ते
“काका… काका…”
ते वळाले.
७-८ वर्षांची एक चिमुरडी, धापा टाकत त्यांच्याकडे धावत येत होती.
“काय झालं गं… एवढी धावत आलीस?”
काकांनी थोड्या थकलेल्या पण प्रेमळ स्वरात विचारलं.
“काका… पंधरा रुपयांचे तांदूळ आणि दहा रुपयांची डाळ घ्यायची होती…”
मुलीच्या डोळ्यांत निरागसता आणि गरज दोन्ही स्पष्ट दिसत होती.
काकांनी मागे वळून आपल्या दुकानाकडे पाहिलं.
“आता दुकान बंद केलं गं… सकाळी ये, मिळेल.”
“पण आता हवी होती…”
तिने हळू आवाजात सांगितलं.
“लवकर यायचं होते ना ग… आता सगळं आवरून ठेवलंय.”
त्यांनी सौम्य पण व्यावसायिक स्वरात सांगितलं.
मुलगी गप्प झाली. नजर खाली घालून बोलली,
“सगळी दुकानं बंद झालीत. आणि घरी पीठही नाही…”
हे ऐकून काकांचं काळीज सुन्न झालं. क्षणभर ते शांत राहिले.
“तू आधी काआली नाहीस गं?”
“बाबा आत्ता घरी आलेत… आणि घरी…”
ती थांबली, बहुतेक अश्रू रोखत होती.
काकांना काही विचारायचं नव्हतं आता. त्यांनी तिच्या डोळ्यांत पाहिलं, आणि न बोलता खिशातून दुकानाची चावी काढली.
दुकान उघडलं, आवरलेलं सामान बाजूला ठेवलं आणि डाळ तांदूळ न तोलता थेट थैलीत टाकून दिलं.
ती थैली घेताना म्हणाली,
“थॅंक यू काका…”
“काही नाही गं… आता घरी नीट जा.”
त्या रात्री ते झोपू शकले नाहीत. त्या मुलीचं चेहरा, तिची हतबलता आणि ती एक ओळ
“घरी पीठही नाही…”
ती सातत्याने त्यांना अस्वस्थ करत राहिली.
त्यांना स्वतःचं बालपण आठवलं.
रिक्शा चालवणारे बाबा, दुसऱ्यांच्या घरात काम करणारी आई… पाण्यात भिजवलेली पोळी खाल्लेली रात्र…
“आज माझ्याकडे दुकान आहे, कमाई आहे… पण माणूसकी आहे का?”
स्वतःला त्यांनी विचारलं.
दुसऱ्या दिवशी दुकान उघडल्यावर त्यांनी एक फलक लावला,
“तुम्हाला गरज असेल आणि पैसे नसतील, तरी संकोच करू नका. हक्काने मागा..
ही उधारी नाही, माणुसकी आहे.”
आणि बाजूला एक डबा ठेवला..
“जर तुम्हाला कुणाला मदत करायची असेल, तर या डब्यात पैसे टाका.”
सुरुवातीला लोक चकित झाले. पण हळूहळू समजलं… हे प्रसिद्धीसाठी नाही, ही मनापासून माणुसकीसाठी केलेली गोष्ट आहे.
एक आठवड्यानंतर तीच मुलगी पुन्हा आली… या वेळेस आपल्या लहान भावासोबत.
“काका, बाबांनी काही पैसे दिले आहेत… मागच्या वेळेस जे घेतलं होतं, त्याचे पण पैसे यातून घ्या.”
“नाही ग, त्या दिवशी जे दिलं होतं, ते माणुसकीचं होतं. त्याचा हिशोब नसतो.”
मुलगी हसली. फलक वाचला आणि म्हणाली
“बाबा म्हणाले की ते रोजंदारी करून आले की, या डब्यात पैसे टाकतील.. जेणेकरून इतरांनाही मदत होईल.”
त्या दिवशी दुकानदाराच्या डोळ्यांत पाणी आलं.
खरंच, “नेकी कधी वाया जात नाही.”
हळूहळू त्या दुकानाचं नाव पसरू लागलं —
“माणुसकीचं दुकान.”
गल्लीतल्या आजीबाई, एकटे राहणारे वृद्ध, रोजंदारी करणारे मजूर… आता तिथून सन्मानाने सामान घेत.
सक्षम लोक त्या डब्यात थोडे थोडे पैसे टाकत जातात.
शाळेतली मुलं आपला गुल्लक फोडून त्यात पैसे टाकू लागली.
हे दुकान आता केवळ व्यापाराचं ठिकाण नव्हतं, ते एक विश्वासाचं मंदिर बनलं होतं.
नंतर एका स्थानिक पत्रकाराने ही गोष्ट प्रसिद्ध केली…
“जिथे नफा नाही, गरज महत्त्वाची.. वाचा माणुसकीच्या दुकानाची गोष्ट”
ही बातमी व्हायरल झाली. अनेक सोशल मीडिया पेजेसनी त्यावर व्हिडीओ बनवले.
लोक लांबून या दुकानाला बघायला येऊ लागले.
पण दुकानदाराने कधीही त्याचा फायदा घेतला नाही.
“जर एका मुलीच्या उपाशी पोटानं मला बदललं, तर कदाचित हे दुकान इतरांनाही बदलू शकेल.”
ती मुलगी आता रोज शाळेत जाते.
दुकानदाराने तिच्या शिक्षणाची फी गुप्तपणे भरली.
एक दिवस तिचे बाबा म्हणाले
“त्या दिवशी तुम्ही केवळ तांदूळ आणि डाळ दिली नव्हती, माझ्या मुलीला विश्वास दिला की जगात अजूनही चांगले लोक आहेत.”
आजही त्या दुकानाबाहेर तो फलक आहे —
“तुम्हाला गरज असेल आणि पैसे नसतील, तरी संकोच करू नका.”
आणि त्या डब्यात रोज कुणीतरी शांतपणे काहीतरी टाकून जातं…
ही गोष्ट एका चिमुरडीची आहे, पण हे एक मोठं परिवर्तन बनलंय.
“बदल बाहेरून नाही होत… तो आपल्या अंतःकरणातून सुरू होतो.
🙏🙏*शुभ सकाळ*🙏🙏


















