सुप्रसिद्ध कवी डाॅ.मिर्झा रफी अहमद बेग यांचे नुकतेच निधन झाले. तद्अनुषंगाने त्यांचा प्रेरणादायी जीवनपट उलगडून दाखवणार्या या अभ्यासपूर्ण लेखाचा सुसूत्र,सविस्तर गोषवारा असा:—
आपला डाॅक्टरकीचा व्यवसाय कसा चालला नाही आणि मग आपण कवितेच्या नादी कसे लागलो,हे मोठ्या रंजक पद्धतीने श्रोत्यासमोर मांडणारे, डाॅ.मिर्झा रफी अहमद बेग हे मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील धनज माणिकवाडाचे होते.डाॅ.मिर्झा रफी अहमद बेग हे नाव मराठी रसिकांमध्ये सर्वदूर परिचित आहे.मिर्झांनी, अत्यंत साध्या-सोप्या शब्दांमधील खुमासदार आणि ओघवती वर्हाडी कविता विपुल प्रमाणात लिहिली.या कवितांमध्ये विनोद होता आणि विचारही होता. अभिव्यक्तीतील सहजता आणि वर्हाडी बोलीवरील प्रभुत्व हे त्यातून ठळकपणे उमटले आहे.विदर्भातील ग्रामीण जनजीवनाचा तो आरसाच म्हणता येईल. ज्याचा साहित्याशी कवडीचाही संबंध नाही, अशा श्रोत्याला रसिक बनविण्याची किमया मिर्झांच्या कवितेत होती. सर्वसामान्य मराठी माणसाला कवितेची गोडी लावण्यात ज्या कवींचा महत्त्वाचा वाटा आहे,त्यात मिर्झांचे नाव आग्रक्रमाने घेतले जाईल.
डाॅ. मिर्झा रफी अहमद बेग यांनी काही वर्षे प्रश्र्नोत्तराचे एक सदर चालवले.त्यात प्रश्र्नांची उत्तरे ते कवितेत द्यायचे.काही वर्षे त्यांनी साप्ताहिकात, कवितेचे सदरही लिहिले.आपल्या लांबलचक नावावरही विनोद करणार्या मिर्झांनी मराठी भाषेला ‘जांगडबुत्ता ‘सारखा शब्द दिला.ग्रामीण भागातून आलेल्या मिर्झांनी आपल्या वर्हाडी बोलीचा नेहमीच अभिमान बाळगत,संपूर्ण आत्मविश्वासाने सादरीकरण केले. सुरूवातीला ‘हास्यधारा’ सारख्या कवीसंमेलनांमधून मिर्झा बेग महाराष्ट्रभर पोचले, नंतर मात्र त्यांनी ” मिर्झा एक्स्प्रेस ” नावाचा स्वतंत्र कार्यक्रम सुरू केला. वर्हाडी बोलीतील कविता आणि किस्से सांगत सामाजिक विसंगतीवर भाष्य करणारा त्यांचा हा विनोदी कार्यक्रम होता. त्याचे हजारो प्रयोग मिर्झांनी महाराष्ट्रभर केले.त्यातून त्यांना लोकप्रियता मिळाली आणि त्यांची उपजीविकाही चालली.
हिंदू-मुस्लीम ऐक्य आणि सामाजिक
सद्भावनेचा विचार सातत्याने त्यांनी आपल्या कवितेतून आणि सादरीकरणातून जोरकसपणे मांडला. मुस्लीम असूनही मिर्झा इतके सुंदर मराठी- वर्हाडी कसे बोलतात, असे कोणी म्हटले की मिर्झा त्याचे उत्तर कवितेतून देत असत जे उत्तर ऐकून श्रोते थक्क होऊन जात असत.मिर्झा बेग यांनी राष्ट्रीय ऐकात्मतेचा आणि पर्यायाने मानवतेचा विचार इतक्या सहजतेने सर्वसामान्यांच्या गळी उतरवला.त्यांच्या कविता वरवर पाहता साध्या व सोप्या कविता जरी वाटत असल्या तरी त्यामागील दृष्टी आणि बोलीच्या वापराचे कसब मिर्झाच्या कवितेला लोकाभिमुख करीत गेले. सर्वधर्मसमभावाचा विचार इतक्या प्रभावीपणे क्वचितच कुठल्या कविने मांडला असावा.हिंदू धर्मग्रंथामधील अनेक संदर्भ त्यांच्या कवितांमधून येतात,तसे मराठी संस्कृतीचे प्रतिबिंब प्रामुख्याने उमटते.
शेतकर्यांची वेदना अधोरेखित करणारी शेती-मातीची कविता मोठ्या प्रमाणात लिहिणार्या मिर्झांनी आयुष्यभर सामाजिक सद्भावाची कविता सादर केली.वेगवेगळ्या कारणांमुळे सामाजिक सलोखा बिघडत चालला असल्याची खंत त्यांनी अनेकदा बोलून दाखविली होती.घरावर गोटे,धुयमाती,ऊठ आता गणपत…अशी त्यांची २० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. देवभोळेपणापासून कोसो दूर असलेले मिर्झा आपल्या गावातील फकीरजी महाराज संस्थानाचे मात्र कित्येक वर्षे अध्यक्ष होते.विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपददेखील त्यांनी भूषविले होते.अमरावती विद्यापीठाने त्यांना अभ्यासक्रमात स्थान देऊन त्यांच्या प्रतिभेचा सन्मान केला होता. वयाच्या ६८ व्या वर्षी अमरावतीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी ही त्यांच्या रसिकांसाठी अत्यंत वेदनादायी ठरली. कवितेला लोकाभिमुख करण्याच्या प्रयत्नांमध्ये मिर्झांचा वाटा मोलाचा आहे.वर्हाडी कविता आणि विनोदाच्या प्रांतातील एक महत्त्वाचा अध्याय संपला आहे. असा मिर्झा पुन्हा होणे नाही.त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण श्रद्धांजली.ज्येष्ठ पत्रकार किशोर बळी यांनी आपल्या अभ्यासपूर्ण लेखातून, ‘जांगडबुत्ता’ सारखा शब्द मराठी भाषेला देणारे, लोकांना खळखळून हसायला लावत चिमटे काढणारे, ‘मिर्झा एक्स्प्रेस’ फ्रेम सुप्रसिद्ध कवी डाॅ.मिर्झा रफी अहमद बेग यांचा उलगडून दाखवलेला हा जीवनपट खरोखरच उल्लेखनीय, वाचनीय, विचारप्रवर्तक,अनभिज्ञ वाचकांच्या ज्ञानात भर घालणारा तसेच समाजातील सर्वच घटकांना राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रेरित व प्रोत्साहित करणारा ठरतो हे मात्र तितकेच खरेप्रवीण पप्पू शिंदे !———————पत्रकार प्रवीण पप्पू शिंदे



















