जिल्हा प्रतिनिधी पुणे. प्रवीण पप्पू शिंदे
मल्ल आणि जिमचा चिझल्ड हिरो यात फरक असतो. मल्लाकडे नुसतं बघूनच टरकायला होतं. मोहित अहलावतपेक्षा सनी जास्त भीतीदायक वाटतो, त्याचा एक फटका खरंच पडला तर जीव जाईल याची खात्री वाटते. धरमसिंह देओल असाच होता तगडा पण अतिशय देखणा. अभिनयाची मारामार असलेल्या या माणसाने मारामारी करून नाव कमावलं. ‘शोले’मधे तो मांडीवर ते दांडूक फोडतो तेंव्हा तब्येत असावी तर धमेंद्रसारखी असं वाटलं होतं लहानपणी. नुसतंच वाटलं, प्रयत्न कोण करणार. सगळ्यातलं थोडं थोडं येत असणारी माणसं सिनेमात जास्त काळ टिकतात असं मला वाटतं. सुंदर असणं, डायलॉग डिलिव्हरी, आवाज, टायमिंग, कॉमेडी, ऍक्शन, नृत्य किंवा साधेपणा या पैकी काही गुण अस्तित्वात असलेली माणसं इथे टिकून राहिलेली दिसतात. अमोल पालेकर, जितेंद्र, धर्मेंद्र, ऋषी कपूर यांच्याकडे लगेच आठवावा असा गुण एखादाच पण ते आपल्या चौकटीत बागडले आणि टिकून राहिले.
आपल्याला काय काय येतं हे माणसाला गवसायला लागतं. काहीवेळेस ते चांगल्या दिग्दर्शकामुळे कळत असेल किंवा तशी भूमिका मिळावी लागते. अक्षयकुमारला प्रियदर्शनमुळे कॉमेडी करायला मिळाली नाहीतर तो ही हाणामारी करतच राहिला असता. धर्मेंद्र कॉमेडी उत्तम करायचा. ‘नौकर बीवी का’, ‘चुपके चुपके’ मधली कॉमेडी बघाल त्याची. नूतन ते अनिता राज असा नायिकांचा जबरदस्त स्पॅन आहे त्याचा. बिमल रॉय ते शिबू मित्रा हा दिग्दर्शक स्पॅन. माचो मॅन, ही मॅन, गरम धरम अशी अनेक विशेषणं त्याला मिळाली. सत्तरच्या मध्यात जगातील सुंदर पुरुषांपैकी एक होता तो. मीनाकुमारी, हेमामालिनी, अनिता राज ते जयाप्रदा असा लफड्यांचा स्पॅन पण बराच मोठा आहे त्याचा. काहीतरी मॅग्नेटिक असणारच म्हणा माणसात त्या. गिरीश कार्नाडांना सांगून गेलेल्या हेमाला शेवटी गरम धरम पसंत पडला. तिच्याशी लग्न करण्यासाठी तो दिलावरखान झाला होता म्हणे. वयाच्या एकोणविसाव्या वर्षी जिच्याशी लग्न झालं त्या प्रकाशकौरला चार आणि हेमाला दोन अशी एकूण दोन मुलं आणि चार मुली त्याला आहेत.
