प्रविण पप्पू शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
अरे खुळ्यांनो, विरोध हिंदीला नाहीय… किंवा खरंतर कुठल्याच इतर भाषेला नाहीये! त्या वाढतील की त्यांच्या त्यांच्या… त्या त्या भाषेच्या लोकांनी आपल्या भाषेचा मक्ता जरूर घ्यावा! त्यात गैर काहीच नाही…
मुद्दा महाराष्ट्रात होणाऱ्या मराठी भाषेच्या गळचेपीचा आहे! हिंदी मोडकी तोडकी येतेच आहे की सगळ्यांना ! पण मराठी मोडकी तोडकी येऊ नये हा मुद्दा आहे… हा प्रांतवाद तर त्याहून नाही… (असं समजणाऱ्यांना थोडं उशिरा कळेल किंवा कदाचित कळणारच नाही!)
भारत हा आपला देश आहे आणि या देशातल्या सगळ्या भाषा आपल्याच आहेत! पण मावशी जगवायला आणि वाढवायला ‘आईला’ कोणी मारत नाही!
भाषावार प्रांतरचना झाली आणि आपली भाषा, आपली संस्कृती जपण्याचा अधिकार सर्व राज्यांना मिळाला…
या सगळ्याच्या पलीकडे…
जरा लक्षात घ्या…
लहान मुलांच्या मेंदूला आपण किती ताण देणार आहोत?
एखाद्याची मातृभाषा मालवणी किंवा खानदेशी आहे तर त्या बिचाऱ्याला तुमची ती ‘प्रमाण’ मराठी भाषा शिकणं ही सुद्धा एक लढाईच आहे… आणि शिवाय डोक्यावर इंग्रजी आहेच… आता हिंदी कुठून काढली??? आणि कशासाठी? ती शिकायची आहेच की नंतर… आपण सगळे शिकलोच की!
पण आधी मराठीची गोडी लागूद्या मग बघू की इतर भाषांचं…
मराठी भाषा टिकली तर आपली संस्कृती टिकणार आहे… आपल्या मराठी रूढी, परंपरा सारंकाही टिकणार आहे!
पुन्हा एकदा सांगतो…
एक देश, एक भाषा चा अजेंडा खपवून घेतला जाणार नाही!
(आता खाली येऊन तु हिंदीत काम करणार का? कधीच हिंदी बोलणार नाही का वगैरे असले निर्बुध्द मुद्दे मांडू नका)
आपण काम कुठेही करू… कुठल्याही राज्यात अथवा देशात राहू… पण माय मराठी ही माय मराठीच!
आणि मराठी कायम वाढत राहो, आपल्यालाही वाढवत राहो…
#मराठी #भाषा #महाराष्ट्र #
होय_मी_मराठी
