आंबेगाव प्रवीण पप्पू शिंदे
राजकारणात संधी केवळ क्षमतांमुळेच मिळेल असे नाही, तर क्षमतांची दखल घेणार नेतृत्व पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनील कर्जतकर यांच्या पक्षासाठीच्या चार दशकातील समर्पित कामाची दखल घेऊन विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवड केली आहे.हा केवळ एका कार्यकर्त्याचा सन्मान नाही, तर हजारो कार्यकर्त्यांसाठी आशेचा किरण आहे. पदाची अपेक्षा न ठेवता काम करणाऱ्यालाही भाजपात एक दिवस न्याय मिळतो, हा विश्वास यामुळे अधिक दृढ झाला. चाळीस वर्षांपूर्वी भाजपचे काम करताना सामाजिक पातळीवर कार्यकर्त्यांना बहिष्कारचा सामना करावा लागत असे अशा काळात कोणत्याही साधनांशिवाय संघ भाजप विचाराने प्रेरित होऊन खांद्यावर शबनम घेऊन उन्हातान्हात फिरणारा आणि निवडणुकांचे राजकीय व्यवस्थापन व नियोजन करणारा पक्ष संघटक ते “आमदार” हा कर्जतकर यांचा प्रवास म्हणजे कार्यकर्तेपणाच्या जिद्दीचा सन्मान आहे.
भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक वाटचालीत काही व्यक्ती पदांमुळे नव्हे, तर त्यांच्या शांत, सातत्यपूर्ण आणि निष्ठावान कामामुळे ओळखल्या जातात. राजकारणात झगमगाट, प्रसिद्धी आणि सत्तेची आस ही अनेकदा केंद्रस्थानी येते, मात्र या सर्वांच्या पलीकडे जाऊन विचाराशी एकनिष्ठ राहणाऱ्या परंपरेचे जिवंत उदाहरण म्हणजे सुनील कर्जतकर.कार्यकर्तेपणाची खरी व्याख्या करायची झाली, तर ती कर्जतकर यांच्या प्रवासातून स्पष्ट होते. राजकीय आणि सामाजिक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी आयुष्याचा मोठा कालखंड भारतीय जनता पक्षाच्या संघटन उभारणीसाठी दिला तेही कोणत्याही अपेक्षेविना. पद, प्रतिष्ठा, सत्तेची आस यापेक्षा विचाराशी असलेली बांधिलकी त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू राहिली. ‘फुलटाइमर’ कार्यकर्ता म्हणजे काय, याचे उत्तर त्यांच्या जीवनातून मिळते.
अहमदनगर जिल्हा परंपरेने काँग्रेसच्या साखर कारखानदारी आणि संस्थानिकांच्या प्रभावाखाली,राजकीयदृष्ट्या स्थिर मानला जाणारा प्रदेश. अशा जिल्ह्यातील दुष्काळी जामखेड तालुक्यातील नान्नज या खेडे गावातून कर्जतकर यांनी संघ-भाजप विचारांची वाट धरती.१९८५ साली ग्रामपंचायतीत विजय मिळवून भाजपच्या पायाभरणीचे पहिले पाऊल टाकले. पक्षाच्या खात्यावर आलेली ही पहिली ग्रामपंचायत ठरली आणि त्यानंतर त्यांच्यावर जिल्हा सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.काँग्रेसच्या प्रभावामुळे भाजपसाठी काम करणाऱ्यांना सामाजिक पातळीवर बहिष्काराचा सामना करावा लागत असे. नातेवाईकसुद्धा दूर राहण्याचा सल्ला देत.अशा प्रतिकूल परिस्थितीत कर्जतकर यांनी एक-एक कार्यकर्ता जोडत संघटन वाढवले.दरम्यान तत्कालीन भाजपचे युवा नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशी भेट झाली.बीडहून जामखेड मार्गे मुंबईला एसटीने प्रवास करणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांच्या भेटीसाठी जामखेड बसस्थानकावर थांबून भेट घेत. मुंडे यांनीही कर्जतकर यांच्यातील कार्यकर्तापण ओळखले आणि त्यांच्यावर नगर सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली. मुंडे यांची राजकीय कार्यपद्धत, सामाजिक समीकरणे जोडण्याच्या कौशल्याने आणि कार्यकर्त्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याने कर्जतकर प्रभावित झाले. दरम्यान नगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत 1991ला खर्डा जिल्हा परिषद गटातून भाजपचा पहिला जिल्हा परिषद सदस्य निवडून आणत निवडणूक व्यवस्थापनाची चुनुक कर्जतकर यांनी दाखवली.याच काळात गोपीनाथ मुंडे यांनी “शिवनेरी ते शिवतीर्थ” संघर्ष यात्रा काढून महाराष्ट्रभर भाजपची पाळेमुळे मजबूत केली. या काळात मुंडे यांनी कर्जतकर यांच्यातील संघटन कौशल्याची दखल घेऊन त्यांच्यावर “मिशन उत्तर महाराष्ट्र” सोपवण्यात आले. नगर लोकसभा प्रमुख तसेच नाशिक पदवीधर निवडणुकीसह उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे त्यांनी अचूक नियोजन केले.
