सुधीर जाधव
तालुका प्रतिनिधी, सातारा.
सातारा : जावळी करहर हे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल भक्त मोठ्या संख्येने येत असतात. ज्या भक्तांना पंढरीची वारी करता येत नाही. असे भक्त जावळी करहर येथे येऊन विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतात. येथे सकाळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाईची महापूजा करण्यात आली. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, प्रतापगड कारखाना अध्यक्ष सौरभ शिंदे, पंचायत समितीचे माजी उपसभापती हनुमंतराव पार्टे, जयदीप शिंदे, तहसीलदार हणमंत कोळेकर, सरपंच सोनाली यादव, प्रसाद यादव ग्रामस्थ उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा सुरू असून, यंदाही हजारो विठ्ठल भक्तांनी मनोभावे दर्शन घेतले. ह.भ.प. दत्तात्रय महाराज कळंबे यांच्या प्रेरणेतून आषाढी एकादशी सोहळा प्रारंभ झाला होता. तेव्हांपासून या सोहळ्यात तालुक्यातील अनेक वारकरी दिंड्या पताका घेऊन सहभागी होतात. याही वर्षी विविध गावातून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम अशा संत महंतांच्या पालख्या घेऊन वारकरी सहभागी झाले होते. त्यावेळी टाळ मृदंगाच्या गजर आणि ज्ञानोबा माऊली तुकाराम व विठ्ठल नामाच्या गजरात तल्लीन झालेल्या वारकऱ्यांसोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व मान्यवरांनी टाळ मृदंगाच्या तालावर तल्लीन होऊन दिंडीत सहभाग घेतला. धार्मिक पूजेनंतर मंदिरात भाविक भक्तांनी दर्शनासाठी रांग लावली. यावेळी शिवेंद्रसिंहराजे यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या आणि शेतकरी बांधवांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्या लाभो अशी प्रार्थना विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी केली.
