीश प्रधान यांच्या नगराध्यक्ष कारकीर्दीत झाली.नौपाडा येथे त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या मेव्हण्याची इमारत रेल्वे स्टेशन जवळील गोखले रोड येथे भररस्त्यात होती. त्या इमारतीचा वाहतूकीस प्रचंड अडथळा ठरत होता. सतिश प्रधान नगराध्यक्ष झाल्यानंतर एका रात्रीत ती इमारत भुईसपाट करून तेथे अत्यंत उच्च प्रतीचा रस्ता तयार केला. रात्रीतून नष्ट झालेली वादग्रस्त इमारत आणि नवाकोरा रस्ता पाहण्यासाठी ठाणेकर मोठ्या संख्येने त्या ठीकाणी भेट देऊन प्रचंड गर्दी करीत होते. त्यानंतर सतिश प्रधान यांनी ठाण्यातील सर्वच रस्ते उच्च प्रतीचे केले, ते पाहून मुंबईचे नागरिकही आश्चर्यचकीत होत होते.
शिवसेनेचे पहिले जिल्हाप्रमुख मो.दा. जोशी होते. त्यानंतर सतीश प्रधान यांच्याकडे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी आली. सतीश प्रधान यांनी ठाणे शहर व जिल्ह्यात कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी केली. त्यापैकी आनंद दिघे हे एक आहेत. ठाणे जिल्ह्यातील गावागावात शिवसेना पोहोचविण्याचे काम सतीश प्रधान यांनी केले.आनंद दिघे हे त्या काळात २४ तास सतीश प्रधान यांच्याबरोबर असत. त्याच काळात १९७० साली झालेली भिवंडी दंगल व इतर अनेक प्रकरणात सतीश प्रधान आणि शिवसैनिकांनी मोठी भूमिका बजावली होती.
*भिवंडी दंगल, दोन-दोन मुख्याधिकारी,*
१९७० सालातील शिवजयंतीसमयी भिवंडीत दंगल होणार याची कुणकुण आधीपासूनच लागली होती. काही जात्यंधांनी तशी पूर्वतयारी केल्याची बातमी सर्वत्र पोहचली होती. भिवंडीत आपल्या लोकांना दगाफटका होवू नये त्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला. सतिश प्रधान यांनी भिवंडीतील दिलीप ताम्हाणे यांच्या घरी एक बैठक आयोजित केली होती. दिलीप ताम्हाणे ठाणे जिल्हा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख होते. त्याकाळी कार्यरत असलेल्या शिवसैनिकांमध्ये `सधन’ म्हणून दिलीप ताम्हाणे यांची ओळख होती. भिवंडीतील प्रभू आळीत त्यांचा बंगला होता. तेथेच बैठक पार पडली. जिल्हातील महत्त्वाचे आणि मोजकेच कार्यकर्ते उपस्थित होते. आपल्या लोकांचीही पूर्वतयारी हवी म्हणून काही निर्णय घेण्यात आले. वांगणी येथील एका लोहाराला भेटून पूर्वतयारीची सामुग्री तयार करण्यात आली. ती सर्व सामुग्री दिलीप ताम्हाणे यांच्या गच्चीवर साठवून ठेवण्यात आली. १९७०च्या भिवंडी दंगलीत आपल्या लोकांनी मार न खाण्याचे किंवा संरक्षण होण्याचे प्रमुख कारण म्हणजे शिवसेनेने केलेलाr पूर्वतयारी हेच होते.
