संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
दौंड पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनांक २१ रोजी उमेदवारांचे नामनिर्देशन (फॉर्म भरण्याची) प्रक्रिया दौंड तहसील कार्यालयात पार पडली. या प्रक्रियेदरम्यान विविध पक्षांच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण तापलेले दिसून आले.राजेगाव–खडकी गणातून पंचायत समितीसाठी भाजपकडून विठ्ठल भाऊसाहेब मोघे, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय संपत भोसले यांनी उमेदवारी अर्ज भरला. यामुळे या गणातील लढत रंगतदार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.जिल्हा परिषद गटाबाबतही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. (तुतारी गट) कडून आप्पासाहेब पवार,यांचा एबी फॉर्म भाजप चिन्हावर भरला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. तसेच, जिल्हा परिषद उमेदवार म्हणून वीरधवल जगदाळे,यांचा फॉर्मही राष्ट्रवादीकडूनच दाखल करण्यात आला.याच प्रक्रियेत भाजपचे नेते वासुदेव काळे,यांच्या कन्या डॉ. हर्षदा काळे,यांनीही आपला उमेदवारी अर्ज भरल्याने निवडणुकीतील समीकरणे आणखी रोचक बनली आहेत.तालुक्यात दररोज घडणाऱ्या राजकीय हालचाली, पक्षांतील समीकरणे, आघाड्या–पाठिंबा यामुळे मतदारांसमोर वेगवेगळी चित्रे उभी राहत आहेत. कोणत्याही क्षणी अनपेक्षित घडामोडी घडू शकतात, हे या उमेदवारी प्रक्रियेवरून स्पष्ट झाले आहे. परिणामी, दौंड तालुक्याचे लक्ष या निवडणुकीकडे केंद्रित झाले असून मतदारांमध्येही चर्चा चांगलीच रंगलेली दिसून येत आहे. त्यामुळे खडकी देऊळगाव गणामध्ये सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.




