अतिशय टुकार फिल्म हिट करण्यात त्याचा हातखंडा होता. एका सिनेमात तो बंदुकीची गोळी मुठीत पकडतो ते बघून मी हमसाहमशी हसलो होतो. नंतर मिथुनने त्याला मेहनत घेऊन टुकारपणात मागं टाकलं. ‘फरिश्ते’, ‘हुकूमत’, ‘नाकाबंदी’, ‘राजतिलक’, ‘राजपूत’, ‘बगावत’ केवळ तो असल्यामुळे लोक बघायला गेले असावेत. नंतर मिथुन जसे रतीब टाकल्यासारखे सिनेमे काढायचा तसे त्या काळात धर्मेंद्रचे टुकार सिनेमे यायचे. पण त्याचं एक बरं होतं, त्याच्या इमेजला त्यामुळे धक्का वगैरे बसला नाही कधी. भारतीय प्रेक्षकांनी सिनेमाला जायच्या आधीच प्रत्येकाची कामं ठरवून टाकलेली असतात. अलका कुबल, सुलोचनादीदी यांचा पदर ढळता कामा नये, जगदीश राज कायम इन्स्पेक्टर हवा, बढती मान्य नाही, किमी काटकर, झीनत अंग झाकलं सगळं तर आम्ही ओळखू शकत नाही, आमचं एकदा ठरलं की ठरलं. आम्ही धर्मेंद्रला हाणामारी करायला घेतलाय, ती त्याने करावी बाकी आमच्या जास्ती अपेक्षा नाहीत त्याच्याकडून. इतका अल्पसंतुष्ट प्रेक्षक जगात दुसरीकडे कुठे नसेल. या प्रकारामुळे पडद्यावरच्या लोकांची शामत झाली नाही कधी वेगळं काही करण्याची. ‘स्कारफेस’मधल्या अल पचिनोचं आम्ही कौतुक करू पण म्हणून काय त्यावरून आलेल्या ‘अग्निपथ’चा विजय चौहान न सांगता आवाज बदलतो म्हणजे काय, नाय चालणार. बाकी प्रेम एक तरफ आणि बदल एक तरफ. मी पाहिला होता तो घोग-या आवाजातला पण शेवटी त्याला परत डब करावं लागलं.
शम्मी, राजेश खन्ना, देवानंदसारखी त्याला कायम हिट गाणी मिळाली नाहीत, आयुष्यात एकदाही फिल्मफेअर मिळालं नाही. ‘शान’मधे शशीकपूरच्या जागी होता तो आधी. तो नाही म्हणाला मग हेमा पण म्हणाली, ‘आमचे हे नाहीत तर मी पण नाही’ मग तिच्या जागी बिंदिया गोस्वामी आली. दुसरीकडे व्यग्र असल्यामुळे त्याने ‘अमर अकबर’ पण नाकारला होता. तसा तर त्याने ‘जंजीर’ पण नाकारला होता. मुळात अमुक रोलसाठी धर्मेंद्रच हवा असा आग्रह कुणी धरेल एवढा महान अभिनेता तो नव्हताच. राजकुमार, नाना पाटेकर, सनी देओल यांना नाचताना पाहणं म्हणजे मागच्या जन्मीचं पाप. धर्मेंद्र निदान विनोदी तरी नाचायचा. बॉबी देओल नाचतो हे बघून मला भरून आलं होतं. रडताना, ओरडताना धर्मेंद्र हास्यास्पद दिसतो. ‘देवर’ मी खूप लहानपणी दूरदर्शनला बघितला होता. ‘आया है मुझे फिर याद वो जालिम’ मुकेशच्या आवाजात म्हणताना त्याला बघून मामा म्हणाला होता, ‘मनोजकुमारला न्यूनगंड येऊ नये म्हणून तो अधूनमधून चेह-यावर भाव आणतोय’. पियानोवर बसून गाणं म्हणणं हा त्याचा प्रांत नव्हे. झीनतला ‘तेरे साथही मेरे मरनेकी खबर आयेगी, रेखाला ‘रफ्ता रफ्ता देखो’. हेमाला ‘कोई हसीना जब’ म्हणायचं हा त्याचा प्रांत. हाच माणूस ‘चुपके चुपके’मधे ‘अबके सजन सावनमे’ला पडद्यामागे शर्मिला एवढाच देखणा दिसलाय, ‘सारेगम’ला बच्चनच्या तोडीसतोड एक्स्प्रेशन्स त्याने दिलेत. एकूणच तो विनोदी भूमिकेत जास्त खुलतो असं दिसत असूनही तेंव्हा त्याला निखळ विनोदी भूमिका कुणी दिल्या नाही. अपयशाची, पैसे बुडण्याची भीती असावी.