ठाणे नगरपालिकेत निवडून आलेले नगरसेवक आपापल्या प्रभागात कार्यरत होते. सतिश प्रधान, मो. दा. जोशी, नाना प्रधान इत्यांदी मंडळीं प्रत्यक्ष संघटनेच्या/शिवसेनेच्या कामात कार्यरत होती. नगरपालिकेत समाधानकारक काम होत असतांनाच पालिकेची मुदत संपली आणि सुमारे दिड वर्षे मुख्याधिकारी जग्यासी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
१९७४ साली थेट नगराध्यक्षाची निवडणुक जाहीर झाली. थेट नगराध्यक्षपदासाठी ठाण्यातून सतिश प्रधान यांच्या नावाची घोषणा झाली. त्याच वेळेस माझे `पाचोळा’ नावाचे साप्ताहिक सुरु होते. साप्ताहिकाचे निवडणुक काळात दररोज अंक काढून ठाणेकरांच्या घराघरात शिवसेनेचा तथा सतिश प्रधान यांचा प्रचार पोहचविला होता. निवडणुकीत ठाण्यातून सतिश प्रधान यांची थेट नगराध्यक्ष म्हणून प्रचंड मताधिक्यांने निवड झाली. कल्याणला साबीर शेख तर अंबरनाथमध्ये शांताराम जाधव यांचा निसटता पराभव झाला. या निवडणुक मतमोजणीची ठाण्याची जबाबदारी नाना प्रधान यांच्यावर सोपविण्यात आली. सतिश प्रधान यांचा विजय दृष्टीक्षेपात आल्यानंतर त्यांना मामलेदार कचेरीत बोलवून घेण्यात आले. तेथे आल्यानंतर सतिश प्रधान यांनी सर्वांसमोर नाना प्रधान यांना साष्टांग दंडवत घातला.
गोमूत्राने केबीन केली पवित्र
७४च्या निवडणुक आधीपासून ठाणे नगरपालिकेचे प्रशासक म्हणून जग्यासी काम पाहत होते. नंतर तेच मुख्याधिकारी झाले. जग्यासी यांची कारकीर्द वादग्रस्त होती. यापूर्वी उल्हासनगरसह अन्य पालिकांमध्ये त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. जग्यासी ज्या खुर्चीवर बसत होते त्या खुर्चीवर मी बसणार नाही अशी भूमिका सतिश प्रधान यांनी घेतली. त्यानंतर ब्रह्मवृंदांना बोलावून केबिन पवित्र करण्यात आली. गोमूत्र शिंपडण्यात आले. त्यानंतर सतिश प्रधान यांनी नगराध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारला.
*दोन दोन मुख्याधिकारी*
जग्यासी यांची काही दिवसातच बदली झाली. नव्या लोकप्रतिनिधींनी मोरे यांची मुख्याधिकारी म्हणून नेमणुक केली. परंतु शासनाने बा. ह. सूर्यवंशी यांची मुख्याधिकारी म्हणून नेमणुक केली. काही महिने दोन-दोन मुख्याधिकारी पालिकेचे वेतन घेत होते. सूर्यवंशी नव्याने निवडून आलेल्या मंडळींना अजिबात सहकार्य करीत नव्हते. शासनाचे प्रतिनिधी म्हणून वागत होते. वारंवार विनंती करुनही शासनकर्ते सूर्यवंशी यांना परत बोलावून घेत नव्हते. `धिंड’ प्रकरणाने शासनकर्ते भडकले होते. शेवटी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सूर्यवंशी यांच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि सूर्यवंशी यांची पाठवणी करण्यात आली.
*सॅटीस मेट्रोची घोषणा*
आपल्या नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत ठाणे शहरात सॅटीस प्रकल्प व मुंबईची प्रस्तावित मेट्रो ठाणे शहरात आणण्याची घोषणा सतिश प्रधान यांनी केली होती. सुमारे ४० वर्षांनी ती कल्पना आताच्या राज्यकर्त्यांनी आकारात आणली आहे.
