*
प्रवीण (पप्पू) शिंदे
मकरसंक्रांत हा सण नातेसंबंध दृढ करणारा, आपुलकी, गोडवा आणि सकारात्मक विचारांची देवाणघेवाण करणारा आहे. “तिळगूळ घ्या, गोड गोड बोला” या एका वाक्यातूनच या सणाचे खरे तत्त्वज्ञान आपल्याला समजते. यावर्षी मकरसंक्रांतीच्या काळात दिवस फारच कमी मिळाल्यामुळे अनेक जणींना एकत्र येता आले नाही. त्यामुळेच सर्व मैत्रिणींना, भगिनींना पुन्हा एकत्र येऊन तिळगूळ समारंभ साजरा करावा, एकमेकींना शुभेच्छा द्याव्यात, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतून आनंद व्यक्त करावा अशी भावना निर्माण झाली असून अखिल भारतीय महिला मराठा महासंघाच्या माध्यमातून वर्षभर विविध सामाजिक, सांस्कृतिक व प्रेरणादायी उपक्रम सातत्याने राबवले जात असतात. नुकताच राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा अतिशय उत्साहात आणि अभिमानाने साजरा झाला. त्यानंतर सर्व महिलांच्या मनात तिळगूळ समारंभ व्हावा अशी इच्छा व्यक्त झाली आणि पुन्हा एकदा या कार्यक्रमाची तयारी सुरू झाली.
यावेळी महासंघाच्या अध्यक्ष सुवर्णा पवार यांनी अतिशय सुंदर, दूरदृष्टीचा आणि समाजोपयोगी विचार मांडला. केवळ तिळगूळ देवाणघेवाण करून सण साजरा न करता, समाजाला एक नवा विचार, एक चांगली प्रथा देऊया असा त्यांचा आग्रह होता.
त्यातूनच “तिळगूळासोबत एक छोटे रोप भेट देऊन वृक्ष संवर्धनाचा संदेश देऊया” हा विचार पुढे आला.
आजच्या काळात प्लास्टिकमुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान, वाढते प्रदूषण, तापमानवाढ या गंभीर समस्या आपल्या सर्वांसमोर उभ्या आहेत. अशा वेळी वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन हे केवळ पर्यावरण रक्षणाचेच नव्हे तर पुढील पिढीचे भविष्य सुरक्षित ठेवण्याचे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. एक छोटे रोप म्हणजे केवळ भेटवस्तू नसून नवीन जीवन, आशा आणि हिरव्या भविष्यासाठीची जबाबदारी आहे.
हा विचार सरचिटणीस नम्रता भोसले व खजिनदार स्मिता वारंग यांच्यामार्फत संपूर्ण कार्यकारी मंडळापर्यंत पोहोचवण्यात आला. सर्व पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी या संकल्पनेचे मनापासून कौतुक केले आणि एकमताने हा अभिनव उपक्रम तिळगूळ समारंभात समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला.
तिळगूळ समारंभातून गोडवा वाढवतानाच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम समाजात निश्चितच एक सकारात्मक बदल घडवून आणेल, असा विश्वास आहे.
तरी या आनंददायी, प्रेरणादायी व समाजोपयोगी कार्यक्रमाला सर्व पदाधिकारी, सदस्य व भगिनींनी २७ जानेवारी रोजी मराठा मंदिर जवळ मुंबई येथे आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय महिला मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे




















