सचिन संघई
जिल्हा प्रतिनिधी वाशिम
अनसिंग : गणेशोत्सव काळात डीजे संस्कृतीमुळे होणारे ध्वनीप्रदूषण आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडक पावले उचलली. अनसिंग येथे गणेश विसर्जन मिरवणुकांदरम्यान नियमबाह्यरित्या डीजे वाजविणाऱ्या 14 डीजेवर धडक कारवाई करून तब्बल 2 लाख 17 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
ही कारवाई वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे व उपविभागीय अधिकारी क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. विशेष म्हणजे महिला आरटीओ साधना दुधमाले यांनी कारवाईत आघाडी घेतली, तर अनसिंग वाहतूक शाखेचे दक्ष कर्मचारी सुनिल राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिवसरात्र कंबर कसून जबाबदारी पार पाडली.
गणेशोत्सव काळात पोलीस प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही काही डीजे धारकांनी नियम धाब्यावर बसवून मोठ्या आवाजात डीजे वाजविले. त्यामुळे शिस्तभंग करणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर अनसिंग परिसरात कायदा-सुव्यवस्था अधिक शिस्तबद्ध राहिली असून, नागरिकांनी पोलिसांच्या या कडक पावलाचे स्वागत केले आहे.
पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ध्वनीप्रदूषण नियंत्रण तसेच अपघात टाळण्यासाठी अशी कारवाई पुढील काळातही सुरू राहणार आहे. नियमभंग करणाऱ्यांना यापुढेही सोडले जाणार नसल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