‘गजब’ नावाचा त्याचा एक सिनेमा होता. डबलरोल होता त्याचा. छान काम केलं होतं त्यात त्याने. ‘अनपढ’, ‘आँखे’, ‘अनुपमा’, ‘दोस्त’ चांगले होते. एका शॉटला काळा गुलाब दाखवलाय म्हणून मामाने मला त्याचा ‘इज्जत’ बघायला नेलं होतं. शॉटच्या आधी दहा मिनिटं तो मला लक्ष ठेव म्हणत होता. अमजदचा गब्बर जसा अजरामर तसाच धर्मेंद्रचा वीरू. फुल नौटंकी. अमिताभचा ‘अमर अकबर’चा दारू सीन जसा मस्त तेवढाच वीरूचा टाकीवरचा सीन पण मस्त. अमिताभ आता सांगतो ‘शोले’ त्याला धर्मेंद्रमुळे मिळाला पण धर्मेंदने कधी उल्लेख केला नाही हा त्याचा मोठेपणा. ‘जॉनी गद्दार’मधे त्याचं वय जाणवतं. माणूस थकतोच कधी ना कधी. वडील म्हणून जे कर्तव्य असतं ते दोन्ही मुलांना लाँच करून त्याने पार पाडलं. घरचंच प्रॉडक्शन आहे म्हणून तो ‘बेताब’ (यातला लहान सनी सोनू निगम होता बरं का), ‘घायल’मधे डोकावला नाही. हा हट्टाकट्टा माणूस दारूमुळे बाद झाला, नाहीतर अजूनही तो ताठ आहे तसा. तो डिप्रेशनमधे गेल्याचं ही वाचलं होतं. लोणावळ्याला तो म्हणे एकटा रहातो.
येत्या आठ डिसेंबरला तो दहा कमी शंभर झाला असत. शायरीची आवड असलेला माणूस. चपखल ओळी प्रसंगी म्हणण्याचं कसब पण त्याच्याकडे आहे. साठ साली त्याचा पहिला सिनेमा आला होता. केवढा मोठा काळ बघितलाय खरंतर या माणसाने. अमाप प्रसिद्धीनंतर येणारं एकटेपण फार भयानक असतं. एखादीच सुचित्रा सेन या सगळ्यापासून लांब रहाते आणि आपलं नख ही दिसू नये याची काळजी घेण्यासाठी फाळके पुरस्कार पण नाकारते. राखी पनवेलच्या फार्मवर रहाते. लोकांनी आपल्याला म्हातारपणी बघू नये म्हणून गरज असतानाही जॉय मुखर्जी शम्मीचा सल्ला अमान्य करून स्टेशनरीच्या दुकानात बसतो. धर्मेंद्र निदान आर्थिकदृष्ट्या तरी भक्कम आहे पण प्रत्येकाची दुःखाची कारणं वेगळी. कुणाजवळ माणसं आहेत, पैसे नाहीत, कुणाजवळ माणसं नाहीत, पैसे आहेत, कुणाजवळ काहीच नाही. वय होत चाललेल्या कलावंतांचा प्रवास हा पौर्णिमेकडून अमावास्येकडे होत असतो. सगळेच असे खंतावत नसतील.
‘शोले’च्या संपूर्ण तणावात तुझं स्वच्छंदी वागणं खूप गरजेचं होतं. इतर कलाकारांसारखा तू काय डायलॉगसाठी फेमस कधीच नव्हतास. पण ‘इतना बडा धोका’ म्हणताना ज्या घाईने तू ते नाणं पालटवतोस ते लक्षात आहे आणि तुझं ते ‘एक एकको चुनचुन के मारुंगा, चुनचुन के मारुंगा’!
धरमपाजी, देव तुझ्या आत्म्यास सद्गती देवो.

















