जिल्हा प्रतिनिधी पुणे
प्रवीण पप्पू शिंदे
जगभर अनेक संस्थांनी,विद्याशाळांनी,संशोधकांनी माहिती देणार्या ‘सोशल मीडिया’ या विषयाचा अभ्यास केला आहे. दुष्परिणाम होतो यावर सर्वांच एकमत आहे.सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरवल्या जातात,विकृत आणि द्वेषाला चिथावणी देणारा मजकूर व चित्रफिती पसरवल्या जातात,हे सोशल मीडियाही नाकारू शकत नाही. सोशल मीडिया भडकावत असल्यामुळेच अमेरिकेत,युरोपात आणि भारतात तरूण हिंसेला प्रवृत्त होताना आढळत आहेत.मुलं वाचेनासी झालीत,विचार करत नाहीत,विश्लेषण करत नाहीत,कोणीतरी दिलेला मजकूर मुलं गिळतात असा जगभरातील शिक्षकांचा अनुभव आहे. सौदर्यांबद्दल,
फिटनेसबद्दल असत्य आणि अवैज्ञानिक मजकूर सोशल मीडियात येतो;परिणामी मुलं खंतावतात,विकृत होतात,गंडानं पछाडली जातात,आत्महत्या करतात.आईबाप,
सीनियर,शिक्षक,शहाणी माणसं इत्यादी सर्वांना फाट्यावर मारून मुलं सोशल मीडियाच्या सांगण्यानुसार वागतात. मुलांचंच नव्हे तर प्रौढांचेही मनस्वास्थ्य बिघडत चाललेलं आहे. जगभर तणाव आणि ढासळलेला मानसिक तोल यांचे बळी समाजात तीस चाळीस टक्क्यांच्या पलीकडं निघाले आहेत. वरील निरीक्षण आणि अभ्यास प्रसिद्ध झाल्यावरही सोशल मीडियावाले सुधारायला तयार नाहीत.
योग्य मचकूर आपण प्रसारित करू असं आश्वासन सोशल मीडिया देतं,पण याच कंपन्यांनी मजकुराचं खरेखोटेपण आणि योग्यायोग्यता तपासणार्या लोकांना नोकरीवरून कमी करून टाकलंय.अमेरिकन संसदेनं सोशल मीडियावर नियंत्रण आणण्यासाठी कायदा करण्याचं ठरवलं,त्यावर संसदेत विचार चालू आहे.सोशल मीडिया कंपन्यांनी या कायद्याला विरोध केला आहे.सोशल मीडियाला अनिर्बंध वागण्याची इच्छा आहे. कुंपण नसलेलं,एकही दरवाजा नसलेलं मैदान असं सोशल मीडियाचं रूप झालयं.सोशल मीडिया आणि तो मीडिया तयार करणार्या एआय कंपन्यांकडच्या रकमेवर मोजताही येत नाहीत इतकी शून्य वाढत चाललीयत.आमदार,
खासदार त्यांच्या पैशांवर निवडून जातात, सत्ताधारी पक्ष आणि विधीमंडळं त्यांच्या पैशावर चालतात.पुढारी ओंजळी करून त्यांनी वाटलेले द्रव पिण्यासाठी सज्ज असतात.त्यांनी कोणी हात लावू शकत नाहीत.
