प्रवीण पप्पू शिंदे
‘आहे रे’ वर्गाकडून ‘नाही रे’ वर्गाच्या शोषणाच्या मार्गाला सहाय्य करीत ‘सत्तेतून पैसा आणि पैशांतून सत्ता’ मिळवत राहणे हा साधारणत: प्रस्थापितांच्या राजकारणाचा अजेंडा असतो. समाजातील मूळ समस्या, त्या समस्यांची शोषणकारी व्यवस्थेत दडलेली मूळं, सर्वसामान्यांची न्याय्य-हक्काची लढाई इत्यादी दुर्लक्षित ठेवून चॅरिटी करणे, पैशांचा व प्रसिद्धी माध्यमांचा वापर करून प्रतिमा निर्मिती करणे, लोकांना फुकट काहीबाही वाटणे, सतत स्वत:ला फोकस करीत राहणे, गरीबांबद्दल पोकळ कळवळा दाखवणे, खाजगी कार्यक्रमाना हजेरी लावणे व लोकसंपर्क वाढवणे, लोकभावनेखातर स्पष्ट न बोलणे, चुकिच्या परंपरेचे समर्थन करीत राहणे, आपल्या सोयीप्रमाणे गरज आहे तोवर माणसं वापरून घेणे, खाजगी वा व्यक्तिगत मदत करून माणसांना मिंदे बनवून ठेवणे, निवडणूकांत पैशांचा अतिरेकी वापर करणे, लोकांना परावलंबी बनवणे, लोकांना विचारप्रवृत्त करण्याऐवजी त्यांना आपल्या आदेशाचे पालन करणारे निर्बुद्ध टोळके बनवणे, आपली वाहवाह करणाऱ्यांचे टोळके बनवणे, गुंडगिरीं-पुंडगिरी, अवैध धंदे, भ्रष्टाचार यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठबळ देणे ही साधारणत: प्रस्थापितांच्या राजकारणाची प्रणाली असते.
याऊलट विस्थापितांचे राजकारण करीत असताना लोकांना विचारप्रवृत्त करणे, कुणाच्या चॅरिटीवर अवलंबून राहण्याऐवजी आपल्या हक्काच्या गोष्टी मिळवून घेण्यासाठी आग्रही राहणे, ‘मी’ म्हणून नव्हे तर ‘आम्ही’ म्हणून विचार करणे, लढायला शिकवणे, खऱ्या अर्थाने सजग, सज्ञान, स्वावलंबी व्हायला शिकवणे, रोखठोक बोलणे, सत्य व वास्तव मांडणे, शोषणकर्त्या बलाढ्याना विरोध करणे तर शोषित दुर्बल घटकाची बाजू घेणे, शोषकांच्या ऐवजी दुर्बलांना संधी व प्रतिनिधीत्व मिळेल यासाठी झगडणे, व्यक्तिगत मदत वा व्यक्तिगत कार्यक्रमांत गुंतून राहण्याऐवजी सार्वजनिक समस्यांवर काम करण्याला व सार्वजनिक कार्यक्रमांत वेळ खर्ची घालण्याला प्राधान्य देणे अशा प्रकारची कार्यप्रणाली ठेवावी लागते.
प्रस्थापितांची कार्यप्रणाली दिखाऊ, भपकेबाज, पोकळ, ढोंगी, दिशाभूल करणारी, झटपट यश व प्रसिद्धी मिळवून देणारी, व्यक्तिगत नेत्याचा, नेत्याच्या कुटुंबियांचा अगर बगलबच्च्यांचा फायदा करणारी पण समाजाच्या भविष्यासाठी कुचकामी, घातक ठरणारी असते. विस्थापितांची कार्यप्रणाली सच्ची, तळमळीची, नैतिकतेवर व संवेदनशीलतेवर उभी असलेली, विचारी, लढाऊ, न्यायी, तात्काळ फायदा न देणारी पण समाजाच्या भविष्यासाठी व मानवतेसाठी दीर्घकालीन फायद्याची ठरणारी असते. प्रस्थापितांच्या नकली राजकारणापेक्षा विस्थपितांच्या अस्सल राजकारणाची समाजाला खरी गरज असते. पण व्यापक दृष्टीकोणाचा अभाव असलेले लोक प्रस्थापितांच्या दिखाव्याला बळी पडून आपल्या शोषकांच्या तावडीत आपली मान देत राहतात. देश, समाज बदलवण्यासाठी देशातील, समाजातील लोक कुठल्या प्रकारच्या राजकारणाला पसंती देतात यावरून त्या-त्या देशाचे व समाजाचे भविष्य ठरत असते. आपले प्रतिनिधी कसे असावेत, आपले राजकारण कसे असावे हे निवडण्यात व ठरवण्यात चूक करणारा किंवा हे निवडण्याचे व ठरवण्याचे अधिकारच गमावून टाकत तटस्थ झालेला समाज चांगल्या भविष्याची बांधणी करु शकत नाही.
चला तर मग, आज स्वत:ला काही प्रश्न विचारूया! आपण आपल्या जगण्यात प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्षपणे कुठल्या प्रकारच्या राजकारणाचे समर्थक आहोत? प्रस्थापितांच्या की विस्थापितांच्या? आपण आपल्या जगण्यात भूमिका घेत आहोत की तटस्थ राहून सभ्यतेचा आव आणत स्वत:ची, समाजाची व पुढच्या पिढ्यानंचीही फसवणूक करीत आहोत? आपण आपल्या जगण्यात विचारांच्या, विवेकाच्या, न्याय्य-हक्काच्या लढ्याला पाठबळ देत आहोत की केवळ बघ्याची भूमिका घेत आहोत? हे प्रश्न तुमच्या-आमच्यासाठी, आपल्या समाजाचे व देशाचे भविष्य ठरवण्यासाठी खूप महत्वाचे आहेत. या प्रश्नावर प्रामाणिकपणे आत्मचिंतन करूया. त्यातून आपली दिशा ठरवत कार्यप्रवृत्त होवूया!
प्रवीण पप्पू महादेव शिंदे पाटील
महाराष्ट्र प्रदेश राज्य सचिव. अखिल भारतीय माथाडी आणि ट्रान्सपोर्ट युनियन
राज्य उपाध्यक्ष. राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश
