अचलपूर / परतवाडा | प्रतिनिधी
दिनांक : 12 फेब्रुवारी 2026
राज्य मराठी पत्रकार परिषद, अमरावती जिल्हा व अचलपूर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. 12 फेब्रुवारी 2026) सायंकाळी 5 वाजता परतवाडा येथील रेस्ट हाऊस (चिखलदरा स्टॉप जवळ) येथे एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस अमरावती जिल्हा व अचलपूर तालुक्यातील मोठ्या संख्येने पत्रकार बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या बैठकीस राज्य मराठी पत्रकार परिषदेचे वरिष्ठ अधिकारी संजय जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अमरावती जिल्हाध्यक्ष फिरोज खान, उज्वल अग्रवाल, मोइन चौहान, संतोष भालेराव, रुपेश वाजपायी, गजानन रेवसकर, . नाजिम शाह, मो. अझरुद्दीन, सोनाली सावळे, माधुरी सुरोसे, राजेश डांगे, मो. अनीस, विलास भाऊ आदी मान्यवर पत्रकार उपस्थित होते.
बैठकीदरम्यान पत्रकार संघटना अधिक मजबूत करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पत्रकारांच्या हक्क, सुरक्षितता, एकजूट आणि संघटनात्मक बांधणी या मुद्द्यांवर उपस्थितांनी आपले विचार मांडले. तसेच अचलपूर तालुक्यात स्वतंत्र पत्रकार भवन उभारण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. यासंदर्भात पुढील काळात ठोस पावले उचलण्याचा निर्धार करण्यात आला.
याचबरोबर संघटनेच्या नवीन सदस्य नोंदणीबाबतही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपस्थित पत्रकारांकडून सदस्यत्व फॉर्म भरून घेण्यात आले असून त्यांना लवकरच अधिकृत ओळखपत्र (आयकार्ड) देण्यात येणार असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.
राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या या बैठकीमुळे जिल्हा व तालुका स्तरावरील पत्रकारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून संघटना अधिक बळकट होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. एकत्रित प्रयत्नातून पत्रकारांच्या समस्या मार्गी लागतील आणि संघटनेची ताकद वाढेल, असा आशावादही यावेळी व्यक्त करण्यात आला.
एकूणच ही बैठक यशस्वी ठरली असून पत्रकार एकजुटीच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.


















