प्रिय
नगर, नाशिक व पुणे जिल्ह्यातील आजचा सर्वात ज्वलंत प्रश्न पुणे नाशिक रेल्वेचा बदललेला मार्ग हा आहे. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील हजारो हजारो नागरिक या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आज 16 डिसेंबर रोजी अकोले ते संगमनेर 25 किलोमीटरचा भव्य मोर्चा काढत आहेत. सदरच्या ऐतिहासिक मोर्चाचे वृत्त संकलित करून प्रकाशित करण्यासाठी आपण मदत करावी ही नम्र विनंती.
अकोले येथील नागरिकांची या प्रश्नाबाबत भूमिका स्पष्ट करणारे निवेदन खाली देत आहोत.
धन्यवाद !
डॉ अजित नवले
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*अकोले रेल्वे कृती समिती*
*निवेदन*
मा. श्री. अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे मंत्री
मा. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री, महाराष्ट्र
मा. श्री. राधाकृष्ण विखे पाटील, पालक मंत्री, अहिल्यानगर
मा. श्री. अरुण उंडे, प्रांताधिकारी साहेब, संगमनेर
महोदय,
आज दिनांक १६ डिसेंबर २०२५ रोजी अकोले तालुक्यातील जनतेच्या वतीने आपणास निवेदन देण्यात येते की,
अकोले तालुका हा अत्यंत दुर्गम तालुका आहे. देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी झालेल्या संग्रामात या तालुक्याने मोलाचे योगदान दिले आहे. अनेक बलिदाने दिली आहेत. सिंचन व विकासाच्या प्रक्रियेतही तालुक्याने नेहमीच त्याग केला आहे. भंडारदरा, निळवंडे व आढळा धरणात जमिनी देऊन जिल्ह्याची व मराठवाड्यापर्यंत राज्याची शेती फुलावी यासाठी तालुक्यातील अनेकांनी धरण आणि पाटांसाठी जमिनी देत विस्थापनाच्या झळा सोसल्या आहेत. तालुक्याने इतरांसाठी नेहमीच त्याग केला आहे. तालुक्याच्या वाट्याला विकासाची गंगा मात्र जेंव्हा जेंव्हा आली तेंव्हा तेंव्हा ती दुसरीकडे वळविण्यात आली. रेल्वे बाबतही असेच झाले आहे.
नाशिक-पुणे व शिर्डी-शहापूर रेल्वेची मागणी येथील जनता अनेक वर्षांपासून करत राहिली. सुरवातीला नाशिक-अकोले- संगमनेर-पुणे रेल्वेबाबत शासनस्तरावर १९६८ साली पहिली हालचाल झाली. २०१७-१८ मध्ये पहिले रेखांकन तयार झाले. अकोलेकरांच्या मागणीचे प्रतिबिंब या रेखांकनात उमटलेले होते. तालुक्यातील देवठाण येथे रेल्वेचा एक थांबा या रेखांकनात दर्शविण्यात आला होता. तालुक्याच्या जनतेच्या अनेक वर्षांच्या मागणीला यश येताना दिसत होते. मात्र पुन्हा हस्तक्षेप झाला. रेखांकन बदलण्यात आले. २०२० साली नवे रेखांकन करून २०२१ मध्ये तत्वत: मान्यता दिलेल्या रेखांकनातून अकोलेला रेल्वे मार्गातून वगळण्यात आले. आता तर GMRT चे कारण देत, हेही रेखांकन रद्द करण्याची घोषणा करण्यात आली आहे. नाशिक-शिर्डी-पिंपळगाव-पुणतांबा-निंबळक-नगर-चाकण-पुणे असा अत्यंत लांबचा, अगोदरच रेल्वे कनेक्टीव्हिटी असलेला आणि कुणीही मागणी केलेली नसलेला मार्ग या सेमी हायस्पीड रेल्वेसाठी प्रस्तावित करण्यात आला आहे. अकोले तालुक्याला नाशिक व पुण्याला रेल्वेने जोडण्याची संधी यामुळे पुन्हा एकदा हुकली आहे.
मुंबई जवळ असूनही अकोले तालुक्याला रेल्वेने मुंबईला अद्यापही जोडले न गेल्याने तालुक्याला मोठा अन्याय सहन करावा लागला आहे. मराठवाडा व विदर्भ समृद्धी सारखे रस्ते व लोह मार्गाने मुंबईला जोडला, मात्र सह्याद्रीच्या डोंगर रांगामुळे अकोले अजूनही मुंबई सारख्या जवळच्या शहरापासून कोसो दूर असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे तालुका रोजगार व विकास प्रक्रीयेपासुनही तुलनेने दूर राहिला आहे. येथील तालुक्यातील जनतेने यामुळे वारंवार शिर्डी-अकोले-शहापूर रेल्वेची आग्रही मागणी केली आहे. याबाबत वारंवार आंदोलनेही झाली आहेत. विशेष म्हणजे असा मार्ग असावा असे इंग्रज सरकारला वाटत होते. तसा सर्वेही त्याकाळी झाला होता. मात्र आज स्वातंत्र्य मिळून इतका प्रदीर्घ काळ लोटला गेला तरीही याबाबत प्रगती झालेली नाही. असा मार्ग झाल्यास अकोले, संगमनेर तसेच शिर्डी, ही शहरे शहापूर मार्गे मुंबईला जोडली जाणार आहेत. विकासाच्या प्रक्रियेला यामुळे मोठी चालना मिळणार आहे.
आम्ही अकोलेकर या पार्श्वभूमी एकजुटीने खालील मागण्या करत आहोत.
१. अकोले तालुक्याला विकासाची दारे खुली करण्यासाठी रेल्वे कनेक्टीव्हिटी उपलब्ध व्हावी यासाठी २०१७-१८ च्या मूळ प्रकल्प अहवालानुसार अकोले तालुक्यात देवठाण येथे रेल्वे थांबा असलेली नाशिक-पुणे रेल्वे सुरु करा.
२. अकोले, संगमनेर, शिर्डी या शहरांना मुंबईला जोडण्यासाठी शिर्डी-अकोले-शहापूर रेल्वे सुरु करा.
वरील मागण्या आपल्या माध्यमातून केंद्रीय रेल्वे मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, तसेच संबंधित राज्यस्तरीय तसेच केंद्रीय रेल्वे अधिकारी यांना पाठवावे. संबंधितांनी जनतेच्या या मागण्या मान्य करून येथील जनतेवर झालेला अन्याय दूर करावा.
अकोल्याच्या जनतेच्या मागण्या इतर तालुक्यातील मागण्यांपेक्षा वेगळ्या असल्याने त्या विशेषत्वाने समजून घेऊन त्यावर कार्यवाही व्हावी यासाठी सर्व संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांनी अकोल्याच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाला चर्चेला वेळ द्यावा व दोन्ही लोहमार्ग करून मागण्या मान्य कराव्यात ही विनंती.
धन्यवाद !
आपलेच


