थेट पध्दतीने निवडून आलेले नगराध्यक्ष सतिश प्रधान यांनी आपल्या कामाचा धडाका सूरु ठेवला होता. ठाणेकरांना गडकरी रंगायतन किंवा दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह दिसले. संपूर्ण ठाणे शहराचा आमुलाग्र कायापालट करुन सतिश प्रधान यांनी आपण नुसते शिवसैनिक किंवा नेतेच नाही तर उत्तम प्रशासक असल्याचे सिध्द करुन दाखविले. पूर्वी ठाणे रेल्वे स्टेशनपासून टेंभी नाक्यापर्यंत येण्यासाठी अतिशय अरुंद रस्ता होता. त्याचे रुंदीकरण सर्वप्रथम करुन एकेका कामांची कमान रचत गेले. अन्य कोणत्याही नगराध्यक्षाला जमले नाही असे काम करुन दाखविले.
` *अभिरुची’ देशातील पहिले तरंगते हॉटेल*
नगराध्यक्षपदाच्या काराकिर्दीत इतर अनेक कामांबरोबरच कॅसल मिल, श्रीरंगकडे जाणार्या रस्त्याच्या कडेला असलेल्या तलावावर अभिरुची नावाचे भारतातील पहिले तरंगते हॉटेल सतिश प्रधान यांच्या कल्पनेतून उभे राहिले. त्या हॉटेलची तेव्हा संपूर्ण देशभर मोठी चर्चा झाली होती. वास्तुविशारद जठार, शशी डोंगरे, रेमण्डचे -कपूर, मोज्निस हॉटेलचे सादराणी इत्यांदी मंडळी त्या हॉटेलचे भागिदार होती. परंतु हॉटेलची कल्पना व संपूर्ण योजना सतिश प्रधान यांनीच साकारली होती. अनेक बाहेरची मंडळी हे तरंगते हॉटेल पाहण्यासाठी येत असत. याच हॉटेलमध्ये सतिश प्रधान यांच्या झालेल्या पत्रकार परिषदा गाजल्या होत्या. परंतु २००५साली आलेल्या महापुरात ते तरंगते हॉटेल बुडाले आणि अभिरुचीचा कालखंड संपला.
*पत्रकारांचे मित्र-सतिश प्रधान*
पत्रकार आणि शिवसेनेचे नाते विळ्या-भोपळ्याचे होते. सत्तारुढ आणि विरोधीपक्ष नेत्यांचा असा एकही दिवस जात नव्हता की त्यांनी शिवसेनेला लाखोली वाहिली नाही. अगदी विधानसभेतही दररोज शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याविरोधात चर्चा घडवून आणली जात असे. सर्वच वर्तमानपत्रात त्याची रसभरीत वर्णने छापून येत असत.
ठाणे शहरात मात्र वेगळी परिस्थिती होती. नगराध्यक्षपदाच्या संपूर्ण पाच वर्षाच्या कालखंडात शिवसेना आणि सतिश प्रधान यांच्याविरोधात ठाण्यातून एकही बातमी प्रसिध्द झाली नव्हती. पत्रकार मित्र अशी `सतिश प्रधान’ यांची ओळख होती. त्या काळातील कृ.वि. पेठे, सहस्त्रबुध्दे, रामकृष्ण्न, जोग, नेर्लेकर इत्यांदी अनेक पत्रकार दररोज नगरपालिकेत येत असत. सतिश प्रधानही त्यांच्या सुखदु:खात सहभागी होत असत.
सतिश प्रधान यांची थेट नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर झाली आणि मी व आनंद दिघे यांनी त्यांचे परिचय पत्र व इतर सामुग्री तयार केली होती. भास्कर पुसाळकर यांच्या हॉटेलमध्ये सुमारे चार-पाच तास सतिश प्रधान, आनंद दिघे व मी असे तीघे मिळून संपूर्ण सामुग्री तयार करीत होतो. नंतर लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. सतिश प्रधान यांच्यावर दक्षिण व इशान्य मुुंबई लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. दक्षिण मुंबईतून शिवसेनेतर्पेâ गोदरेज कंपनीचे मालक नवल टाटा लोकसभेचे उमेदवार होते. नवल टाटा यांचे संपूर्ण परिचय पत्रक इंग्रजीमध्ये करायचे होते. सतिश प्रधान यांनी ती जबाबदारी ठाण्याचे पत्रकार रामकृष्णन् यांच्यावर सोपविली व रामकृष्णन् यांनी त्वरीतच ती सर्व छपाई सामुग्री काही वेळातच करुन दिली होती.
