✅ **
➖➖➖➖➖
जिल्हा प्रतिनिधी पुणे. प्रवीण पप्पू शिंदे
पिंपरी चिंचवड. दत्ता मोकाशी सर
★ नववीतलं पोरगं, सायकलवरून आंबे घ्यायला बाजारात निघालं होतं.
मे महिन्याचा शेवट.
आभाळ भरून आलं होतं. विजा कडाडत होत्या, आणि वाऱ्याचा खेळ सुरू झाला होता.
आई-बापानं ४०० रुपये हातावर ठेवले.
“हे घे. पण बघ, चांगले हापूसच घ्यायचे. आणि तुझे-तुझे पैसै वाचवून घ्यायचे. व्यवहार शिक. भाव करायला शीक.”
असं म्हणून पाठवलं.
पोरगं धडपडलं.
कधी एका गाड्यावर, कधी दुसऱ्या दुकानात. पण कोणीच ४०० च्या खाली एक डझन आंबे द्यायला तयार नव्हतं. कोणी म्हणे ५००, कोणी ४८०.
डोळ्यात थोडं नाराजीनं पाणी आलं.
पण मागे फिरणार नव्हता.
आईचं बोलणं आठवत होतं, “हुशारी म्हणजे फक्त पुस्तकात नाही, व्यवहारात पण शहाणपण लागतं.”
अशात एका कोपऱ्यावर, जुन्या साडीमध्ये बसलेली पंचावन्न साठ वय असणारी एक बाई दिसली.
डोक्यावर पदर, आणि चेहऱ्यावर अनुभवांचे सुरकुतलेले भाव आणि मनानं मोठी असेल अशी ती बाई शांतपणे पावसात आंब्यांचं टोपलं झाकत होती.
पोरगं गेल. दर विचारला.
“पाचशे रूपये डझन.”
“घरचे पिकवलेले हापूस. एक नंबर गोड.”
पोराने भाव करायला सुरुवात केली.
“साडेतीनशे द्या मावशी.”
बाई हसली, “नाही रे राजा. लै झालं तर ४५०.”
पोरगं आता हुशारीनं बोलायला लागलं.
“तिथं ३८० ला देत होते.
अरे पण आंबे छोटे होते.
इकडं बघ, आंब्यांची चकाकी बघ…
“..पण घरून ५०० दिलेत. पण चारशेत घेउन शंभर माघारी मागितले आहेत,
मला काही सांगू नका,पण ४०० ला जमवा मावशी”
बाईने पाहिलं, थोडं विचारात गेली.
“ठीक आहे. फक्त तुझ्याकडं बघून स्वभाव मोकळेपणाचा वाटला म्हणून. दे ४००.”
पोराने हुशारीन,बारकाईनं १२ मोठे, सुंदर आंबे निवडले.
तेवढ्यात पाऊस सुरु झाला.
बाईने गडबडीत शंभरची घडी घातलेली नोट त्याला दिली.
पोरगंही गडबडीत खिशात टाकून सायकलवरून निघून गेलं.
धो-धो पावसात घरी पोचला.
आई-बाप खुश. आंब्यांची चकाकी पाहून थक्क.
“एक नंबर व्यवहार केलास!” कौतुक झालं.
खिशातून नोट काढली… शंभरच्या घडीच्या आत एक पन्नाशीची नोट.
पोरगं बावरलं.
“म्हणजे बाईनं चुकून ५० रुपये जास्त दिले!”
घरचे खुश झाले.
“बघ, तुझं नशीबच भारी. आंबे साडेतीनशेला पडले.”
पण पोरगं गप्प. त्याला हसू आलं नाही.
बाईचं ते पावसात बसलेलं रूप आठवलं.
कष्टाची फळं विकणारी ती बाई – तिचे हात, तिचा चेहरा, तिचा नम्रपणा.
त्या रात्री आमरस झाला.
पण दोन आंबे खराब निघाले.
घरच्यांनी ओरड सुरू केली – “फसवलं त्या बाईनं!”
पोरगं गप्प. म्हणालं, “मीच निवडले होते.”
घरच्यांनी म्हटलं, “पैसे देऊ नकोस. आता फिटाफिट झाली.”
पण पोरगं काही ऐकायला तयार नव्हतं.
त्याच्या मनात ‘योग्य तेच’ करायचं होतं.
दुसऱ्या दिवशी पुन्हा सायकलवर जाऊन त्यानं ती बाई शोधून काढली.
बाजाराच्या टोकाला, झाडाखाली तीच बसलेली.
पोरगं गेला.
“मावशी, तुमच्याकडून चुकून पन्नाशीची नोट जास्त आली.”
तिला काही क्षण समजलं नाही. मग चेहरा खुलला.
“राजा… तुझ्यासारखे खरं बोलणारे कुठं सापडतात हल्ली? बघ ना, पावसात बसते, उन्हात भाजते… पण असा एक माणूस भेटला तरी वाटतं मेहनतीचं चीज झालं.”
बाईने चार-पाच मोठे आंबे उचलले.
“हे घे. माझ्याकडून तुला बक्षीस. तुझ्या प्रामाणिकपणाचं.”
पोराने नकार दिला.
तिच्या डोळ्यात पाणी आलं.
“घे रे राजा. ह्याचं काही मोल नाही. याचे पैसै नाही घेणार मी..हे माझ्याकडून मी तुला देतेय..
हे तुला तुझ्यातआईच्या हातून दिल्यासारखं मान. आणि हो बाळा आयुष्यभर असाच प्रामाणिक रहा. जगात अशी तुझ्यासारखी खरी माणसं राहिली पाहिजेत.”
पोरगं घरी परत आलं. सगळा किस्सा सांगितला.
घरच्यांच्या डोळ्यांत पश्चात्तापाचा ओलावा होता.
आई म्हणाली, “आपणच चुकलो. पोरगं शिकतंय तेच खरं आहे..”
—
शेवटी पोराने मनातल्या मनात सगळ्याची गोळा-बेरीज केली –
“व्यवहार केलाय, सवलत मिळवलीय, पन्नाशीची नोट परत केलीय…
आणि त्याबदल्यात – मनःशांती, प्रेम, आईचा आशीर्वाद, आणि सगळ्यात मोठं –
प्रामाणिकपणाचं बक्षीस मिळालंय.
प्रामाणिकपणा गमावलेलं दुपटीनं परत देतो – हेच खरं आयुष्याचं गणित.”
—
ही गोष्ट नववीतल्या पोराची नाही –
तर उद्याच्या समाजासाठी घडवलेल्या एका जबाबदार माणसाची आहे.
पैशाने मोजता येणार नाही असं मूल्य –
फक्त प्रामाणिक मनातच उगम पावू शकतं.
🙏🏻🙏*शुभ सकाळ*🙏🙏


