चिंतेचा होऊन बसलेला सोशल मीडिया परग्रहावरून आलेला नाही.याच समाजानं तो तयार केलाय आणि हाच समाज त्याचा बळी झालेला आहे,त्यामुळंच मामला फार गुंत्याचा आहे.मुलांचं म्हणजे उद्याच्या समाजाचं मानसिकच नव्हे तर शारीरिक आरोग्यही आता चिंतेचा विषय होतोय.ही स्थिती आली याचं कारण समाजाचं स्वास्थ्य टिकवणार्या संस्था केवळ पैसा मिळविण्याचे उद्योग झालेत.या उद्योगांवर पोसलेल्या लोकांना आपणच प्रतिष्ठा देतोय, त्यांच्या हाती सत्ता सोपवतोय.सोशल मीडियाच्या बंदीच्या विरोधात एक मुद्दा मांडला जातो.बंदीचा अंमल कसा करणार? मुलांना चटक लागलीय, ती हुशार आहेत,ती पळवाटा काढणार. बंदीमुळं बेकायदेशीर मजकूर तयार करणारा उद्योग फोफावणार. मीडिया कंपन्यांचं जगणंच अलीकडच्या काळात रोगट मजकूर पसरवण्यावर आधारलेलं आहे.त्याच कंपन्या पळवाटा तयार करतील. वय तपासण्यासाठी केलेल्या सोयी इतक्या ठिसूळ असतील की कायद्याचा उपयोग होणार नाही.मुख्य म्हणजे सामाजिक किंवा कुठल्याही गोष्टीवर घातलेली बंदी आजवर यशस्वी झालेली नाही. बंदी घातली की काळा बाजार फोफावतो असा अनुभव आहे.
प्राप्तपरिस्थितीत ऑस्ट्रेलियानं धाडस केलं असून १६ वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडियावर बंदी घातली आहे.सोशल मीडियाच्या वापरामुळं मुलांचं नुकसान होतं;मुलांची विचारशक्ती कुंठते, त्यांच्यात मानसिक विकृती निर्माण होतात असं सरकारला वाटतं. नवीन कायद्यातील तरतूद अशी : सोशल मीडिया ॲप उघडलं की उघडणार्याचं वय तपासलं जावं,सोळाच्या आत असेल तर त्या व्यक्तीला ते ॲप उघडता येणार नाही.सोशल मीडिया कंपन्यांनी कायदा पाळला नाही, पळवाटा काढल्या तर मीडिया कंपन्यांना ३.३ कोटी डाॅलर्सचा दंड सरकारनं योजला आहे. एक सूचना होती की वय तपासणं,मीडियातला मजकूर तपासणं,मुलांना पाहू देणं किंवा न देणं याची जबाबदारी पालकांवर टाकावी. सरकारने ती वाट बंद करून जबाबदारी सोशल मीडियावर टाकलीय. ऑस्ट्रेलियात दोन लाख मुलं टिकटाॅक वापरतात, ४.४ लाख मुलं स्नॅपचॅट वापरतात आणि ४.५ लाख मुलं फेसबुक- इन्स्टाग्रॅम वापरतात.
ऑस्ट्रेलियाकडून स्फूर्ती घेऊन सिंगापूर,ब्राझील, नाॅर्वे,फ्रान्स इत्यादी देशही बंदी घालण्याच्या विचारात आहेत. ऑस्ट्रेलियन सरकारनं एक पाऊल उचललंय.ती एक सुरूवात आहे असं मानावं,वाटचाल सुरू करावी.अडचणी आल्या, गरदाडं आणि टेमकाडं वाटेत आली तर त्यातून वाट काढावी.मार्गक्रमण थांबवू नये.सोशल मीडियावाल्याकडं असलेला पैसा समाजात गोंधळ वाढवेल;सोशल मीडिया कंपन्यांना वेसण घातल्यावर समाजातली आर्थिक स्थिती विस्कटेल.त्यातूनही वाट काढावी लागेल. मार्गक्रमण बंद झालं तर भविष्य भीषण असेल. ज्येष्ठ पत्रकार निळू दामले यांनी अत्यंत महत्त्वाच्या व संवेदनशील विषयावर लेखात तपशीलात केलेले हे अभ्यासपूर्ण भाष्य व विवेचन-विश्लेषण खरोखरच उल्लेखनीय,सुज्ञ वाचकांना अस्वस्थ करणारे,विचारप्रवर्तक, व संबंधीत तमाम जबाबदार घटकांच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरते हे मात्र तितकेच खरे!————————पत्रकार प्रवीण पप्पू शिंदे



