ज्या काळात भाजपला ‘शेटजी-भटजीं’ चा पक्ष अशी प्रतिमा दिली जात होती, त्या काळात कोणतीही साधनसंपत्ती नसताना कर्जतकर यांनी एसटी बसणे प्रवास करून प्रत्येक निवडणुकीत निष्ठेने काम केले. मराठवाड्यातील पदवीधर आणि शिक्षक निवडणुकांपासून ते स्थानिक राजकीय परिस्थितीनुसार नियोजन करून संघटनात्मक बळ उभे केले.
शिवसेनेबरोबरची साडेचार वर्षाची सत्ता १९९९ मध्ये गमावल्यावर भारतीय जनता पक्षाला पुन्हा सत्तेत येण्यासाठी तब्बल दीड दशकाहून अधिक काळ गेला. या काळात अनेकांनी पक्षांतर केले, काही नव्याने आले; पण कर्जतकर यांसारखे कार्यकर्ते कोणत्याही पदाशिवाय पक्षासाठी झटत राहिले. हीच त्यांची खरी ओळख ठरली पद, साधनसामग्री नसतानाही कार्यकर्तेपण टिकवणार व्यक्तिमत्व.
त्यांची कार्यशैली मितभाषी, संयमी आणि अत्यंत नियोजनबद्ध आहे. प्रसिद्धीपासून दूर, पडद्यामागे राहून काम करण्याची त्यांची वृत्ती आजही तितकीच ठळक आहे. निवडणूक सेलसारख्या जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी अनेक निवडणुकांचे सूक्ष्म नियोजन केले. गावोगावी फिरत कार्यकर्त्यांचे जाळे उभे करणे, सभांचे नियोजन, मतदारांशी संपर्क ठेवणे यातून त्यांचा ‘ग्रासरूट’ कार्यकर्ता स्पष्ट दिसतो.
पक्ष सत्तेत आला, साधनसंपत्ती वाढली, तरीही एसटीने प्रवास करणारा, उभे राहून प्रवास करण्यात समाधान मानणारा आणि गरज पडल्यास पायी चालत इच्छित ठिकाणी पोहोचणारा कार्यकर्ता आजही तितकाच जमिनीवर आहे. सत्तेपासून अलिप्त राहून संघटनेशी जोडलेले राहणे, हीच त्यांची खरी ताकद आहे.
नम्रता, गोड बोलणे, चेहऱ्यावरचे सहज हास्य आणि अफाट लोकसंपर्क या गुणांमुळे त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये विश्वासार्हता निर्माण केली. संघटनमंत्री ते सरचिटणीस अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी केवळ पद भूषवले नाही, तर त्या पदांना कार्यक्षमतेची जोड दिली. त्यामुळेच ते केवळ कार्यकर्ते राहिले नाहीत, तर संघटनेचे मार्गदर्शक ठरले.
आजच्या वेगवान राजकारणात ‘दिसणे’ आणि ‘असणे’ यामधील अंतर वाढताना दिसते. अशा काळात कर्जतकर यांसारखे कार्यकर्ते वेगळेपणाने उठून दिसतात. त्यांनी सिद्ध केले आहे की, संघटनाच्या मुळाशी असलेले कामच खऱ्या अर्थाने पक्षाला बळकटी देते.
सुनील कर्जतकर यांचे व्यक्तिमत्त्व हे साधेपणा, निष्ठा, सातत्य आणि संघटनात्मक कौशल्य यांचा संगम आहे. ते पदामुळे मोठे झाले नाहीत,तर त्यांच्या कार्यामुळे पदाला अर्थ प्राप्त झाला. म्हणूनच, त्यांची ही वाटचाल कार्यकर्तेपणाच्या मूल्यांची जपणूक करणारा आदर्श आहे. त्यामुळे राजकीय पातळीवर प्रचंड आणि केवळ समाज माध्यमातून चमकने म्हणजे कर्तुत्व अशा दिखावू चढा ओढीच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पक्षासाठी समर्पित भावनेने काम करणाऱ्या कर्जतकर यांची निवड करून निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण केली आहे.


















