*
ज्ञानेश्वर पाटेकर
पुणे: आज २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिनी भूमी अभिलेख विभागाच्या भ्रष्ट,गलथान व चुकीच्या कारभाराविरुध्द जमाबंदी आयुक्त कार्यालय,पुणे येथे अन्यायग्रस्त व पिडीत नागरिकांनी भूमी अभिलेख तक्रारदार समितीच्या माध्यमातून आंदोलन केले.
यावेळी राज्याच्या विविध जिल्ह्यांतून आलेले अनेक अन्यायग्रस्त, पिडित शेतकरी बांधव, नागरिक उपस्थित होते.
देशाच्या व शासनाच्या आर्थिक जडणघडणीत महत्त्वाचा समजला जाणारा विभाग म्हणजे महसूल व भूमी अभिलेख विभाग.ब्रिटीश काळापासून या विभागाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
सर्वसामान्य शेतकरी,नागरिकांच्या जमिनीची मोजणी करणे,जमिनीच्या जुन्या दस्तऐवजाचे संवर्धन करणे,मोजणी बाबतच्या तक्रार,हरकतीबाबत न्यायीक प्रकरणे हाताळणे,नागरिकांना त्यांच्या जमिनी संदर्भातील विविध शासकीय कागदपत्रांची पुर्तता करणे अशी अनेक कामे या कार्यालयाच्या माध्यमातून चालतात.
परंतु अलीकडच्या काळात जमिनीला सोन्याचे भाव प्राप्त झाल्यामुळे,जमिनीच्या खरेदी-विक्रीतून शासन तिजोरीत मोठा महसूल जमा होत आहे.मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने या विभागातही भ्रष्टाचाराचे पेव फूटू लागले आहेत.
अलीकडे पुणे जिल्ह्यासह राज्यातील सर्वचं जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना या विभागाच्या चुकीच्या व मुजोर कामकाजाला सतत सामोरं जावं लागतं आहे.
नागरिकांना सेवा हमी कायद्यान्वये सेवा प्रदान न करणं, अर्ध-न्यायीक प्रकरणाचा निपटारा वेळेत न करणं, किरकोळ कामकाजासाठी नागरिकांना वारंवार हेलपाटे मारायला लावणे,शासन परिपत्रक व नियमाला अधिन न राहता मोजणी करणे,मोजणी वेळेत न करणे,मोजणी हद्दी चुकीच्या दाखवणे,नकाशात व महसूली कागदपत्रांमध्ये फेरफार करणे, आर्थिक फायद्यासाठी महसूल कागदपत्रे गायब,गहाळ करणे आदी चुकीची व नुकसानीचं कामकाज अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून वारंवार होत असल्याचा आरोप सर्वसामान्य नागरीकांनी यावेळी केला.
चुकीच्या व भोंगळ कारभारामुळे सर्व सामान्य नागरिकांना विनाकारण वेठीस धरण्याचा व नाहक त्रास देण्याचा हेतु यातून स्पष्ट दिसून येत असल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले.



















