*
जिल्हा प्रतिनिधी पुणे प्रवीण पप्पू शिंदे
अहिल्यानगर जिल्ह्यातील सौंदाळा गावचे सरपंच शरद आरगडे यांनी स्वतःचा जिवंतपणे दहावा आयोजित करून त्यांच्या उपस्थितीत कावळा पिंडाला शिवला हे सप्रमाण दाखवत दहावा या कल्पनेचा फोलपणा उघड केला आहे. एक सरपंच अशा पद्धतीच्या प्रबोधनाचे कार्य करतो हे अत्यंत अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे .महात्मा फुले यांच्या दोनशेव्या जयंती वर्षात आरगडे यांनी उपक्रम केला आणि महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी पद्धतीने कार्यक्रम केला. हे खूप महत्त्वाचे आणि अनुकरणीय आहे..
दहावा या विधीतील फोलपणा दाखवणे याला विशेष अर्थ आहे याचे कारण जन्म मृत्यू पुनर्जन्म त्यातून कर्माचा सिद्धांत याच्याभोवती कर्मकांड आणि धर्माची उभारणी करून बहुजनांना गुलामीच्या दिशेने दिलेले आहे त्यामध्ये या मृत्यूनंतरच्या गोडपणाला आव्हान देणे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे.
या निमित्ताने बहुजन समाज काही शिकणार आहे की नाही ?हा खरा प्रश्न आहे. या देशातील सर्व धार्मिक कर्मकांड हा बहुजनांना गुलाम करणाऱ्या प्रयत्नांचा एक भाग आहे त्यामुळे त्या गुलामीतून बाहेर पडण्यासाठी ही कर्मकांड cनाकारली पाहिजे इतक्या स्पष्टपणे महात्मा फुले पासून अनेकांनी भूमिका मांडली पण दुर्दैवाने बहुजनांमध्ये फार कमी जागृती झाली..
शिक्षणाने ही सुधारणा होईल असे वाटले होते पण शिकलेला बहुजन वर्गच उलट आज या सर्व धार्मिक विधी करण्यात पुढे आहे .वास्तुशांती, जागरण गोंधळ, खर्चिक आणि परंपरागत लग्न, मृत्यूनंतरचे विधी, नारायण नागबळी, ज्योतिष इथपासून तर खराब बाबा सारख्या बाबांपासून अनेक आश्रमात मठात गर्दी करणारा आणि कुंभमेळ्यात डुबकी मारणारा हाच बहुजन वर्ग आहे..
तेव्हा प्रश्न शिकूनही जर काही सुधारणा होणार नसेल तर महात्मा फुलेंपासून अनेकांनी जो आयुष्य पणाला लावले त्याचा काय उपयोग झाला ? ब्राह्मणी व्यवस्थेने अशा प्रकारच्या धार्मिक विधीचा पगडा बहुजनांवर घातला याबद्दल त्यांच्यावरची टीका करून केली, ती योग्यही आहे पण शिकलेल्या माणसांनाही हा सापळा जर कळत नसेल आणि कळूनही जर ते पुन्हा पुन्हा त्याच्यातच सापडत असतील तर त्याच्याबद्दल ब्राह्मणांना जबाबदार धरायचे की अनुकरण करणाऱ्या या बहुजनांना? याची चर्चा करावी लागेल.
तेव्हा व्यक्तिगत आयुष्यात अशी सर्व धार्मिक कर्मकांडातून आपण बाहेर पडणार आहोत का, हा खरा प्रश्न आहे. गुलामीची सवय झाल्यावर तो बेड्यांची संरक्षण ताकतीने करतो हे विश्लेषण खरे असले तरी शिकलेल्या वर्गा कडूनच त्या बेड्या तुटण्याची शक्यता असते पण शिकलेला वर्ग आणि शिकलेल्या महिला जर त्यात पुढाकार घेणार असतील तर कोणतेच आशा उरत नाही..
आज वेगवेगळ्या मंदिरांमध्ये मठामध्ये धार्मिक कार्यक्रमात गर्दी करणाऱ्या बहुजनांच्या सुशिक्षित महिला आहेत. वेगवेगळे व्रत उद्यापने करणाऱ्यांमध्येही शिकलेल्या महिलांची संख्या मोठी आहे. यासाठी सावित्रीबाईंनी आपल्याला शिकवले का ..?
हा थेट प्रश्न विचारावा लागेल आणि केवळ गुलामीची सवय झाली असा बचाव करता येणार नाही.
महात्मा फुलेंच्या २०० व्या जयंती वर्षात तरी बहुजनांनी या धार्मिक कर्मकांडातून बाहेर पडण्याची गरज आहे. त्यासाठी ब्राम्हणांवर खापर फोडून स्वतःची सुटका करण्यात अर्थ नाही. ब्राह्मणी व्यवस्थेच्या या सापळ्याबाबत चार्वाक, गौतम बुद्धापासून तर महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आ. ह.साळुंखे यांच्यापर्यंत सर्वांनी त्यांचे माप त्यांच्या पदरात घातले आहे, बहुजनांना सावध केले आहे परंतु आता मुद्दा बहुजनांचा आहे, की तुम्ही यातून बाहेर पडणार की नाही…?


















