सचिन संघई
जिल्हा प्रतिनिधी वाशिम
वाशिम :- शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी सुरू असलेल्या अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत अनेक तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या असून, त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती किसनराव मस्के यांनी माध्यमिक शिक्षण विभागाकडे ४ जुलै रोजी निवेदनाद्वारे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
ऑनलाईन प्रक्रियेमुळे संगणक जोडणीतील अडचणी, कागदपत्रे अपलोड करताना होणारे अडथळे, अतिरिक्त शुल्क, कागदपत्रांची सुरक्षितता आणि स्थानिक शाळांमध्ये प्रवेश न मिळणे अशां अनेक समस्या उद्भवत आहेत. यामुळे विद्यार्थी दूरच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यास भाग पाडले जात आहेत, जे अनेक पालकांसाठी आर्थिकदृष्ट्या अवघड ठरणारे राहणार आहे, असे निवेदनात नमूद आहे.
विशेषतः ग्रामीण भागातील आणि मुलींच्या शिक्षणावर याचा मोठा परिणाम होत असून, काही ठिकाणी शिक्षणच बंद होण्याची वेळ येईल, अशी भीतीही मस्के यांनी व्यक्त केली. पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