*लोकसत्ताचा दर हवा*
माझ्या पाचोळा साप्ताहिकाला ठाणे नगरपालिकेच्या जाहिराती सुरु झाल्या. परंतु जाहिरातीचा दर काय ठेवायचा हा प्रश्न होता. त्याकाळी, शासन यादी, शासकीय दर इत्यांदी प्रकार नव्हते. त्यामुळे पाचोळा साप्ताहिकाला कोणता दर द्यायचा ? तेव्हाचे अधिकारी नरसिंह शेणोलीकर यांना सतिश प्रधान यांची बोलावून घेतले व जाहीरात दराबाबत विचारणा केली. त्याच वेळेस सतिश प्रधान यांनी लोकसत्ताचा किती दर आहे अशी विचारणा केली. त्यावर शेणोलीकर यांनी वीस रुपये असल्याचे सांगितले. सतिश प्रधान म्हणाले आमचा पेपरही त्यापेक्षा कमी नाही. जो दर लोकसत्तेला तोच दर पाचोळा साप्ताहिकाला द्या. त्याप्रमाणे वीस रुपये दर ७४ साली पाचोळा साप्ताहिकाला मिळाला होता.
पाचोळा साप्ताहिकाला ठाणे नगरपालिकेच्या जाहिराती सुरु झाल्यानंतर एक ज्येष्ठ पत्रकार चांगलेच भडकले. ते सतिश प्रधान यांच्याकडे आले. त्यांनी पाचोळाला जाहिराती का देता? आणि एवढा दर वगैरे विचारणा केली. त्यावर सतिश प्रधान यांनी शांतपणे त्या ज्येष्ठ पत्रकाराला सांगितले की, तुम्ही कधी माझ्याकडे जाहिराती मागायला आलात आणि मी दिल्या नाहीत असे घडले आहे का? त्याला का देता असे विचारण्यापेक्षा मला का नाही असे सांगा. रितसर अर्ज करा, तुम्हालाही देतो असे सांगत त्या पत्रकाराला शांत केले. सतिश प्रधान महाराष्ट्रातील सर्व नगराध्यक्षांचे अध्यक्ष होते. एके दिवशी अंबरनाथचे नगराध्यक्ष प्रभाकर नलावडे सतिश प्रधान यांना भेटण्यासाठी आले असता सतिश प्रधान यांनी माझ्या समोरच नलावडे यांना सांगितले की, पुढील आठवड्यापासून अंबरनाथ नगरपालिकेच्या जाहिराती मला पाचोळामध्ये दिसल्या पाहिजेत.
१९७६ साली देशात आणिबाणी लागू झाली, मुंबईसह राज्यात शिवसेनेविरोधी वातावरण तयार करण्यात सत्तारुढ आणि विरोधी दोघेही आघाडीवर होते. राज्य शासनाचा ससेमिरा शिवसेनेमागे लागला होता. साप्ताहिक मार्मिकच्या विरोधातही या मंडळींनी मोहिम सुरु केली होती तेव्हा मार्मिकसाठी जास्तीत जास्त जाहिराती फक्त ठाणे शहरातून जात होत्या.
नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ यशस्वी पूर्ण केल्यानंतर ठाणे, नवी मुंबई व कल्याण महापालिकेची घोषणा करण्यात आली. ठाण्यात कळवा, मुंब्रा, दिव्यासह सर्व ग्रामीण भागाचा समावेश करण्यात आला. दोन तीन वर्षाचा प्रशासकाचा कार्यकाळ संपला आणि ठाणे महापालिका निवडणु



















