सुधीर जाधव
तालुका प्रतिनिधी, सातारा.
सातारा, दि. १४ : आंबवडे बु. येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत खरीप हंगाम पूर्व नियोजन व गट शेती तयारी कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानासोबतच नैसर्गिक शेतीचा प्रसार व्हावा आणि शेतकऱ्यांनी गटशेतीच्या माध्यमातून कमी खर्चात अधिक उत्पादन घ्यावे, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात मंडळ कृषी अधिकारी शिवदास कदम यांनी नैसर्गिक शेतीचे महत्त्व स्पष्ट करताना रासायनिक खतांच्या अति वापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत असल्याचे सांगितले. नैसर्गिक शेती ही पर्यावरणपूरक असून उत्पादन खर्च कमी करण्यासाठी ती उपयुक्त असल्याचे त्यांनी नमूद केले. नैसर्गिक पद्धतीने शेती केल्यास जमिनीचा पोत सुधारतो आणि आरोग्यदायी अन्नधान्य निर्माण होते, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आर. वाय. जाधव यांनी नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे कौतुक केले. इतर शेतकऱ्यांनीही त्यांचा आदर्श घेऊन विषमुक्त शेती करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या हस्ते पी.जी.एस. इंडिया नॅचरल कृषी व शेतकरी कल्याण विभागामार्फत नैसर्गिक शेतीसाठी “पीक उत्पादन” स्कोप प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
गट शेती तयारी संदर्भात फार्मर कप तालुका मेंटर सुधीर कोरे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवण्यासाठी गट शेती अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. तसेच फार्मर कप स्पर्धेविषयी माहिती देत स्पर्धेतील गुणांकन पद्धती, उत्पादन खर्च कमी करण्याच्या उपाययोजना आणि अधिक उत्पन्नासाठी आवश्यक नियोजन याबाबत सविस्तर माहिती दिली. स्पर्धेत फक्त गुण मिळवणे महत्त्वाचे नसून त्यातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उप कृषी अधिकारी सुशांत देसाई यांनी खरीप हंगाम पूर्व नियोजनाबाबत सखोल मार्गदर्शन केले. शेती मशागत, बियाण्यांची निवड, पेरणीपूर्व नियोजन, तसेच विकत घेतलेल्या बियाण्यांची गुणवत्ता तपासताना कोणती काळजी घ्यावी याविषयी त्यांनी माहिती दिली. बियाणे खराब निघाल्यास संबंधित कंपन्यांकडे दावा कसा करावा, त्यासाठी आवश्यक पुरावे कोणते ठेवावेत आणि ते कसे जतन करावेत, याविषयीही त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. घरगुती बियाण्यांची योग्य साठवणूक व पेरणीपूर्व तयारी कशी करावी, याबाबतही त्यांनी माहिती दिली. कृषी सहाय्यक अनिकेत शेळके यांनी पेरणीपूर्व बीज प्रक्रिया कशी करावी याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवले. तर कृषी सखी अश्विनी जाधव यांनी नैसर्गिक पद्धतीने बीज प्रक्रिया करण्याच्या उपाययोजना शेतकऱ्यांना समजावून सांगितल्या.
कार्यक्रमाचे आयोजन कृषी सहाय्यक नितीन घाडगे आणि लवकुमार यादव यांनी केले होते. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन देशमुख, विकास सेवा सोसायटीचे व्हा. चेअरमन महेश जाधव तसेच कृषी सखी निकिता जाधव यांनी केले. या कार्यक्रमाला मा. डी.वाय.एस.पी. नारायण जाधव, शिक्षक बँक संचालक राजकुमार जाधव, ग्रामपंचायत सदस्य जीवन पवार, ग्रामपंचायत कर्मचारी श्रीकांत जाधव, दिपाली लोहार, बीएसएफ संघ जिल्हाध्यक्ष मोहन धोंडवाड, डॉ. जगदीश जाधव, फौजी दत्तात्रय देशमुख यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये खरीप हंगामाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले.


















