सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी
वाशिम
वाशिम :-वाशिम तालुक्यातील अनसिंग गावातील इंडियन गॅस एजन्सीकडे जाणारा मुख्य रस्ता अरुंद व खराब अवस्थेत असल्याने आज सकाळी इंडियन गॅसचे वाहन पलटी झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनाचे व गॅस सिलेंडरचे नुकसान झाले.
या घटनेमुळे स्थानिक नागरिकांत संताप व्यक्त करण्यात येत असून, यश चव्हाण यांनी प्रशासनाकडे रस्त्याच्या त्वरित रुंदीकरणाची मागणी केली आहे.अपघातस्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. सुदैवाने कोणताही स्फोट झाला नाही अन्यथा मोठा अनर्थ घडू शकला असता. संबंधित रस्ता अरुंद, खड्ड्यांनी भरलेला असून गॅस वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे.
“या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. प्रशासन केवळ आश्वासने देते, प्रत्यक्षात काहीच होत नाही,” असे एका स्थानिक नागरिकाने सांगितले.नागरिकांनी लवकरात लवकर रस्त्याचे रुंदीकरण करून सुरक्षित वाहतुकीसाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा मोठ्या स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
