‘
स्थलांतर जसे एका राष्ट्रातून दुसर्या राष्ट्रात होते तसेच ते देशांतर्गतही होते.दुष्काळ पडला की शेती ठप्प होते म्हणून शेतकरी मोलमजुरी करण्यासाठी शहराकडे धाव घेतात. इतर राज्यांतून विकसित राज्यांकडे वाहणारे हे लोंढे हा जसा आज चिंतेचा विषय झाला आहे तसेच राज्यातील अनेक आदिवासी विशेषतः कातकरी समाजाचे पाडे दिवाळीनंतर ओस पडून जवळपासच्या भिवंडी, वसई,विरार,ठाणे,मुंबई,
गुजरातकडे स्थलांतर करताना आढळतात. महाराष्ट्रात सर्वांत जास्त पाऊस पडणारा हा पट्टा अजूनही निसर्गरम्य आहे.रस्ते चांगले,शिक्षण व्यवस्था चांगली, अंगणवाड्या उत्कृष्ट मात्र येथे तरूणांना दहावी- बारावी नंतर कसलाही रोजगार उपलब्ध नाही. माॅन्सूनमध्ये भात शेती चांगली होते.मात्र रब्बी आणि उन्हाळी पिके नाहीत.
मुंबई,अहमदाबाद महामार्गावर चारोटी नाक्याजवळ कासा हे गाव आहे.कासा,जव्हार,
मोखाडा भागात सुद्धा कातकरी समाजाचे सिल्व्हासा,नाशिककडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते.बरेच कातकरी विटभट्ट्यावर काम करतात,तेथेच त्यांची राहण्याची व्यवस्था होते.सर्वांत यातना देणारी गोष्ट म्हणजे या समाजातील स्थलांतरित कुटुंबामधील अल्पवयीन मुलांचे वाढते कुपोषण!ज्या वयात त्यांनी फुलावयाचे, डुलावयाचे तेथे त्यांचे निर्माल्य होताना आढळते.आक्टोबर ते मे पर्यंत म्हणजे आठ महिने त्यातील प्रत्येक दिवस त्यांचा पुर्नजन्म असतो. वीटभट्टीमधून बाहेर पडणारे विषारी वायू, हमरस्त्यावरील वाहनांची गर्दी आणि हातात काही तरी कुडमुड्यासारखी कांडी चघळत ही मुले भट्टीतील वीटांचा शहराकडे होणारा प्रवास निमूटपणे पाहत असतात.आईवडील भट्टीवर,एक सात वर्षांची मुलगी दोन लहान भावांची काळजी घेते, असे हे चित्र विदारक आहे.
जंगलांचा र्हास, रानभाज्यांना लागलेली उतरती कळा,शेतीचे नगण्य उत्पादन, जीवनसत्त्व ‘अ ‘ ची कमतरता त्याच बरोबर वर्षातील तब्बल आठ महिने होणारे स्थलांतर ही आदिवासी भागातील कुपोषण वाढण्यामागची खरी कारणे आहेत. आदिवासींना मुख्य प्रवाहात आणावयाचे असेल तर त्यांचे स्थलांतर कमीत कमी कसे होईल,हे पहावयास हवे.त्यासाठी युद्धपातळीवर बेकार तरूणांच्यासाठी रोजगार निर्माण करावा लागेल. स्थलांतर-झालेच तर त्या जागेवर स्री आणि मुले यांच्या शिक्षण,आरोग्य,व आहाराला प्राधान्य द्यावे लागेल. ज्यांच्याकडे जमीन उपलब्ध आहे, त्यांना रब्बीमध्ये एखादे पीक,भाजीपाला लागवडीस प्रोत्साहन द्यावे लागेल. कडाक्याच्या थंडीत त्यांना सुरक्षा उपलब्ध करून द्यावी लागेल. स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती झाली तर स्थलांतर निश्चितच कमी होऊ शकते. भाताचा पेंढा या भागात मोठ्या प्रमाणात निर्माण होतो,ज्यापासून कागद, पुठ्ठे तयार होतात.हा उद्योग स्थानिक पातळीवर सुरू केला गेल्यास घरटी एका युवकास त्यात रोजगार उपलब्ध होऊ लागला तर आदिवासी युवकांच्यावर स्थलांतर करण्याची वेळच येणार नाही.इतर अनेक उद्योग आहेत जेथे आदिवासी युवक प्रगती करू शकतात. स्थलांतरामध्ये संपूर्ण पाडा रिकामा होतो. असलेली जनावरे सोडून द्यावी लागतात. चंद्रमौळी घरात फक्त वयोवृद्ध माणसानाच नाईलाजास्तव रहावे लागते.घरात काहीच नसल्यामुळे घराला कुलूप लावण्याचा प्रश्र्नच नसतो.कसली दिवाळी आणि कसला दसरा, अशी शोकांतिका असते.
‘नटसम्राट’ मधील ‘मला घर देता का कुणी घर ‘हे वाक्य ऐकताच रसिक अश्रू ढाळताना आढळतात.मात्र मोडके तोडके घर असूनही अन्न- पाण्यासाठी तान्हुल्यांना कडेवर घेऊन पोटापाण्यासाठी वणवण फिरणार्या या स्थलांतरीत आदिवासींच्यासाठी मात्र कोणी अश्रूचा एक थेंबही ढाळताना दिसत नाही,हा विरोधाभास आहे. कुठलेही स्थलांतर हे नेहमीच वेदनादायक असते.कोरोना काळात या स्थलांतरांच्या वेदना सर्वांनी अनुभवल्या, अनेकांना मार्गक्रमण करताना अन्न-पाण्याचे सुखद अनुभव सुद्धा आले,ते सर्व तात्पुरते होते.परंतु अनेक वर्षापासून नियमित होणार्या आदिवासी स्थलांतरांना असाच अनुभव का येऊ नये ? मुळात ही वेळच त्यांच्यावर येऊ नये म्हणून प्रयत्न का नसावेत ? असे प्रश्र्न भेडसावून सोडतात. स्थलांतरित आदिवासी शहरात,
वीटभट्ट्यांवर,बांधकाम,शेतमजुरी करून थोडेफार श्रीमंत होऊन परत त्यांच्या पाड्यावर येत नाहीत,ते गरिबी घेऊनच परत येतात. सोबत लहान मुलांच्या कुपोषणाची श्रीमंती मात्र वाढलेली असते.शेती प्रश्र्नाचे अभ्यासक डाॅ.नागेश टेकाळे यांनी आपल्या लेखात ‘आदिवासी स्थलांतर’ या अत्यंत महत्त्वाच्या व संवेदनशील विषयावर तथा विदारक वास्तवावर जे अभ्यासपूर्ण भाष्य व विवेचन-विश्लेषण केले आहे ते खरोखरच उल्लेखनीय,वाचनीय
,सुज्ञ वाचकांना अस्वस्थ करणारे व संबंधित जबाबदार घटकांच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरते हे मात्र तितकेच खरे!————————पत्रकार प्रवीण पप्पू शिंदे
राज्य उपाध्यक्ष. राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश




















