संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
इंदापूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींना राज्य सरकारकडून मिळणारा वित्त आयोगाचा निधी मागील काही महिन्यांपासून जमा झालेला नाही. त्यामुळे गावांच्या विकासकामांना अक्षरशः अडथळा निर्माण झाला आहे. निधीअभावी सुरू असलेली रस्ते, गटारे, पाणीपुरवठा व स्वच्छता विविध वस्तू चे देणी यांसारखी कामे ठप्प पडली असून ग्रामपंचायतींच्या आर्थिक अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत.सरकारकडून दरवर्षी ग्रामपंचायतींना वित्त आयोगाच्या माध्यमातून निधी देण्यात येतो. या निधीवरच ग्रामीण भागातील विकासाचा पाया उभा असतो. मात्र यावर्षी निधी वेळेवर न मिळाल्याने अनेक ग्रामपंचायतींचे नियोजन कोलमडले आहे. काही गावांत मजूर व कर्मचारी यांचे पगार महिन्यांपासून थकले असून स्वच्छता व्यवस्था व पाणीपुरवठा यावर त्याचा थेट परिणाम झाला आहे.इंदापूर तालुक्यातील काही सरपंचांनी सांगितले की, “आम्ही गावातील विकासकामे प्रामाणिकपणे पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत, पण निधीच न आल्याने हात बांधून बसावे लागत आहे. शासनाने ग्रामपंचायतींकडे दुर्लक्ष केल्यास ग्रामीण विकास थांबेल.” ग्रामसेवक व सदस्यांनीही शासनाकडे तात्काळ निधी सोडवण्याची मागणी केली आहे. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी एकत्र येऊन पंचायत समितीमार्फत पाठपुरावा सुरू केला असून शासनाने तातडीने निधी वितरित करावा, अशी एकमुखाने मागणी होत आहे.दरम्यान, नागरिकांमध्येही शासनाच्या या निष्क्रिय भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गावोगावी विकासकामे थांबल्याने लोकांना मूलभूत सुविधा मिळण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. ग्रामीण भागात विकासाच्या गाडीला पुन्हा गती देण्यासाठी शासनाने वित्त आयोग निधी लवकरात लवकर जमा करावा, अशी सर्व स्तरातून मागणी वाढत आहे.
*चौकटीत टाका *
मार्च 2025 पर्यंत 15वित्त आयोगाचा हप्ता आला होता त्यानंतर आला नाही- सचिन खुडे गटविकास अधिकारी इंदापूर

















