सुधीर जाधव
तालुका प्रतिनिधी, सातारा.
सातारा : येथे उरमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस चालू असल्याने धरणामध्ये पाण्याचा येवा लक्षात घेता, उरमोडी जलाशय परिचलन सूचीनुसार धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी, धरणाच्या वक्र द्वारातून उरमोडी नदी पात्रात 1500 क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. जलविद्युत प्रकल्पातून यापूर्वीच सुरू असलेला 500 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. यामुळे सांडवा व जलविद्युत प्रकल्प असा एकूण 2000 क्युसेक व
विसर्ग नदीपात्रात चालू असणार आहे. येवा मोठ्या प्रमाणात वाढल्यास किंवा कमी झाल्यास सांडव्यावरून सोडलेल्या विसर्गामध्ये वाढ अथवा घट होऊ शकते. उरमोडी नदी पात्रात असलेल्या पाणी पातळीत धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे वाढ होणार आहे. नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. नदी तीरावरील गावातील नागरिकांनी नदीपात्रात कोणत्याही कारणास्तव जाऊ नये. नदी काठावरील ग्राम प्रशासन व संबंधित यंत्रणा यांनी नोंद घ्यावी, अशी सूचना कार्यकारी अभियंता सातारा यांनी केली आहे.
