संकलन. एकनाथ भाऊ भोर
जिल्हा प्रतिनिधी पुणे. प्रवीण पप्पू शिंदे
कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या तपोवन परिसरातली अठराशे झाडं तोडण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. त्याविरोधात नाशिकमध्ये जनआंदोलन उभे राहिले आहे. झाडे तोडण्यास तीव्र विरोध होऊ लागला आहे. त्याला राज्यभरातून व्यापक समर्थन मिळू लागले आहे. शनिवारी अभिनेते सयाजी शिंदे यांनी या आंदोलनात सहभागी होऊन सरकारच्या निर्णयाला तीव्र विरोध केला. त्यामुळे वृक्षतोडीविरोधातल्या आंदोलनाला चांगलीच धार चढली आहे.
सयाजी शिंदे हे सुरुवातीपासून प्रगतीशील विचारांच्या गोतावळ्यात वावरणारे कलावंत आहेत. प्रारंभीचा त्यांचा जो धडपडीचा काळ आहे, तेव्हापासून त्यांची ऊठबस अशा लोकांच्यातच राहिली आहे. सिनेमा, नाटक हे त्यांचं कार्यक्षेत्र असलं तरी ते कवी आणि कवितेमध्ये अधिक रमतात. त्याचमुळं मराठीतले अनेक नवे जुने कवी, सयाजी आपला खास दोस्त आहे, असं हक्कानं सांगतात. सयाजीवर हक्क दाखवतात आणि सयाजीही तो हक्क मान्य करतात.
आता कवींच्यातही बरीचशी चलाख मंडळी असतात. कविता लिहित असतात, कधीतरी कवितेतून बंडखोर आवाज व्यक्त होत असतो. पण नंतर कळतं की ती बंडखोरी टाळ्या मिळवण्यापुरती असते. तिचा भूमिकेशी संबंध नसतो. भूमिका घ्यायची वेळ आली की ही मंडळी सोयीस्करपणे अंग काढून घेतात. अशा लोकांना मग कुणी भूमिका विचारायलाही जात नाही. यांचं गणित साधं सरळ असतं. भूमिका घेणं जोखमीचं असतं. सरकारची अवकृपा होते. पुरस्कारांपासून मंडळ, कमिट्यांपर्यंत नियुक्तीचे दरवाजे बंद होतात. आपल्यासाठी सगळे दरवाजे उघडे राहिले पाहिजेत, अशी त्यांची धारणा असते.
सयाजी शिंदे यांनी कधी असा विचार केला नाही. त्यांनी सरकारकडून किंवा आणखी कुठल्या घटकाकडून अशी अपेक्षा कधी केली नाही. पण गेल्या दहा वर्षांत अनेक अटीतटीचे प्रसंग आले. काही मोजके कलावंत अशा प्रसंगी संघर्षासाठी उभे राहिले. मराठीतले तर अगदीच मोजके. सयाजी शिंदे त्यात कधीच कुठं नव्हते. आणि अलीकडे तर त्यांनी भाजपसोबत गेलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळं त्यांच्याकडून कुणाच्या काही अपेक्षाही नव्हत्या.
मोठा नट आहे. भारतीय चित्रपटसृष्टी गाजवतोय. चित्रपटांत व्यस्त असतानाही रंगभूमीसाठी वेळ देतोय. सखाराम बाइंडरसारखं अजरामर नाटक करतोय. त्यामुळं कलावंत म्हणून त्यांच्याबद्दलचा आदर कायम होता. त्यांच्या राजकीय भूमिकेशी फारसं कुणाला देणंघेणं नव्हतं.
या सगळ्या प्रवासात एक गोष्ट घडत गेली. सयाजी शिंदे यांना झाडांचा नाद लागला. ते झाडांच्या प्रेमात पडले. झाडं लावत सुटले. झाडं लावणा-यांना प्रोत्साहन देत राहिले. सयाजी शिंदे पडद्यावर किंवा रंगमंचावर नसायचे तेव्हा स्वतःच एक झाड बनायचे. झाडांसाठी वाट्टेल ते करायची त्यांची तयारी असायची. हजारो, लाखो झाडं त्यांनी राज्याच्या विविध भागात गेल्या काही वर्षांत लावली. यात झपाटलेपण होतं. तसाच भाबडेपणाही होता.
म्हणजे झाडांसाठी झपाटल्यासारखे काम करणारे सयाजी वैचारिक भूमिकेच्या लढाईत कधीच कुठं नव्हते. त्यांचं हे असं कडेकडेनं चालत राहणं झाडांनाही आवडलं नसावं. त्यामुळंच अखेर झाडांनीच त्यांना नाशिकच्या निमित्तानं मैदानात खेचलं. आणि सयाजी शिंदे यांच्यासारखा मोठा अभिनेता पहिल्यांदाच सत्तेच्या विरोधात भूमिका घेऊन उभा राहिला. असा तसा नव्हे तर थेट. `गिरीश महाजन यांच्याशी माझी दुश्मनी नाही आणि दुश्मनी झाली तरी त्यानं मला फरक पडत नाही`, असं थेट आव्हान देण्यापर्यंत सयाजींनी झाडांसाठी स्वतःला पणाला लावलं आहे. साधू आले गेले तरी त्याने काही फरक पडत नाही, पण झाडं गेली तर मात्र नाशिककरांचं नुकसान घेईल, असं म्हटलंय. त्यावरून काही संधिसाधूंनी कांगावा सुरू केलाय. झाडं तोडायचा निर्णय झाला तेव्हा हे संधिसाधू काय करीत होते, असे त्यंना कुणी विचारणार आहे का, हा खरा प्रश्न आहे.
कुंभमेळ्यासाठी झाडं तोडण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात नाशिकच्या पर्यावरणप्रेमींनी गेले काही दिवस संघर्ष सुरू केलाय. पत्रकार मित्र निरंजन टकले यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. सयाजी शिंदे यांनी या संघर्षात स्वतःला झोकून दिल्यामुळं हा संघर्ष राष्ट्रीय पातळीवरील चर्चेच्या केंद्रस्थानी आला. या नव्या रणभूमीवर सयाजी शिंदे यांचं हार्दिक स्वागत!
सयाजी शिंदे यांचं मनःपूर्वक अभिनंदन! त्यांनी झाडांसाठी का होईना, सत्तेच्या मुजोरीविरोधात भूमिका घेतली. ते ज्या पक्षात आहेत असं म्हणतात तो पक्ष सत्तेत असतानाही त्यांनी भूमिका घेतलीय, हे विशेष उल्लेखनीय. आता परीक्षा दोघांचीही आहे. सयाजी शिंदे यांची आणि पर्यावरणप्रेमींची. कारण सयाची शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांना आता मोठ्या प्रमाणावर ट्रोलधाडीचा सामना करावा लागेल.
सत्तेतल्या उघड मुजोरांपेक्षा छुप्या टोळधाडींचं आव्हान खडतर असतं. आजवर त्यांना ट्रोलधाडीचा अनुभव नाही. जो हिंदी-मराठीतल्या काही कलावंतांनी यापूर्वी घेतला आहे. पर्यावरणप्रेमींची परीक्षा अशा अर्थाने की, मोठी जोखीम घेऊन आपल्या बाजूनं लढाईत उतरलेल्या एका मोठ्या कलावंताच्या पाठीमागं आपण किती खंबीरपणे उभे राहतोय हे पर्यावरणप्रेमींना दाखवावं लागेल. कारण ही लढाई एकट्या-दुकट्याची नाही. ती सामूहिकपणे लढावी लागेल. या लढाईत उतरलेला कुणीही एकटा पडणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल.



















