टपाल सेवा : काल आणि आज ” या शिर्षकाखाली प्रसिद्ध झालेला लेख वाचला. दरवर्षी ९ ऑक्टोबर रोजी १५० हून अधिक देश जागतिक टपाल (पोस्ट) दिन साजरा करतात.तद्अनुषंगाने टपाल विभागाच्या भूमिकेबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशांने तपशीलात भाष्य करणार्या या अभ्यासपूर्ण व ज्ञानवर्धक लेखाचा सुसूत्र,सविस्तर गोषवारा असा:—
भारतातील पहिले पोस्ट ऑफिस १७७४ मध्ये कोलकोता येथे ईस्ट इंडिया कंपनीने स्थापन केले होते.पोस्ट ऑफिसने प्रति १०० मैलांवर दोन आणे आकारले होते.१८६४ मध्ये कोलकोता येथे लँडमार्क जनरल पोस्ट ऑफिस बांधले गेले.९ ऑक्टोबर १८७४ रोजी स्वित्झर्लंडमध्ये युनिव्हर्सल पोस्टल युनियनची स्थापना झाली. १८८० मध्ये भारतात मनीऑर्डर प्रणाली सुरू झाली. १८ फेब्रुवारी १९११ रोजी जगातील पहिले अधिकृत एअरमेल उड्डाण भारतात झाले. फ्रेंच पायलेट हेन्री पॅकेटने भारतातून निघालेल्या विमानाने पहिले अधिकृत टपाल नेले तेव्हा त्यांच्या सॅकमध्ये सुमारे ६,००० पत्रे होती. स्वतंत्र भारतात पहिले अधिकृत टपाल तिकिट २१ नोव्हेंबर १९४७ रोजी जारी करण्यात आले. नवीन टपाल तिकिटावर भारतीय ध्वजासह ‘जय हिंद ‘ या घोषणेचे चित्रण केले.स्वातंत्र्यावेळी संपूर्ण भारतात २३,३४४ टपाल कार्यालये होती.
१५ ऑगस्ट १९७२ रोजी सुरू करण्यात आलेली ‘पिन क्रमांक ‘सकल्पना भारतीय टपाल सेवेचा केंद्रबिंदू ठरली आहे. आजघडीला देशामध्ये नऊ पिन विभाग आहेत.यामध्ये पहिले आठ विभाग हे देशाच्या वेगवेगळ्या भागांसाठी आहेत,तर नववा विभाग हा आर्मी पोस्टल सर्व्हिससाठी आहे. यामधील पहिला आकडा हा या विभागाला दर्शवत असतो.पहिले दोन आकडे मिळून सबरीजन किंवा पोस्टाच्या सर्कलचे प्रतिनिधीत्व करतात आणि पहिले तीन आकडे एकत्रित साॅर्टिंग डिस्ट्रिक्ट दर्शवण्याचे काम असतात.यामध्ये दोन उत्तर,दोन दक्षिण, दोन पश्चिम,दोन पूर्व असे विभागांचे वर्गीकरण आहे.उदाहरणार्थ पहिले दोन आकडे दिल्लीसाठी ११ आहेत तर महाराष्ट्रासाठी ४० ते ४४ आहेत.
भारतात १९८६ मध्ये स्पीड पोस्टची सुरूवात झाली.भारतात आज जगातील सर्वांत मोठे पोस्टल नेटवर्क आहे.
डिजिटलायझेशनच्या युगात ऑनलाईन टपाल व्यवहारांवरही लोकांचा विश्वास वाढला आहे. दशकभरापूर्वी पोस्टाचे पूर्ण बँकेत रूपांतर करण्यात आले.इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा म्हणजेच आयपीपीबीचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला आणि देशात एका नव्या युगाची सुरूवात झाली.पोस्ट कार्यालये देशाच्या कानाकोपर्यात आहेत, या कार्यलयांमधील कर्मचारी आज घरोघरी जाऊन अनेक आर्थिक कामे पूर्ण करतील. पोस्टाच्या बँकांचे उद्दिष्ट भारतातील प्रत्येक घरापर्यंत प्रभावी आणि विश्वासार्ह बँकिंग सुविधा पोहोचवणे आहे.भारतीय पोस्ट पेमेंट्स बँकेचे १०० टक्के मालकी हक्क भारत सरकारकडे आहेत.या बँकेची सुरूवात ३० जानेवारी २०१७ रोजी रांची (झारखंड) आणि रायपूव (छत्तीसगड)येथे प्रायोगिक स्वरूपात करण्यात आली होती.
पूर्वीच्या काळी ‘पोस्टमन’ असा आवाज ऐकू आल्यानंतर त्या कुटुंतील लोकांच्या चेहर्यावर दिसणारे भाव विलक्षण असायचे पण आता काळ बदलला, दूरसंचार क्षेत्रात मोठी क्रांती झाली. इंटरनेट, ई-मेलमुळे पोस्ट कार्यालयाचे टपाल वाटपाचे काम तुलनेने खूपच कमी झाले.तार खाते बंद करण्यात आले.कुरियर सेवांचे पेव फुटल्यानंतर टपाल सेवेला उतरती कळा लागली;परंतु पोस्ट खात्यामार्फत देण्यात येणार्या बँकिंग सुविधा अलीकडील काळात लोकप्रिय झाल्या आहेत. अवंती कारखानीस यांनी आपल्या लेखात जागतिक टपाल दिनाच्या निमित्ताने टपाल सेवा संदर्भात तपशीलात विशद केलेली ही अभ्यासपूर्ण माहिती खरोखरच वाखाणण्याजोगी,
वाचनीय,विचारप्रवर्तक व अनभिज्ञ वाचकांच्या ज्ञानात भर घालणारी ठरते हे मात्र तितकेच खरे!———————



















