*
स्वामीनाथन यांचा जन्म तामिळनाडूमधील कुंभकोणम येथे 7 ऑगस्ट 1925 रोजी झाला. त्यांनी प्राणिशास्त्रातून उच्च पदवी घेतली. त्यानंतर ते आय.पी.एस ची परीक्षा देखील उत्तीर्ण झाले. त्यांना नोकरी देखील लागली होती. परंतु देशासमोर असणाऱ्या अन्न संकटामुळे त्यांनी नोकरी करण्याऐवजी कृषी संशोधनात सहभाग घेतला. डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांच्या सोबत काम करून देशाला लागणाऱ्या गहू व तांदूळ या पिकांमध्ये संशोधन करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात तिप्पट भर घातली. यासोबतच त्यांनी बटाटा संशोधनात देखील उल्लेखनीय कामगिरी केली आहे. याचा फायदा भारताबरोबरच पाकिस्तान, फिलिपाईन्स आदी राष्ट्रांनाही झाला. आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेचे त्यांनी महासंचालक म्हणून काम केले आहे.
विसाव्या शतकातील आशिया मधील सर्वात 20 प्रभावशाली व्यक्तिं मध्ये भारतामधून महात्मा गांधीजी, रवींद्रनाथ टागोर आणि डॉक्टर स्वामीनाथन यांचे नाव आहे.
त्यांनी केलेल्या संशोधनामुळे पहिल्या केवळ चार हंगामातच देशाचे धान्य उत्पादन 12 दशलक्ष टनांवरून 23 दशलक्ष टनांपर्यंत वर गेले.
त्यांची शेतकऱ्यांप्रती असणारी तळमळ पाहून केंद्र सरकारने 2004 साली त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन करण्यात आला. देशामध्ये होत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहून त्यांनी सरकारकडे 11 शिफारशी केल्या होत्या. त्या खालील प्रमाणे —-
१) शेतकऱ्यांना उत्पादन खर्च अधिक 50 टक्के ज्यादा भाव दिला पाहिजे.
२) शेतकऱ्यांना उत्तम दर्जाची बियाणे कमी दरात दिली पाहिजेत.
३) शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक गावात ‘व्हिलेज नॉलेज सेंटर’ची स्थापना करणे.
४) महिला शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देणे.
५) वारंवार होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांसाठी ‘कृषी जोखीम फंडा’ची स्थापना करून नैसर्गिक आपत्ती वेळी यामधून शेतकऱ्यांना मदत करावी.
६) अतिरिक्त वापरात नसलेल्या जमिनी शेतकऱ्यांना वितरित कराव्यात.
७) शेती योग्य जमिनी व वन जमिनी कार्पोरेट कंपन्यांना देऊ नयेत.
८) कृषी विमा योजना सर्व देशभर सर्व पिकांसाठी लागू करावी.
९) शेती कर्जावर चार टक्के व्याजदर लागू करावा (याची अंमलबजावणी 2007 पासून सुरू झाली).
१०) नैसर्गिक संकटावेळी कर्ज वसुली व व्याज दरामध्ये सवलत द्यावी, तसेच जोपर्यंत नैसर्गिक संकट आहे तोपर्यंत ही सवलत कायम ठेवावी.
११) भारतातील 28 टक्के शेतकरी कुटुंबे दारिद्र्य रेषेखाली आहेत. अशा लोकांना अन्नसुरक्षेची शिफारस केली.
वरील शिफारशीं पैकी दोन ते तीन शिफारशी वगळता अन्य शिफारशी अजून कोणत्याही सरकारने स्वीकारलेल्या नाहीत. अशा या महान संशोधकांनी केवळ संशोधनच न करता देशातील शेतकऱ्यांची गरिबी हटवून आत्महत्या थांबविण्यासाठी देखील काम केले आहे.
त्यांनी काही काळ कृषी मंत्रालयाचे प्रधान सचिव म्हणून काम पाहिले आहे. नियोजन आयोगाचे कृषी व ग्रामीण विकासाचे प्रभारी म्हणून काम पाहिले आहे.
अशा या आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी झटत आणि झगडत राहिलेल्या डॉक्टर स्वामीनाथन यांना 1961 ला शांती स्वरूप भटनागर पुरस्कार, 1967 ला पद्मश्री, 1972 ला पद्मभूषण, 1989 ला पद्मविभूषण, या पुरस्कारां सोबतच रमण मॅगसेसे पुरस्कार, जागतिक अन्न पुरस्कार असे महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत.
त्यांनी केलेल्या अकरा शिफारशींबाबत देशातील शेतकऱ्यांनी एकजूट करुन सरकारकडून त्या मंजूर करून घेतल्या पाहिजेत. त्यामध्ये आम्ही जय शिवरायच्या वतीने महागाई निर्देशांकावर आधारित शेतमालाचे दर ठरवावेत ही देखील महत्त्वाची मागणी लावून धरली, तरच देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार आहेत. अन्यथा *येरे माझ्या मागल्या* प्रमाणे देशातील सर्व शेतकऱ्यांची व शेतमजुरांची अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही, याची आज त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वांनी दखल घ्यावी अशी विनंती.
*शिवाजी माने, अध्यक्ष*
*जय शिवराय किसान संघटना*
