*बोध कथा*
*************************
*
—————————————-
जिल्हा प्रतिनिधी पुणे
प्रवीण पप्पू शिंदे
संकलन. दत्ता मोकाशी सर पिंपरी चिंचवड
*कथा*
जन्मापासून आपल्या आयुष्यात येणार्या प्रत्येकाकडून काही ना काही शिकावं..खरं तर प्रत्येकजण, अगदी प्रत्येक माणूस, आपल्याला काहीतरी शिकवायलाच आलेला असतो. फक्त आपली शिकण्याची तयारी आणि डोळे उघडे असले पाहिजेत. एकदा ही ‘ओपन टू लर्न’ (Open to Learn) वाली वृत्ती आली की, आयुष्य एकदम उत्साही होऊन जातं आणि आपल्या ज्ञानात भर पडते.
चांगल्या-वाईटातून शिकण्यासाठी, जी माणसं आपल्याला चांगली वाटतात, प्रेमळ वाटतात, चांगली कामं करतात.त्यांच्याकडून ‘काय करावं’ हे शिकावं. त्यांचे चांगले गुण घ्यावेत आणि ज्यांचा राग आहे, द्वेष आहे, ज्यांनी आपल्याला कधीतरी दुखावलंय किंवा ज्यांची वृत्ती वाईट आहे, त्यांच्याकडून ‘काय करू नये’ हे शिका. त्यांचे वाईट परिणाम पाहून आपल्याला मोठी चूक टाळता येते. कधी कधी अशा व्यक्तींबद्दल आपल्याला आलेल्या वैयक्तिक अनुभवावरून आपले हे मत असू शकते. त्यांच्यातही काही चांगले गुण असू शकतात.
आपली वागणूक कशी असावी आणि कशी नसावी, यासाठी एक ‘गोल्डन रूल’ आहे.’आपल्याला इतरांनी आपल्याशी जसं वागावं असं वाटतं, तसंच आपण इतरांशी वागावं आणि आपल्याला इतरांनी आपल्याशी जसं वागू नये असं वाटतं, तसं आपणही कुणाशी वागू नये.’ हाच खरा व्यवहाराचा आणि माणुसकीचा नियम आहे.
दैनंदिन आयुष्यात शिकायला कुणी मोठ्या पदावरील व्यक्ती किंवा फक्त पुस्तकातला माणूसच पाहिजे असं नाही. अगदी रोजच्या साध्या माणसांकडूनही खूप काही शिकता येतं.
लहान मुलं.. बघा ना! भांडतात आणि दोन मिनिटांत विसरून पुन्हा खेळायला लागतात. त्यांच्याकडून ‘क्षमाशीलता’ आणि ‘वर्तमानकाळात आनंदी कसं राहायचं’ हे शिकावं.
भाजीवाल्या मावशी भाजीची व्यवस्थित मांडणी करतात. सर्वांशी हसून बोलतात. त्यांच्याकडून ‘व्यवसायाचं कौशल्य’ आणि ‘चांगलं बोलणं’ शिकावं.
एकदा सहज पाहिले आमच्याकडे काम करायला येणारी ताई, कपडे व्यवस्थित कॅटेगरीनुसार वेगळे करून वाळत घालते. आधी कोणते काम करायचे, दोघी बहिणी मिळून, तू हे कर. मी हे करते, दोघी मिळून ही काम संपवू असे ठरवून काम संपवतात. यांतून साध्या कामाचे ‘शिस्तबद्ध व्यवस्थापन’ त्यांच्याकडून शिकावं.
पूर्वी आमच्याकडे कामाला येणार्या मावशी, वर्षभरातून थोडं थोडं सेव्हिंग करून स्वतःसाठी दागिना घ्यायच्या. त्यांच्याकडून बचतीचं महत्त्व आणि आत्मनिर्भरता म्हणजे काय हे शिकावं.
जेव्हा आपण काहीतरी चांगलं करतो, तेव्हा काहीजण लगेच अगदी भरभरून कौतुक करतात. त्यांच्याकडून शिकावं की, दुसऱ्याच्या चांगल्या कामाला प्रोत्साहन द्यावं आणि सकारात्मक ऊर्जा पोहोचवावी. त्यात आनंद आहे.
तो माझ्यापेक्षा वयाने लहान आहे, ती माझ्यापेक्षा कमी शिकलेली आहे म्हणून त्यांच्याकडून शिकायला संकोच का बाळगावा? ‘हे काय मला आधीच माहिती आहे’ किंवा ‘मला यापेक्षा जास्त चांगले कळते’ किंवा एखाद्याची चांगली गोष्ट जाणूनबुजून दुर्लक्ष करणे असे विचार आपल्याला कधीच मोठे होऊ देणार नाहीत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बाहेरच्या जगात शिकण्यासोबतच, आपण स्वत:च्या कालच्या दिवसातून खूप काही शिकावं,
आपल्या पूर्वानुभवांतूनही नित्य नवी शिकवण घ्यावी आणि पुढे वाटचाल करत स्वतःच्या प्रयत्नांना शाबासकी द्यावी.
*बोध*
*जरा आजूबाजूला या ‘शिकण्याच्या नजरेने’ पाहिलं ना, तर खरंच कळेल की, अजून कितीतरी नवीन गोष्टी शिकायच्या बाकी आहेत! आयुष्य फुकट ज्ञान देत असेल, तर स्वार्थी शिकण्यासाठी व्हायला काय हरकत आहे! 😊


















